गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत शासनाच्या सूचना जारी

 


 

अलिबाग, दि.24 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासियांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येते. राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरून जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतुकीमुळे या कालावधीत कोकणाकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोंडी होते, या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 115 मधील तरतूदीचा वापर करुन सार्वजनिक हितास्तव पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 (रा.म.क्र.जुना क्र. 17) (पनवेल ते सिंधुदूर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी) येथून होणाऱ्या वाळू-रेतीच्या ट्रकची तसेच मोठया- अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत शासनाकडून विविध सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

 गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास, मूर्तीचे आगमन दि.27 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते दि.31ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड, अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) वाहतुकीस पूर्णत: बंद करण्यात यावी.

   5 व 7 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, काही अंशी परतीचा प्रवास दि.4 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते दि.6 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड, अवजड वाहने, ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात यावी.

 अनंतचतुर्दशीच्या दिवशी 10 दिवसांचे गणपती विसर्जन, परतीचा प्रवास दि.9 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते दि.10 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड, अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल ट्रेलर इ. वाहने वाहतुकीस पूर्णत: बंद करण्यात यावी.

      दि.27 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते दि.10 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर वाळू, रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णतः बंद करण्यात यावी,

  परंतु हे निर्बंध दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही.

   तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या रस्ता रुंदीकरण, रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही.

  या संदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग/ महामार्ग पोलिसांकडून प्रवेशपत्र देण्यात येईल. तसेच जे.एन.पी.टी. बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक सुरळीत राहील, याकरिता वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन करण्यात यावे, अशा सूचना शासनाचे सह सचिव राजेंद्र होळकर यांनी शासन परिपत्रकान्वये जाहीर केल्या आहेत.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक