नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर



अलिबाग,दि.15 (जिमाका):- समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज येथे केले.

अलिबाग येथील पोलीस कवायत मैदान येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75 वा वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.जयसिंग मेहत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशेट्टी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेडगे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) निलेश घुले, पोलीस उपअधीक्षक जगदीश काकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार विशाल दौंडकर, श्रीमती मिनल दळवी, सचिन शेजाळ, डॉ.सतिश कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, डॉ.शितल जोशी, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री.सचिन इंगळी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते. 

सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.

जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना तसेच स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सदैव जागरुक राहणाऱ्या तीनही सुरक्षा दलातील जवानांप्रति आदर व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

 ते पुढे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  आपल्या जिल्ह्यातही हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविला जात आहे. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, ऐतिहासिक स्मारकांवर तिरंगा फडकविणे, स्वच्छ सागर..सुरक्षित सागर अभियान, हर घर जल उत्सव, स्वराज्य महोत्सव, तिरंगा यात्रा, दौड, मोटार सायकल रॅली, सायकल रॅली, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे असे विविध उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करीत या माध्यमातून आपण आपला देशाभिमान वृध्दींगत करीत आहोत.  

आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे.

     रायगड जिल्ह्यास सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत 275 कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. या निधीचे  सुयोग्य  नियोजन करून सन 2021-22 मध्ये मार्च-2022 अखेर 100 टक्के खर्च करून राज्यात रायगड जिल्हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.      

        जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून माझी वसुंधरा, कातकरी उत्थान योजना, गरूडझेप स्पर्धा परीक्षा अभियान, महाड येथे पर्जन्यमापक यंत्र, पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी वॉकी-टॉकी व आवश्यक बचाव साहित्य, ओरिसा येथे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षण अशा विविध योजना राबविण्यात आल्या. सन 2021-22 मध्ये अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 25.60 कोटी  रुपये निधी  व आदिवासी  उपयोजनेंतर्गत  32.98 कोटी रुपये इतका निधी लोकोपयोगी कामांकरिता 100 टक्के खर्च करण्यात प्रशासनाला यश आले.

           सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना  सन 2022-23 अंतर्गत 320 कोटी  रुपये अर्थसंकल्पीय तरतूद  मंजूर करण्यात आली  आहेसर्व महानगरपालिका/नगरपालिका/नगर पंचायती यांच्यासाठी 20 कोटी रुपये विशेष अतिरिक्त निधीची तरतूद  ठेवण्यात आली आहे. तसेच ‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत रायगड किल्ला परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाच्या आकस्मिक कामांसाठी 5 कोटी रुपये निधी राखून ठेवण्यात आला आहे. रायगड जिल्हा पोलीस विभागासाठी 1 स्कॉर्पिओ, 16 बोलेरो जीप आणि 22 मोटार सायकली उपलब्ध करुन देण्यात आल्याने जिल्हा पोलीस दलाचेही बळकटीकरण होण्यास मदत होईल.

जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर म्हणाले, कोकणाला धडकणारी निसर्ग-तौक्तेसारखी चक्रीवादळे, वातावरणीय बदलांमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा अधिक बळकट करण्याचा प्राधान्याने प्रयत्न आपण करीत आहोत. पूर परिस्थितीच्या काळत मदत व बचाव कार्य वेगाने सुरु करता यावेयासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रत्येक तहसिल कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांना आपत्कालीन स्थितीत आवश्यक असणारे रेस्क्यू म्हणजेच विमोचन साहित्य पुरविण्यात आले. यामध्ये विशेष करुन तात्काळ संपर्कासाठी 11 सॅटेलाईट फोनचा समावेश आहे, असे सांगून ते म्हणाले की, कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये सज्ज राहून जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी व अन्य कोणतीही हानी होणार नाहीयासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची जय्यत तयारी केली. मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांची तसेच शेजारील जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची थेट महाडमध्येच आढावा बैठक घेण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने सावित्री व काळ नदीमधील मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केले. हे काम समाधानकारक झाल्याने महाड व आसपासच्या गावांना या पावसाळ्यात दिलासा मिळाला.

 जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या एकूण 50 जवानांचा समावेश असलेल्या दोन तुकड्या तैनात केल्या. जिल्ह्यातील शासकीय अधिकारी-कर्मचारी व आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनासोबत काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक अशा एकूण 160 जणांना ओरिसा येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी पाठवून प्रशिक्षित करण्यात आले. या 160 जणांनी प्रशिक्षित होवून स्थानिक नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजनांची जनजागृती केली.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जनतेला तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगावकर्जत व ग्रामीण रुग्णालय महाड आणि पोलादपूर या ठिकाणी रुग्णवाहिकावैद्यकीय अधिकारीवाहनचालकासह ॲम्ब्युलन्स स्टेशन सज्ज ठेवण्यात आले.

मान्सून कालावधीमध्ये रायगड जिल्ह्याच्या दरडप्रवण भागांमध्ये नैसर्गिक आपत्तींच्या घटना घडल्यास तात्काळ मदत पोहोचविणेस्थलांतरीत करण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करणे तसेच मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे दरडप्रवण गावांमध्ये दरड कोसळण्याची लक्षणे आढळतात किंवा कसे याची पाहणी करण्यासाठी तसेच तेथील नागरिकांशी संपर्क साधून अतिवृष्टीच्या वेळी सतर्क राहून त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दि.16 जुलै 2022 रोजी टेहळणी दिन ही संकल्पना राबविण्यात आली.  प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांनी जवळपास 72 गावांची त्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून पाहणी केली, तेथील नागरिकांशी संवाद साधला, त्यांना सुरक्षाविषयक उपाययोजनांची माहिती दिली आणि प्रशासन सदैव त्यांच्यासोबत असल्याचा त्यांना आत्मविश्वास दिला. याशिवाय नागरी संरक्षण दलामार्फत जिल्ह्यामधील संभाव्य पूर व दरडप्रवण गावातील 1 हजार 924 लोकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

ज्यांच्या सहकार्यामुळे रायगड जिल्ह्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवेळी होणाऱ्या  मनुष्य व वित्तहानीवर प्रशासन नियंत्रण मिळवू शकले आहे, अशा व्यक्ती, विविध स्वयंसेवी संस्था यांच्या मोलाच्या योगदानाबाबत त्या सर्व व्यक्ती व संस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रसंगी आभार मानले.

ते पुढे म्हणाले, मत्स्यव्यवसाय विभागामार्फत मत्स्यव्यवसायिक व मच्छिमारांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेचे 12 कॅम्प आयोजित करण्यात आले. यात 252 जणांचे अर्ज स्वीकारुन त्यापैकी  188 अर्जदारांना जवळपास 56 लक्ष रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार विभागाच्या ई-श्रम नोंदणी मध्ये रायगड जिल्ह्यातील एकूण 9 हजार 678 मस्त्यविक्रेते, मत्स्यसंवर्धक, मच्छीमार, मत्स्यकामगार व मत्स्य व्यवसाय अनुषंगिक कामांशी प्रत्यक्ष सहभाग असलेल्या कामगारांची नोंद करण्यात आली आहे.

मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि सनियंत्रण समितीच्या निर्देशानुसार माथेरान शहरात पर्यावरण पूरक ई-रिक्षा चाचणी यशस्वीपणे संपन्न झाली.आपल्या जिल्ह्यातील महत्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान शहरातील पर्यटकवाढीस यामुळे निश्चितच मदत होणार आहे.   

जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने कातकरी उत्थान अभियानांतर्गत "सप्तसूत्री"च्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यात 233 शासकीय दाखले वाटप शिबिरे आयोजित केली. या माध्यमातून 70 हजार 926 आदिवासी बांधवांना विविध प्रकारचे शासकीय दाखले दिले आहेत.  तर या आदिवासी बंधू-भगिनींच्या उत्तम आरोग्यासाठी 210 आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून 32 हजार 347 आदिवासी बंधू-भगिनींची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.

शाळाबाह्यअनियमित व स्थलांतरीत मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष शोध मोहीम राबविण्यात आली.

 माझी वसुंधरा अभियान तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ सागर, सुरक्षित सागर अभियानांतर्गत जिल्ह्यात  अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर या समुद्रकिनाऱ्यांवर शासकीय अधिकारी-कर्मचारी, नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहिमा संपन्न झाल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत बॉब कॅट हे बीच क्लिनिंग मशीन जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या मशिनमुळे जिल्ह्यातील समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी निश्चितच मदत होईल, असा विश्वास मला वाटतो.

                       मिशन 5.25 लक्ष वृक्ष वन महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील नागरिकस्वयंसेवी संस्था तसेच विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन मोहिमेत सक्रिय सहभागी होवून निसर्गाचा समतोल राखण्यात योगदान द्यावे, असे आवाहन मी सर्वांना करतो. वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत वनमहोत्सव सन 2022-23 चा शुभारंभ कुरुळ दत्त टेकडीअलिबाग येथे नुकताच करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सामाजिक वनीकरण विभागामार्फत 9 लाख 50 हजार बांबू रोपे तयार करण्यात आली असून 3 लाख 48 हजार 948 इतकी लागवड करण्यात आली आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मे ते जुलै 2022 या कालावधीत 2 हजार 169 शेतकऱ्यांच्या एकूण 1 हजार 78 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली असून यामध्ये प्रामुख्याने आंबा-820 हेक्टर, काजू- 165 हेक्टर आणि नारळ 43 हेक्टर अशा विविध फळपिकांच्या लागवडीचा समावेश आहे. याचबरोबर प्रायोगिक तत्वावर 1 हेक्टर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूट या पिकाचीदेखील लागवड करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रमुख पीक भात असून येथील शेतकऱ्यांसाठी यांत्रिक पध्दतीने भातलागवडीची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली.  कृषी संजीवनी सप्ताहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 1 हजार 348 गावांमध्ये तब्बल 1 हजार 517 कार्यक्रमांमधून 24 हजार 354 शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. येथील शेतकऱ्यांना एकूण 10 हजार भाजीपाला बियाणे किटचे वाटप करण्यात आले. 

रायगड जिल्ह्यात 100 वर्षे आधीपासून लागवडीची परंपरा जोपासलेल्या अलिबागच्या गोड पांढऱ्या कांद्याचा शासनाच्या भौगोलिक मानांकन पत्रिकेमध्ये जी.आय. उत्पादन म्हणून समावेश झाल्याबद्दल सर्व रायगडवासियांचे अभिनंदन करून ते म्हणाले की,  यामुळे आपल्या येथील शेतकऱ्यांना देशासह जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविणे शक्य होणार आहे.

राज्यातील युवक युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात सन-2019-20 पासून अद्यापपर्यंत एकूण 149 प्रकल्पांरिता राज्य शासनाकडून एकूण 307.51 लक्ष रुपये इतके आर्थिक अनुदान वाटप करण्यात आले आहे. सन 2022-23 या वर्षासाठी रायगड जिल्ह्याकरिता एकूण 800 प्रकरणांचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले असून एकूण 308 प्रकरणे जिल्हा कार्यबल समितीद्वारे बँकेकडे मंजूरीकरीता पाठविण्यात आली आहेत. यातील 54 प्रकरणांना बँकेने प्रत्यक्ष मंजूरी दिलेली असून या प्रकरणांची एकूण प्रकल्प किंमत 280.38 लक्ष रुपये इतकी आहे. नागरिकांमध्ये अलिबागउरणपनवेलरोहामाणगावमहाडश्रीवर्धन म्हसळा व मुरुड या तालुक्यात कार्यशाळेद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात 333.59 किलोमीटर लांबीच्या 93 रस्त्यांची कामे मंजूर असून त्यापैकी 325.44 किलोमीटर लांबीच्या 91 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. तर मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेंतर्गत सन 2015-16 ते 2019-2020 या 5 वर्षाच्या कालावधीत आत्तापर्यंत एकूण 446.928 किलोमीटर लांबीच्या 153 रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे.  त्यापैकी 359.331 किलोमीटर लांबीच्या  102 रस्त्यांची कामे  पूर्ण झाली आहे. सन-2021 मध्ये रायगड जिल्ह्यात 170 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे द्दिष्ट मंजूर झाले आहे.

केंद्र शासनाच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत जिल्ह्यात पोर्टेबिलिटीने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 4 लाख 44 हजार 186 इतकी आहे. कोविड-19 विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने एप्रिल 2020 पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली. जिल्ह्यात साधारणत: 17 लाख 67 हजार 931 लाभार्थ्यांना दरमहा मोफत 5 किलो अन्नधान्य देण्यात येते. या योजनेमुळे गरीब, गरजू, कामगार, बेरोजगार, स्थलांतरित, असंघटित क्षेत्रातील कामगार लोकांना दरमहा मोफत अन्नधान्य मिळाल्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न सुटला आहे, याबद्दल समाधान व्यक्त करून डॉ.कल्याणकर पुढे म्हणाले की, रायगड जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस जोडणी घेतलेले एकूण 62 हजार 801 लाभार्थी आहेत. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी 1 हजार 570 इतका इष्टांक होता पण प्रत्यक्षात नव्याने 1 हजार 790 गॅस जोडणी दिली असल्याने जिल्ह्यात 114 टक्के अतिरिक्त गॅस जोडणी झालेली आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत विविध प्रशिक्षण घेत असलेल्या उमदेवारांची  संख्या 700 असून यामध्ये 175 उमेवारांचे यशस्वीपणे मूल्यांकन झाले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानातील कोर्सचे प्रशिक्षण घेत असलेल्या उमदेवारांची संख्या 837 असून त्यापैकी 710 उमेदवारांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे.

             डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये 231 संस्थांमधील 24 हजार 785 सभासदांना 217.12 लक्ष रुपये तसेच 7 राष्ट्रीयकृत बँकाच्या 264 सभासदांना 3.69 लक्ष रुपये इतकी रक्कम त्यांच्या खाती जमा करण्यात आली आहे.

या वर्षात 2 बँका व 14 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अशा एकूण 16 संस्थांमधील 1 हजार 55 सभासदांना 9.98 लक्ष रुपये इतकी रक्कम त्यांच्या खाती जमा करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 5 हजार 946 सहकारी संस्थांपैकी 130 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. सन 2021 या आर्थिक वर्षात दि.30 सप्टेंबर 2021 अखेर शेतकऱ्यांना 163.89 कोटी रुपये इतके खरीप पीक कर्ज वाटप केलेले आहे. तसेच रब्बी हंगामामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जुलै महिनाअखेर 55.30 कोटी रुपये इतके रब्बी पीक कर्ज वाटप झालेले आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत रायगड जिल्हयातील 130 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील 8 हजार 277 सभासदांना जिल्ह्यातील विविध बँकामार्फत 44.39 कोटी रुपये इतकी रक्कम त्यांच्या बँक कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे.

मतदारयादी प्रमाणीकरण करण्यासाठी आधारक्रमांकांच्या माहितीबाबतचे नमुना 6 ब अर्ज भरुन घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम सुरु असून मतदारांनी या मोहिमेस अधिकाधिक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मी आपणा सर्वांना करतो. 

जिल्ह्यात मेरीटाईम बोर्डामार्फत केंद्र पुरस्कृत सागरमाला ही योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत काशिद येथे पर्यटकांसाठी जेट्टी बांधणे, करंजा येथील रो-रो जेट्टीकरिता पोचमार्ग बांधणे, ही कामेही प्रगतीपथावर आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यातील हे विकासपर्व असेच सुरु राहील असा विश्वास व्यक्त करून उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.

या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका कल्पना साठे यांनी केले. या सोहळ्यासाठी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

परिवर्तन” या कार्यपुस्तिकेच्या तिसऱ्या अंकाचे प्रकाशन संपन्न

जिल्हा प्रशासनाने केलेले विविध लोकोपयोगी उपक्रम,कार्यक्रमांवर आधारित “परिवर्तन (अंक 3 रा)” या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी संपन्न झाले.

 

कातकरी उत्थान अभियानांतर्गत सप्तसूत्री

लघुपट मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शित

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला आणि सुधांशू शिवपूजे दिग्दर्शित व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण या कार्यालयाची निर्मिती असलेला सप्तसूत्री” हा लघुपट उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. या लघुपटात प्रमुख भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते भालचंद्र (भाऊ) कदम हे आहेत. या लघुपटाच्या निर्मितीस प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरुण पवार तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे सहकार्य लाभले आहे.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व विविध स्पर्धेतील विजेत्यांचा

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धकांना व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंत लोकांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 10 किलोमीटर पोलीस दौड आयोजित करण्यात आली होती. त्यातील विजेते पोलीस शिपाई करण कृष्णा पाटील, महिला पोलीस शिपाई समीना मुन्ना पटेल, आणि पोलीस हवालदार निलेश रामचंद्र नाईक यांना पदक देऊन गौरविण्यात आले.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ॲक्ट्रेक टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर, ता.पनवेल, जेएसडब्ल्यू संजीवनी हॉस्पिटल, डोलवी, ता.पेण या रुग्णालयांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

श्रुती विपुल राहुल, उसरली खुर्द, ता.पनवेल, माही अब्दुल खान, सुकापूर रोड, नवी मुंबई, मुक्तार खालिक खान, सुकापूर रोड, ता.पनवेल, अन्नू विपुल मालविया, नवी मुंबई, स्वप्नाली राकेश रामचंद्र, उसरली खुर्द, प्रेम नगर, ता.पनवेल या तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

श्री.प्रदीप जगताप, उप अधीक्षक भूमी अभिलेख, अलिबाग, श्री.नरेंद्र नाईक, मुख्यालय सहाय्यक, पनवेल, श्री.देवेंद्र मांजरे, निमतानदार, खालापूर, श्री.सागर नाखवा, भूकरमापक, माणगाव, श्री.गणेश डोंगरे, निमतानदार, महाड,  श्री.गिरीश राणे, भूकरमापक, कर्जत यांना रोव्हर्स मशीनचे वाटप करण्यात आले. या अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या रोव्हर्स मशीनमुळे जमीन मोजणी जलद व अचूकपणे करणे शक्य होणार आहे.

बॅडमिंटन स्पर्धा अधिकारी व कर्मचारी:- पुरुष एकेरी- सूवर्णपदक- श्री. विनोद सुखदेव शिंगाडे, रौप्य पदक- श्री.सत्यवान उद्धव पाटील, महिला एकेरी- सूवर्णपदक- श्रीमती वनिता नामदेव पाटील, रौप्य पदक- श्रीमती भूपाली नाईक, पुरुष दुहेरी- सुवर्णपदक- श्री.सचिन लक्ष्मण शेजाळ, श्री.विनोद सुखदेव शिंगाडे, रौप्य पदक- श्री.अतुल झेंडे, श्री.अमोल शिवा, महिला दुहेरी- सूवर्णपदक- श्रीमती वनिता नामदेव पाटील, श्रीमती भूपाली नाईक, रौप्य पदक- श्रीमती हेमलता चंद्रशेखर कुरसुंगे, श्रीमती शाहीला शब्बीर नायकवडे.

 बॅडमिंटन खुला गट स्पर्धा:- पुरुष दुहेरी- सूवर्णपदक- कु.प्रसाद चंद्रकांत सिदुसरे, कु.प्रतीक चंद्रकांत केळुसकर, रौप्य पदक- श्री.जुनेद अल्ताफ घट्टे, श्री.सुशांत मधुकर पळसणकर, कांस्यपदक- कु.ओमकार भगवान मालवाणी, कु.शुभम विलास पाटील.

 कॅरम महिला दुहेरी स्पर्धा:- श्रीमती प्रतिज्ञा म्हात्रे, श्रीमती पुनम म्हात्रे, कॅरम महिला एकेरी स्पर्धा- श्रीमती दर्शना पाटील, कॅरम पुरुष दुहेरी स्पर्धा- श्री.गणेश लोहार, श्री.प्रसाद म्हात्रे, कॅरम पुरुष एकेरी स्पर्धा- श्री.प्रभाकर तळप.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक