विशेष लेख: अतिवृष्टीमुळे जमलेले पावसाचे पाणी ओसरल्यानंतर…

 

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र निदर्शनास येते आहे. मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने पूर परिस्थितीमध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत शासनाकडून प्रशासन तसेच नागरिकांसाठी वेळोवेळी विविध सूचना दिल्या जातात. राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली सध्याची परिस्थिती लक्षात घेवून नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने राज्यातील आरोग्य यंत्रणेसाठी महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

काय आहेत या सूचना.. जाणून घेवू या.. या लेखाच्या माध्यमातून..

1) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी समन्वय:

·         प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर परिस्थितीचे दैनंदिन सनियंत्रण करीत आहे.

·         जिल्हास्तरीय आरोग्य विभागाने या कक्षाशी नियमित समन्वय राखणे आवश्यक आहे. यामुळे पूर परिस्थिती नेमकी कोठे आहे, कोणती गावे पूरग्रस्त झाली आहेत, याबाबतची अचूक माहिती वेळेवर मिळेल.

2) आरोग्य पथकः

·         पूरबाधित गावात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे पथक औषधासह पाठवावे.

·         मोठ्या लोकसंख्येच्या गावात कमीत कमी दोन महिला कर्मचारी व दोन पुरुष कर्मचारी यांचा समावेश असावा.

·         तसेच कमी लोकसंख्या असलेल्या गावात एक महिला व एक पुरुष कर्मचारी असावा. हे पथक पूरग्रस्त गावात चोवीस तास राहील याची दक्षता घ्यावी.

3) पुरेसा औषध साठा:

·         पूरग्रस्त गावात साथीचे आजार उद्भवू नये यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व जीवनावश्यक औषधांचा साठा जिल्हा रुग्णालयापासून पूरग्रस्त गावापर्यंत उपलब्ध करावा व पाणी शुध्दीकरणासाठी आवश्यक असलेली ब्लिचिंग पावडर, क्लोरीन टॅबलेट, लिक्वीड क्लोरीन याचा पुरेसा साठा गावपातळीवर उपलब्ध करावा.

 

 

4) दैनंदिन रुग्ण सर्वेक्षण:

·         पूरग्रस्त गावात आरोग्य कर्मचाऱ्याने आशा कार्यकर्तीचा सहभाग घेऊन प्रत्यक्ष घरोघर भेट देऊन जुलाब, उलटी, ताप व इतर आजारांच्या रुग्णांचे सर्वेक्षण करावे.

·         सर्वेक्षणात आढळून आलेल्या रुग्णांवर प्रतिबंधात्मक नियंत्रणात्मक उपचार करावेत.

·         सर्वेक्षणामध्ये गंभीर रुग्ण आढळून आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने पुढील उपचारासाठी संदर्भित करावे.

5) किटकजन्य आजार नियंत्रणासाठी करावयाची कार्यवाही:

·         पूरग्रस्त गावांमध्ये दैनंदिन गृहभेटी देऊन ताप रुग्ण सर्वेक्षण करण्यात यावे.

·         हिवताप रुग्णाचे निदान 48 तासांमध्ये होईल याची दक्षता घ्यावी.

·         आवश्यक ठिकाणी हिवताप निदानासाठी रॅपिड डायग्नोस्टिक किटचा वापर करावा.

·         हिवताप दूषित रुग्णांना वेळेवर समूळ उपचार देण्यात यावा.

·         ज्या भागात तापाचे रुग्ण आढळून येत आहेत तथापि ते हिवताप बाधित दिसत नाहीत, अशा ठिकाणचे रक्त नमुने डेंग्यू आणि चिकनगुनिया तपासण्यासाठी सेंटिनल सेंटरला पाठवावेत.

·         घरभेटीच्या वेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी किमान 20 टक्के घरांच्या मध्ये पाण्याच्या साठ्याची तपासणी करून डासअळीचे प्रमाण निश्चित करावे आणि अळीनाशक कार्यवाही करावी.

·         पूरग्रस्त गावातील पाण्याची साचलेली डबकी वाहती करावीत.

·         योग्य डासोत्पत्ती स्थानामध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत.

·         ज्या गावात डास अळी घनता दोन पेक्षा अधिक आहे आणि ज्या ठिकाणी संशयित चिकनगुनिया अथवा डेंग्यू तापाचे रुग्ण दिसून आले आहेत, अशा वापरावयाच्या पाण्याच्या साठ्यामध्ये टेमिफॉस हे अळीनाशक टाकावे.

·         गावात दर पंधरवड्याला कीटकनाशक धूर फवारणीच्या दोन फेऱ्या आठवड्याच्या अंतराने घ्याव्यात.

·         पूरग्रस्त भागातील पाणी साचून राहणाऱ्या डासोत्पत्ती स्थानांवर अळीनाशकांची फवारणी करावी.

·         दलदलीची ठिकाणे, कचऱ्याचे ढीग, मृत जनावरे कुजलेले धान्य आणि इतर दुर्गंधीच्या ठिकाणी 5% मॅलेथिऑन पावडरची आवश्यकतेनुसार धुरळणी करावी.

·         या किटकनाशकांच्या खरेदीसाठीचा खर्च ग्राम आरोग्य स्वच्छता आणि पोषण समितीच्या अनुदानामधून करण्यात यावा.

 

6) विस्थापित रुग्ण प्रणाली:

·         मुख्यत्वे शहरी व ग्रामीण भागात घरामध्ये पाणी शिरल्यामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी उदा. शाळा, मंगल कार्यालये, देवालय इ. ठिकाणी वैदयकीय पारं दररोज आरोग्य तपासणी करून औषधोपचार करावा.

7) मनुष्यबळ प्रणाली:

·         पूरबाधित गावांमध्ये आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यास अथवा अपुरे असल्यास आपल्या कार्यक्षेत्रातील इतर आरोग्य संस्थांमधून प्रतिनियुक्ती देण्यात यावी.

8) आरोग्य शिक्षण:

·         दवंडी, भित्तीपत्रके, ध्वनीक्षेपण यंत्रणेद्वारे (मायकिंग) पूरपरिस्थतीमध्ये घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करावी.

9) सार्वजनिक आरोग्य प्रणाली:

·         आरोग्य कर्मचाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या हॉटेल, भोजनालय, रसवंतीगृहे व इतर अन्न व पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व संस्थांचे स्वच्छता व पाण्याचा वापर याची नियमित तपासणी करावी.

10) पाणी गुणवत्ता नियंत्रणः

·         पूर परिस्थिती उद्भवल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होतात यास्तव ग्रामपंचायतीकडे कार्यरत असलेल्या जलसुरक्षकामार्फत पिण्याच्या पाण्याचे युध्दपातळीवर शुध्दीकरण करण्यात यावे.

·         पाणी नमुने नियमितपणे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवावेत.

·         ग्रामपंचायतीकडे जलसुरक्षकाचे पद रिक्त अथवा कार्यरत नसल्यास संबंधित गटविकास अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून पर्यायी व्यवस्था करावी.

·          आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक यांनी पाणी शुध्दीकरणाचे दैनंदिन पर्यवेक्षण करावे.

·         पाणी शुध्दीकरण करण्यासाठी खालील सूत्राचा वापर करण्यात यावा-

·         गोल विहिरीचे पाण्याचे मोजमाप करण्याचे सूत्र:

(व्यास) 2 x पाण्याची खोली x 785 = एकूण लिटर पाणी (सर्व मापे मीटरमध्ये)

·         चौकोनी विहिरीचे पाण्याचे मोजमाप करण्याचे सूत्र:

लांबी x रुंदी x पाण्याची खोली x 1000 = एकूण लिटर पाणी (सर्व मापे मीटरमध्ये)

·         प्रत्येक 1000 लिटर पाणी क्षमतेच्या पाणीसाठ्यासाठी ग्रॅम ब्लिचिंग पावडरचा (33% उपलब्ध क्लोरीन असलेली) वापर करावा. पाणी शुध्दीकरणानंतर क्लोरीनची मात्रा 0.5 पीपीएम राहावी, याची दक्षता घ्यावी.

·         घरोघरी शुध्दीकरण करण्यासाठी मदर सोल्यूशन किंवा मेडीकल द्रावणाचा वापर करावा.

·         मदर सोल्यूशन एक लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम पावडर टाकून तयार करावे व प्रत्येक 20 लिटरसाठी 4 ते 5 थेंब मदर सोल्यूशन टाकावे आणि अर्ध्या तासानंतर पाणी पिण्यास वापरावे.

·         पाणी शुध्दीकरणाची ओ.टी. टेस्टने खातरजमा करावी.

11) ब्लिचिंग पावडर उपलब्धता व गुणवत्ता नियंत्रणः

·         ग्रामपंचायतीने गुणवत्ता असलेलीच (उपलब्ध क्लोरीन 2017 पेक्षा जास्त) ब्लिचिंग पावडर वापरावी.

·         तसेच आवश्यक असलेला ब्लिचिंग पावडर साठा ग्रामपंचायत मुख्यालयी उपलब्ध ठेवावा व पावडरची गुणवत्ता जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासून त्यांच्या अभिप्रायानार सुयोग्य पावडरचा पाणी गुणवत्ता नियंत्रणासाठी वापर करावा.

·         आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याचे पर्यवेक्षण करावे.

12) पाणीपुरवठा वितरण प्रणाली मधील गळत्याः

·         पाणीपुरवठा वितरण प्रणालीमध्ये असलेल्या नळ गळत्या व व्हॉल्व गळत्या युध्दपातळीवर दुरुस्त कराव्यात. कारण पूर परिस्थितीत पाणीपुरवठा वितरण प्रणालीमध्ये दूषित पाणी जाऊन पिण्याचे पाणी दूषित होण्याचा व साथ उद्रेक होण्याचा मोठा धोका असतो.

13) टँकरने पाणी पुरवठाः

·         पूर परिस्थतीत पिण्याच्या पाण्याचे निर्जंतूकीकरण करणे काही गावात शक्य नसल्यास वरिष्ठ कार्यालयाच्या सहकार्याने टँकरच्या सहाय्याने निर्जंतूकीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा करावा.

14) लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक औषध उपचार योजनाः

·         पूराच्या पाण्यातून चालल्यामुळे अनेकांना लेप्टो आजाराचा धोका संभवतो.

·         याकरिता अतिजोखमीच्या भागात प्रतिबंधात्मक स्वरुपात डॉक्सीसायक्लीन हे औषध मार्गदर्शक सूचनांनुसार देण्यात यावे.

15) आरोग्य विभाग इमारती व संसाधने याबाबत माहिती:

·         पूर परिस्थितीमुळे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत कार्यरत असणाऱ्या आरोग्य संस्थांच्या इमारती अथवा इतर संसाधने यांच्यावर काही परिणाम झाला आहे का, याचा दैनंदिन आढावा घ्यावा.

·         अनेकदा पूराने वेढल्यामुळे आरोग्य विभागात कार्यरत मनुष्यबळ विशिष्ट ठिकाणी अडकून पडते. त्याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.

·         पूर परिस्थितीमुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने लस साठा वाया जाण्याची शक्यता लक्षात घेऊन हा साठा ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरु आहे, त्या ठिकाणी हलवावा किंवा तो जिल्हास्तरावरील शीतसाखळी मध्ये ठेवावा.

16) गरोदर मातांची विशेष काळजी:

·         पूरग्रस्त भागांमध्ये असलेल्या गरोदर मातांची यादी करून त्यातील किती जणींच्या प्रसूतींची संभाव्य तारीख या काळात आहे, हे लक्षात घेऊन अशा मातांच्या प्रसूतीसाठी त्यांना सोयीच्या आरोग्य संस्थामध्ये हलवावे.

·         यासंदर्भात अतिजोखमीच्या गरोदर मातांची विशेष काळजी घेण्यात यावी.

·         पूर परिस्थिती, त्यामुळे बसलेला मानसिक धक्का या कारणांमुळे अनेक मातांची प्रसूती वेळेपूर्वी होऊ शकते, काही जणींचा गर्भपात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या सर्व मातांचे दैनंदिन सर्वेक्षण करून त्यांना आवश्यक सेवा पुरविण्यात याव्यात आणि गरजेनुसार त्यांना योग्य ठिकाणी संदर्भित करण्यात यावे.

17) सर्पदंश-विचूदंश उपचारांची आवश्यक सुविधाः

·         पावसाळ्यात तसेच पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये अनेकदा पूरग्रस्त भागामध्य सर्पदंश आणि विचू दंशाचे प्रमाण वाढते. यासाठी लागणारी आवश्यक औषधे सर्व आरोग्य संस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावीत.

18) परिसर स्वच्छता:

·         अतिवृष्टीबाधित गावाचा परिसर अस्वच्छ झालेला असल्यामुळे किटकांचा प्रादूर्भाव वाढीस लागतो व किटकजन्य व जलजन्य आजार तीव्र गतीने पसरण्याची शक्यता असते. यास्तव या गावाची परिसर स्वच्छता करून घेणे गरजेचे आहे.

19) आंतर विभागीय समन्वयः

·         साथरोग नियंत्रणासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषी खाते व पशुसंवर्धन या सर्व शासकीय विभागांशी समन्वय ठेवावा.

20) पूर परिस्थितीचा दैनंदिन अहवाल:

·         प्रत्येक जिल्ह्याने आपल्या कार्यक्षेत्रातील पूर परिस्थितीचा दैनंदिन अहवाल सतत अद्ययावत ठेवावा.

अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालय, पुणे या कार्यालयाकडून संचालक डॉ.नितीन अंबाडेकर यांनी सर्व जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सविस्तर सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे आणि रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा या परिपत्रकातील सूचनांप्रमाणे नागरिकांच्या आरोग्याची सर्वोतोपरी काळजी घेण्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज आहेत. तरी नागरिकांनी या आपत्तीकाळात आरोग्याच्या कोणत्याही समस्या उद्भवल्यास नजीकच्या उपजिल्हा रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

रायगड-अलिबाग

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक