पनवेल येथे एच.आय.व्ही. संक्रमित महिलांसाठी संमेलन संपन्न

 



 

अलिबाग,दि.30(जिमाका) :- आधार विहान प्रकल्प, पनवेल यांच्या वतीने व युनायटेड वे इंडियाच्या सह्योगाने, पंचायत समिती हॉल, पनवेल येथे (दि.26 ऑगस्ट) रोजी एच.आय.व्ही. संक्रमित महिलांसाठी संमेलन आयोजित करण्यात आले होते.

 या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी, रायगड जिल्हा, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था  संजय माने, पनवेल पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी संजय भोये, वैद्यकीय अधिकारी, धीरूभाई अंबानी ए.आर.टी सेंटर,पनवेल डॉ.पर्णा बारडोलोई, समोपदेशक, धीरूभाई अंबानी ए.आर.टी.सेंटर,पनवेल, समोपदेशक, आय.सी.टी.सी.सेंटर, पनवेल, सौ. तारा इंगळे, श्री. विकास कोंपले, प्रकल्प संचालक, विहान प्रकल्प, पनवेल, दिलीप विचारे, अध्यक्ष, आधार संस्था सौ. श्रद्धा जाधव, वरिष्ठ अधिकारी, युनायटेड वे इंडिया जुही जस्वाणी  आदि उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकल्प व्यवस्थापक, आधार विहान प्रकल्प, पनवेल  सुनील पटेल यांनी विहान प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती दिली व आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा प्रमुख अतिथींसमोर मांडला. त्यानंतर या कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी आपले विचार व्यक्त केले.

वैद्यकीय अधिकारी, धीरूभाई अंबानी ए. आर. टी. सेंटर पनवेल डॉ.पर्णा बारडोलोई यांनी एच. आय. व्ही बाधित व्यक्तींचा औषधोपचार व पोषक आहाराविषयी चर्चा केली. नियमित सांगितलेल्या वेळेवर ए.आर.टी.च्या गोळ्या घेतल्या व योग्य पोषक आहार घेतला तर CD4 वाढते व वायरल लोड सुद्धा कमी होते त्यामुळे संक्रमित व्यक्ती ही सामान्य जीवन जगू शकतो  व त्याबद्दलची विशेष काळजी आधार विहान प्रकल्प व ए. आर. टी. सेंटर घेत आहे,असे सांगितले.

 गटविकास अधिकारी संजय भोये यांनी उपस्थितांना महाराष्ट्र शासनातर्फे  राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत माहिती दिली.त्यामध्ये विशेष म्हणजे दुर्धर आजार पीडित महिलांसाठी विशेष बचतगट व अनेक प्रकारचे लघु उद्योग व त्यासाठी लागणारे प्रशिक्षण यासंबंधीचा समावेश होता. त्यांनी आधार विहान प्रकल्पाचे व्यवस्थापक सुनील पटेल यांना सांगितले की, ग्रामीण विभागातील ज्या बाधित महिलांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येईल त्यासाठी पंचायत समिती आधार विहान प्रकल्प ला सर्वोतोपरी मदत करेल.

   जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. संजय माने यांनी उपस्थित महिलांना आश्वस्त केले की, एच. आय.व्ही. बाधित व्यक्तींना शासकीय योजना घेत असताना काही अडचणी आल्या तर त्याचे लवकरात लवकर निरसन करून त्याचा लाभ त्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. यावेळी त्यांनी आधार विहान प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांचे रायगड जिल्ह्यातील एच.आय. व्ही. बाधित लोकांसाठी कोविड काळात केलेल्या कामाबद्दल विशेष कौतुक केले. सगळीकडे लॉकडाऊन असूनही जिल्ह्यातील खेडोपाड्यात एच.आय.व्ही.बाधित रुग्णांना घरपोच औषध उपलब्ध करून दिले व आधार विहान प्रकल्पाला जिल्हा स्तराहून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल,असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमात काही संक्रमित महिलांनी आपले अनुभव कथन केले.  शेवटी युनायटेड वे इंडिया तर्फे जुही जस्वाणी यांच्या हस्ते उपस्थित महिलांना हायजेनिक मेडिकल किटचे वाटप करण्यात आले.

  हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी आधार संस्था संचालक विजय नायर, प्रकल्प व्यवस्थापक सुनील पटेल, सौ. मेघा गायकवाड, श्रद्धा पवार (हेल्थ चॅम्पियन), अनु शेख, मनाली येरूनकार, स्वप्नाली मोहिते, सौ.जागृती मॅडम, हेमंत माळी, भगवान सावंत, प्रकाश चव्हाण, धम्मपाल टापरे व इतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक