विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांना एक रकमी रु.10 हजार व‍ रु.25 हजार विशेष गौरव पुरस्कार


अलिबाग, दि.23 (जिमाका):- राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कामगिरी करणारे, पूर,जळीत,दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्ती मध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्यांना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी एक रकमी रू.10000/- आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रू.25000/- चा पुरस्कार, शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्याची तरतूद आहे.

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांना  विशेष गौरव पुरस्कार मिळविण्यासाठी पुढील प्रमाणे अर्हता प्राप्त  करणे आवश्य्क आहे :-

खेळातील पुरस्कार- राष्ट्रीय/राज्य स्तरावर खेळात भाग घेतलेला आहे काय?,घेतला असल्यास कोणत्या खेळात भाग घेतला?, राष्ट्रीय/राज्य  स्तरावर प्रमाणपत्र मिळालेले आहे काय?, उत्कृष्ट कामगिरी/पदक मिळविल्याचे वर्तमानपत्रात प्रसिध्दी/फोटो इत्यादीबाबतची कात्रणे असल्यास प्रकरणासोबत जोडली आहेत काय?, राष्ट्रीय/राज्यस्तरीय प्रतियोगीतेत सुवर्ण/रौप्य/कास्य   यापैकी मिळविणे आवश्यक  आहे किंवा, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेले असले पाहिजे. खेळामध्ये मिळविलेले प्रमाणपत्र हे इंडियन ऑलिम्पिक असोसीएशन (IOA), स्पोर्टस ॲथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी किंवा नॅशनल फेडरेशन त्यांशी संलग्न राज्यस्तरीय फेडरेशनचे असले पाहिले, राज्यस्तरीय/राष्ट्रिस सहभागाची नोंद घेणेकरीता त्या आधीच्या जिल्हा व राज्यस्तरीय सहभागाचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे,वर नमूद केलेल्या संस्थेव्यतीरिक्त इतर कोणत्याही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अंतिम अधिकार निवड समितीला असतील.

साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य . क्षेत्रातील पुरस्कार- साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाटय इतर कला क्षेत्रात राष्ट्रीय/राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असला पाहिजे,    साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाटय इतर कला क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी/पुरस्कार मिळविल्या बाबत वर्तमान पत्रात प्रसिध्दी/फोटो इ. बाबतची कात्रणे असल्यास प्रकरणासोबत आहेत काय?,साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाटय इतर कला क्षेत्रात शासनमान्य  किंवा नामवंत राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून सन्मानीत केलेले असले पाहिजे, वर नमूद केलेल्या संस्थेव्यतीरिक्त इतर कोणत्याही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अधिकार समितीला असतील.

नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणा-यांना पुरस्कार-पूर, जळीत, दरोडा, अपघात, नैसर्गिक आपत्ती (भुकंप/वादळ) मध्ये बहुमोल कागमिरी केली असली पाहिजे,अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी केल्याबाबत केंद्र/राज्य शासन तसेच  अन्य सामाजिक संस्थांद्वारे पुरस्कार/प्रशस्तीपत्र मिळाले असल्यास वर्तमानपत्रात प्रसिध्दी/फोटो . बाबतची कात्रणे असल्यास प्रकरणासोबत जोडली आहेत काय?, अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी केल्याबाबत केंद्र/राज्य   शासन तसेच अन्य नामवंत संस्थांद्वारे पुरस्कृत असले पाहिजे, वर नमूद केलेल्या संस्थेव्यतीरिक्त इतर कोणत्याही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अधिकार समितीला असतील.

शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार- महाराष्ट्र राज्य   माध्यमिक उच्च  माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळातून (पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, कोल्हापूर, नाशिक लातूर) इयत्ता 10 वी 12 वी मंडळाच्या परिक्षेमध्ये 90% पेक्षा जास्त   गुण मिळवू उत्तीर्ण होणा-या प्रत्येक मंडळातील पहिल्या 5 (5 X 10 मंडळे = 50) असे .10वी चे एकूण 50 पाल्य .12 वीचे एकूण 50 पाल्य) माजी सैनिक/विधवा यांच्या पाल्यांना एकरकमी रू.10000/- विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल.  पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना एकरकमी रू.10000/- विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. IIT, IIM, AIIMS अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक/विधवा यांच्या पाल्यांना रु.25,000/- विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीकरीता फक्त गतवर्षातील (Preceding Year) स्वीकारली जातील. केंद्रिय शिक्षण बोर्ड, नवी दिल्ली येथून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रेड शीट निष्पादन प्रमाणपत्रामध्ये प्राप्त गुण व टक्केवारी दर्शविण्यात येत नाही. तरी सदर प्रकरणासोबत संबंधित विद्यालयाचे गुणपत्रक (Statement of Marks) टक्केवारीसह जोडणे आवश्यक आहे.

यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे- यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणा-यांना राष्ट्रीय/राज्य  स्तरावर वृत्तपत्र/मासिक राज्य स्तरावरचे व्यावसायीक स्तरावरचे संघटन यांनी पुरस्कृत केले असले पाहिजे

कृषीक्षेत्रात भरघोस उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यास शासनातर्फे पारितोषीक गौरवपत्र प्राप्त असले पाहिजे किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून प्रशस्तीपत्र प्राप्त  असले पाहिजे. वर नमूद केलेल्या संस्थेव्यतीरिक्त  इतर कोणत्याही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अधिकार समितीला असतील.

सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविणारे- असे सामाजिक काम जे की राज्य  स्तरावर प्रशंसा किंवा बहुसंख्य लोकांचा फायदा होईल असे कार्य केले असले पाहिजे.पर्यावरणामध्ये मुलाग्र बदल घडवू आणल्यामुळे त्या भागातील किंवा बहुसंख्य   लोकांचा फायदा होईल असे कार्य केले असले पाहिजे.

सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषक कार्य करणाऱ्या नामवंत संस्था/वृतपत्र यांचेकडून गौरव/प्रशस्तीपत्र मिळाले असले पाहिजे. वर नमूद केलेल्या संस्थेव्यतीरिक्त  इतर कोणत्याही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अधिकार समितीला असतील.

सदरचा गौरव पुरस्कार मिळण्यासाठी पात्रताधारकांनी खालीलपैकी लागू असलेली कागदपत्र 15 सप्टेंबर 2022  पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे सादर करावे:-

वैयक्तीक अर्ज (कंपलसरी), फॉर्म डी.डी.40 (कार्यालयात उपलब्ध आहे - कंपलसरी),ओळखपत्राची पाठपोट छायांकीत प्रत (कंपलसरी), उत्कृष्ट कामगिरीबाबतच्या प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत, वर्तमानपत्रातील जाहिरातीचे कात्रण,      10 वी, 12 वी च्या प्रमाणपत्राची /गुणपत्रीकेची साक्षांकीत प्रत, डिस्चार्ज पुस्तकामध्ये  कुटूंबाची नावे असलेल्या पानाची छायांकीत प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुकाची छायांकीत प्रत.

तरी या संधीचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त  पात्र माजी सैनिक/विधवांनी/पाल्यांनी  घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रायगड-अलिबाग डॉ.पद्मश्री  बैनाडे यांनी केले  आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक