पोलादपूर तालुक्यातील रानवडी बुद्रुक अन् देवपूरवाडीची स्वदेस फाऊंडेशनतर्फे झाली स्वप्नातील गाव म्हणून निवड

 


 

अलिबाग,दि.24 (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त "स्वप्नातील गाव" म्हणून पोलादपूर तालुक्यातील रानवडी बुद्रुक आणि देवपूरवाडी ही गावे स्वदेस फाऊंडेशनतर्फे स्वप्नातील गावे म्हणून घोषित करण्यात आली. स्वदेस फाऊंडेशनचे महाप्रबंधक तुषार इनामदार यांनी दोन्ही गावांमध्ये जाऊन ग्रामसुधार कमिटीला या स्वप्नातील गाव निवडीचे पत्र सुपूर्द केले.

             पोलादपूर तालुक्यातील काटेतळी गावाने ग्रामस्वच्छता अभियानामध्ये राज्याची सुमारे 1 कोटीपर्यंत बक्षिसे प्राप्त करून गावाचा विकासात्मक कायापालट केला. त्यासाठी आवश्यक ग्रामस्थांची एकता रानवडी बुद्रुक येथील ग्रामस्थांमध्येही दिसून येत आहे. यामुळे रानवडी बुद्रुक या गावाने तंटामुक्ती, निर्मलग्राम, वनग्राम तसेच अन्य पारितोषिके पुरस्कार प्राप्त केल्याने आता स्वप्नातील गाव संकल्पनेद्वारे स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून या गावाने विकास साध्य करावा, असे मत रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केले.

              यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्या सुमन कुंभार, स्वदेस फाऊंडेशनचे महाप्रबंधक तुषार इनामदार, प्रभारी गटविकास अधिकारी हंबीर, वैद्यकीय अधिकारी डॉ.बागतकर, बोरावळे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच वैभव चांदे, माजी सरपंच निवृत्ती उतेकर, समितीचे अध्यक्ष पोलीस पाटील पांडुरंग जाधव, स्वदेसचे प्रदीप साठे, कुमारी खेडेकर, सुजल अहिरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे, तलाठी श्री.वैराळे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

              यावेळी निवृत्ती उतेकर आणि पांडुरंग जाधव यांनी मनोगतामध्ये स्वदेस फाऊंडेशनकडून एलइडी पथदिवे तसेच आरोग्यविषयक सुविधा मिळण्याविषयी विनंती केली.   

                बोरावळेचे सरपंच वैभव चांदे यांनी, रानवडी बुद्रुक गावासाठी 58 लाखांची पाणी योजना मंजूर झाली असून याबाबतची निविदा लवकरच प्रसिध्द होईल, अशी माहिती दिली.

             यावेळी स्वदेस फाऊंडेशनचे महाप्रबंधक तुषार इनामदार यांनी स्वदेस सिनेमामधील शाहरूख खान या नायकाने स्वत:च्या गावामध्ये जाऊन विविध योजना कार्यान्वित करून गावाचा विकास साधल्याच्या सत्यकथेवर आधारित जनसहभागाद्वारे खेडेगावांचा विकास करण्याची मानसिकता चित्रपटाचे निर्माते रॉनी आणि झरीना स्क्रूवाला यांच्यामार्फत खेडोपाडी रूजविण्याचा प्रयत्न होत असून सरकारी योजना, नागरिक आणि स्वदेस अशा तिघांच्या संयुक्त सहकार्यातून गावांचा विकास साधला जाणार आहे. या स्वप्नातील गावांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील तसेच देशातील अन्य गावांनीदेखील आपापल्या गावांचा विकास साधावा, अशी अपेक्षा असल्याने रानवडी गावानेही असा आदर्श निर्माण करावा, असे मत व्यक्त केले.

प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते स्वप्नातील गाव फलकाचे अनावरण करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत ग्रामसुधार समितीच्या सदस्यांनी केले.

देवपूरवाडीमध्ये स्वप्नातील गाव होण्याची पुरेपूर क्षमता

                                                     - महाप्रबंधक तुषार इनामदार

            पोलादपूर तालुक्यातील वझरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील देऊळवाडी, गोळेगणी ग्रामपंचायत हद्दीतील येरूणकरवाडी आणि बोरावळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील रानवडी बुद्रुक तसेच देवपूर ग्रामपंचायत हद्दीतील देवपूरवाडी या चार गावांचा स्वप्नातील गाव स्पर्धेतील पहिल्या 75 गावांमध्ये समावेश झाला आहे. यामध्ये देवपूरवाडी या गावाने पाणी योजना, रस्ते दुरूस्ती, सुका कचरा -ओला कचरा, खेडयाकडे परत चला, शिक्षण व महिला आरोग्य अशा सर्वच क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी केली असल्याने देवपूरवाडीमध्ये स्वप्नातील गाव होण्याची पुरेपूर क्षमता स्पष्ट दिसून येत असताना सातत्य टिकवून धरण्यासाठीच आता ग्रामस्थ व महिलांनी प्रयत्न करावे, असे आवाहन स्वदेस फाऊंडेशनचे महाप्रबंधक तुषार इनामदार यांनी याप्रसंगी केले.

                यावेळी तरूण व्यापारी राहुल जाधव यांनी, शहरामध्ये जाऊन मिळेल ते काम करून उपजीविका करताना घरी काय पाठवायचं आणि स्वत:चे कसे भागवायचे, अशा विवंचनेमध्ये तरूण शहरातून गावाकडे परत येण्यास धजावत नसताना आपण स्वत: पूर्ण विचार करून पोलादपूर शहरामध्ये छोटा किराणा मालाचा व्यवसाय सुरू करून निर्माण केलेल्या आदर्शामुळे गावातील तरूणांना प्रेरणा मिळाली आहे. सुमारे 200 तरूणांनी गावातील विकासकामी हातभार लावल्याने बस स्टॉप, पाणी योजना असो अथवा अन्य विकास कामांची दुरूस्ती यासाठी प्रत्येकाने हातभार लावला. गावाकडे आल्याचा निर्णय बरोबर असल्याचे समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

             अध्यक्ष सत्यवान महाडीक यांनी गावाने साथ दिली आणि शासनासोबत स्वदेस फाऊंडेशनने मदतीचा हात दिल्याने जो बदल गावामध्ये घडत आहे,  तो आता सणासुदीला गावाकडे येणाऱ्या ग्रामस्थांकडून कौतुकाने लक्षात घेऊन सहकार्याचा हात पुढे केला जात आहे. आमच्या देवपूरवाडी गावाला आम्ही नगरी असे म्हणू शकतो, एवढा विकास होत आहे, असे सांगून आरोग्यविषयक सुविधा तसेच मंदिरपरिसरात विद्युत रोषणाई तसेच स्ट्रीट लाईट सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

             यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी हंबीर यांनी विविध विकासकामांसाठी पाठपुरावा करण्याचे आणि मंजूर करून आणण्याचे काम आम्ही शासन स्तरावर करू, स्वदेस फाऊंडेशनकडूनही याकामी मदतीचा हातभार लागेल, फक्त ग्रामस्थांनी स्वप्नातील गाव बनविण्यासाठी सातत्य ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

              देवपूर शिवमंदिरामध्ये सत्यवान महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये प्रभारी गटविकास अधिकारी हंबीर, स्वदेसचे प्रदीप साठे, कुमारी खेडेकर, सुजल अहिरे, सुधीर वाणी, ग्रामसेविका शिल्पा कोंढाळकर, गवळी समाज अध्यक्ष पपू ढेबे, ग्रामसुधार समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आशासेविका रेश्मा जाधव, तरूण व्यापारी राहुल जाधव यांच्यासह अध्यक्ष सत्यवान महाडीक यांनीही आपली मनोगते मांडली.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक