जिल्ह्यातील लसीकरण व “हर घर तिरंगा” उपक्रमाबाबत ऑनलाईन आढावा बैठक संपन्न

 

अलिबाग,दि.18(जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.18 जुलै 2022 रोजी जिल्ह्यातील लसीकरण व हर घर तिरंगा उपक्रमाबाबत ऑनलाईन आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, तहसिलदार (सर्वसाधारण) विशाल दौंडकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

केंद्र शासनाने कोविड-19 प्रिकॉशनरी डोस घेण्याचा कालावधी 09 महिन्यांवरून 06 महिने इतका करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे 18 वर्षांवरील नागरिकांसाठी दि.15 जुलै ते दि.30 सप्टेंबर 2022 असे पुढील 75 दिवस सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर प्रिकॉशनरी डोस मोफत देण्यात येणार आहे. हा प्रिकॉशन डोस घेण्यापूर्वी 18 वर्षांवरील नागरिकांनी त्यांच्या कोविड लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 06 महिने किंवा 26 आठवड्याचा कालावधी पूर्ण केला असावा. त्यानुषंगाने जिल्ह्यातही विविध लसीकरण केंद्रांवर नागरिकांना प्रिकॉशनरी डोस देण्यास गती मिळाली आहे.

जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, मॉल तसेच आठवडी बाजार या ठिकाणी तसेच गणेशोत्सवादरम्यान सर्व गावागावांमध्ये गणेश मंडळांच्या सहकार्याने विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हा / मनपा / तालुका / प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील कॉल सेंटर मार्फत दुसरा डोस व प्रिकॉशनरी डोस राहिलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना लस घेण्याबाबत प्रवृत्त करण्यात येणार आहे.

यावेळी तहसिलदार विशाल दौंडकर म्हणाले की, केंद्र शासनाने कोविड-19 प्रिकॉशनरी डोस घेण्याचा कालावधी 06 महिने इतका करण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातही सर्व नागरिकांना प्रिकॉशनरी डोस घेण्याविषयी विविध माध्यमातून जनजागृती करावी व त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करावे.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे म्हणाले की, जिल्ह्यात दरदिवशी जवळपास 6 ते 7 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून ही संख्या पुढील कालावधीत आणखी वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यास आरोग्य यंत्रणा सदैव तत्पर आहे.

या बैठकीत हर घर तिरंगा या उपक्रमाच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत ध्वज फडकविताना भारतीय ध्वज संहितेचे पालन करण्यात यावे. तसेच विविध माध्यमातून हर घर तिरंगा या उपक्रमाची अधिकाधिक प्रसिद्धी करण्यात यावी व हा उपक्रम यशस्वी करावा असेही सांगण्यात आले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड