मतदाराचा आधार क्रमांक मतदार यादीतील तपशिलाशी ऐच्छिक जोडणी कार्यक्रम जाहीर

 

अलिबाग,दि.08 (जिमाका):- मा. भारत निवडणूक आयोगाकडील दि. 23 जून 2022 च्या पत्रान्वये केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांच्याद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. त्यानुषंगाने मतदार यादी संदर्भातील नमुना अर्ज 6, 7, 8 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामधील कलम 23 नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. यासाठी मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 B नुसार फॉर्म नं. 6 ब तयार करण्यात आला आहे. या सुधारणांची अंमलबजावणी दि. 01 ऑगस्ट, 2022 पासून लागू झालेली आहे.

मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांना मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरुपात आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. तसेच अधिसूचना दि. 17  जून, 2022 मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार दि.01 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्ती त्याचा आधार क्रमांक उपलब्ध करुन देऊ शकतो...

               विद्यमान मतदारांकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांशी ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे, हा आहे. या कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरुन आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे, हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे, असेही आयोगाने स्पष्ट केलेले आहे.

              मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच, मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध आहे. तसेच अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रतीदेखील संबंधित तहसिल कार्यालयाकडून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठीची सुविधा पोर्टल/ ॲपच्या माध्यमातून स्व-प्रमाणीकरण व स्व- प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरता येत आहे.

             स्व-प्रमाणीकरण-: भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल/ ॲपच्या माध्यमातून मतदार ऑनलाईन पध्दतीने अर्ज क्र. 6 ब भरुन आधार क्रमांक नोंदवू शकतो आणि UIDAI कडे नमूद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त OTP द्वारे आधारचे प्रमाणीकरण करू शकतो. तथापि तपशिलात फरक असल्यास प्रमाणिकरण अपयशी ठरण्याची शक्यता आहे.

              स्व-प्रमाणीकरणाशिवाय-: जर मतदारास स्व-प्रमाणिकरण करावयाचे नसल्यास किंवा वरीलप्रमाणे प्रमाणिकरण अपयशी ठरत असल्यास, मतदार स्व-प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन पध्दतीने त्याचा अर्ज क्र. 6 ब भरून त्यासोबत योग्य दस्तावेज सादर करु शकतो.

                घरोघरी भेट देऊन मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र. 6 ब द्वारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत दि.11 सप्टेंबर, 2022 रोजी पहिले विशेष शिबिर सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.

             दि. 01 ऑगस्ट 2022 पासून सुरु झालेल्या मा. भारत निवडणूक आयोगाच्या उपक्रमास सर्व स्तरातून सहकार्य मिळावे व सर्व मतदारांनी आपल्या मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक संलग्न करून घेण्याचे अगर प्रमाणिकरण करून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक