“महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता” यात्रेचे आयोजन


 

अलिबाग, दि.09 (जिमाका):- राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यतापूर्ण स्टार्टअप धोरण 2018 जाहीर करण्यात आले आहे. नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते परंतु काही वेळा योग्य मार्गाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्ट-अपच्या विकासाकरिता पोषक वातावरण निर्मिती करून त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरिता, तसेच राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत संपूर्ण राज्यात "महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे" आयोजन करण्यात आले आहे.

या यात्रेची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण करणाऱ्या प्रतिभागींपैकी प्रत्येक जिल्ह्यामधून अव्वल 3 विजेते घोषित केले जातील. तसेच सर्वोत्तम 10 (अव्वल 3 विजेत्यांसह) सहभागींना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळेल. जिल्हास्तरावरील पारितोषिकांची रक्कम (प्रथम: 25 हजार, द्वितीय: 15 हजार, तृतीय: 10 हजार) अशी आहे.

ही यात्रा रायगड जिल्ह्यात दि.22 ते 25 ऑगस्ट 2022 रोजी दाखल होणार आहे आणि सादरीकरण (Bootcamp) दि.12 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. या यात्रेत सहभाग नोंदविण्यासाठी विद्यार्थी व नवउद्योजक हे जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राच्या ठिकाणी तसेच www.msins.in या संकेतस्थळावर आपला अर्ज सादर करु शकतात. तसेच सहभागासाठी http://bit.ly/EntrepreneurSpeaker या गुगल फॉर्मवर उमेदवारांनी नोंदणी करावी.

तरी रायगड जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजक उमेदवारांनी या यात्रेत सहभाग नोंदवावा तसेच याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02141-222029 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा allbagrojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अ.मु.पवार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक