माथेरान शहरात ई-रिक्षा चाचणी यशस्वीपणे संपन्न

 

अलिबाग, दि.27 (जिमाका):- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून आणि सनियंत्रण समितीच्या निर्देशानुसार तसेच जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.27 जुलै 2022 रोजी माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई-रिक्षा चाचणी यशस्वीपणे संपन्न झाली. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या उपक्रमाची व्यवहार्यता तपासण्यासाठी हा उपक्रम अभ्यास प्रकल्प म्हणून तीन महिन्यांच्या कालावधीकरिता माथेरानमध्ये राबविण्यात येणार आहे.

यावेळी 06 स्वारस्य अभिरुची (EOI) पैकी 05 ई-रिक्षा या चाचणीत सहभागी झाल्या होत्या. पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.माने, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.कराळे व श्री.पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चे प्रादेशिक अधिकारी वि.वि. किल्लेदार, सहाय्यक प्रादेशिक अधिकारी श्री.कामत, माथेरान नगरपरिषदेचे अधीक्षक दीक्षांत देशपांडे, माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे, वन परिक्षेत्र अधिकारी (RFO) उमेश जंगम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.शेखर लव्हे आणि नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही चाचणी पूर्ण करण्यात आली.

या परिक्षण समितीच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे या अध्यक्ष असून सदस्य म्हणून कर्जत उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, माथेरान नगरपरिषदेचे अधीक्षक, माथेरान सहायक पोलीस निरीक्षक, माथेरान-नेरळचे परिक्षेत्र वन अधिकारी तर माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे या सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. ही ई-रिक्षा चाचणी परिक्षण समिती अभ्यासपूर्वक याबाबतचा तांत्रिक अहवाल तयार करणार असून हा अहवाल रायगड जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव माथेरान संनियंत्रण समिती डॉ.महेंद्र कल्याणकर यांना सादर करण्यात येईल.

यावेळी पोलीस विभागाकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आल्याने ई-रिक्षा चाचणीच्या वेळी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवला नाही. तसेच नागरिकांमध्ये या चाचणीविषयी योग्य ती जनजागृती करण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष चाचणी दरम्यान प्रशासनाला स्थानिक नागरिकांचाही उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद लाभला, अशी माहिती मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक