“महिला आयोग आपल्या दारी” उपक्रमांतर्गत दि.16 सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन येथे होणार जनसुनावणी

 

अलिबाग,दि.08 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दि.16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीस महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर या उपस्थित राहणार आहेत. 

तक्रारदार पिडीत महिलेस स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी यासाठी, कोणतीही पिडीत महिला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकेल. ज्या महिलांचे प्रकरण न्यायालयात सुरु असेल अथवा न्यायप्रविष्ठ असेल, अशी प्रकरणे या जनसुनावणीत स्विकारली जाणार नाहीत.

रायगड येथील पोलीस स्टेशन आवारातील महिला समुपदेशन, सहाय्य कक्ष, भरोसा सेल तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयातील रायगड जिल्ह्यांच्या तक्रारी व इतर सेवाभावी संस्थेचे समुपदेशन केंद्र यांच्याकडील प्रकरणे या जनसुनावणीत ठेवण्याच्या सूचना आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.

देशातील महिला आणि बालकांच्या पोषणाची स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने सन 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोषण अभियान सुरु केले होते. पोषण अभियानात बालके, किशोवयीन, गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्यामध्ये पोषण विषयक जागरुकता आणि प्रतिसाद वाढविण्याच्या अनुषंगाने सन 2018 पासून सप्टेंबर महिन्यात सर्व भागधारकांसोबत एकत्रितपणे राष्ट्रीय पोषण माहे म्हणून साजता केला जातो. यानुषंगाने जनसुनावणीच्या दिवशी पोषण पंचायत अंतर्गत चर्चा सत्र आयोजित करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.

राज्य महिला आयोगामार्फत आयोजित या जनसुनावणीकरिता जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी क्षेत्रातील समस्याग्रस्त महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, तसेच अधिक माहितीसाठी परिविक्षा अधिकारी योगीराज जाधव (7798171777 / 9970122623) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक