गणेशोत्सव-2022 कालावधीत जिल्ह्यातील मिठाई उत्पादक,विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी दक्षता घ्यावी

 


 

अलिबाग,दि.29(जिमाका) :- सणासुदीच्या कालावधीमध्ये जनतेकडून मिठाई व इतर अन्न पदार्थ जसे खवा मावा, घी, रवा, मैदा, आटा,  वनस्पती, खाद्य तेल इत्यादीची मागणी मोठया प्रमाणात केली जाते. त्यानुषंगाने  जिल्हयातील मिठाई उत्पादक/ विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी दक्षता घेण्याविषयी अन्न औषध प्रशासन विभागाचे  सहाय्यक आयुक्त (अन्न) लक्ष्मण दराडे यांनी केले.

       त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार आस्थापनेचा परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने किटकापासून संरक्षित व स्वच्छ असावा, कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक/ नोंदणीधारक अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करण्यात यावेत, पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, तयार अन्न पदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकून ठेवावेत, आजारी व्यक्तीने अन्न पदार्थ हाताळू नयेत, मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्यरंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा (100 PPM पेक्षा कमी), बंगाली मिठाई ही 24 तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, मिठाई बनविताना तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ ॲप्रन वापरावेत, मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचे व उच्च प्रतीचे असावे, मिठाई हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावे, विक्री बिलावर अन्न परवाना क्रमांक नमूद करण्यात यावा, त्याचप्रमाणे विक्रीसाठी सुटटया स्वरुपातील भारतीय मिठाईच्या ट्रे वर "बेस्ट बिफोर डेट" (या दिनांकपूर्वी खावा/वापरावा) नमूद करण्यात यावी, पेढीमध्ये FoSTC प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती नियमितपणे कार्यरत ठेवण्यात यावी, मुदतबाह्य अन्न पदार्थ कोणत्याही परिस्थितीत साठा व विक्री करू नये.

जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी या सर्व सूचनांचे पालन करावे,असे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

               त्याचप्रमाणे सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थाच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त (अन्न)  पदावधित अधिकारी, अन्न औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, रायगड-पेण लक्ष्मण दराडे यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक