“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” मोहिमेंतर्गत महिलांनी आरोग्य तपासणी शिबिरांचा लाभ घ्यावा -मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

 

अलिबाग,दि.26 (जिमाका):- महिला ही घराचा केंद्रबिंदू असते. तिच्या आरोग्याबाबतचे महत्व लक्षात घेऊन महिलांच्या आरोग्य सुरक्षितेसाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही मोहीम राबविण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या मोहिमेंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही मोहीम दि.26 सप्टेंबर 2022 पासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद गवई, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कटारे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर बालरोगतज्ज्ञ वर्ग 1 डॉ.रोकडे, पॅथॉलॉजिस्ट डॉ.शीतल जोशी, मेट्रन अनिता भोपी, असिस्टंट मेट्रन सीमा पाटील,नर्सिंग ऑफिसर गायत्री म्हात्रे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ.किरण पाटील म्हणाले की, यंदाच्या नवरात्रौत्सवामध्ये महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. या निमित्ताने राज्यातील 18 वर्षांवरील युवती, गरोदर महिला, मातांची तपासणी करण्यात येणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अशी संकल्पना घेवून विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या सर्व युवती, गरोदर महिला आणि मातांची आरोग्य तपासणी करून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दि.26 सप्टेंबर ते दि.5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत रोज सकाळी 9 ते दुपारी 2 ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये महिलांना गंभीर आजार असल्याचे आढळून आल्यास त्यांना संदर्भसेवेसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले जाणार आहे. तसेच स्थानिक पातळीवरही आजारी महिलांवर उपचार केले जाणार आहेत.

याशिवाय मानव विकास मिशन अंतर्गत जास्तीत जास्त आरोग्य शिबिरे घेतली जाणार असून त्यामध्ये विशेष तज्ज्ञांमार्फत आरोग्य तपासणीचे नियोजन केले जाणार आहे. तसेच गावपातळीवर अंगणवाडी केंद्रांमधूनही महिलांची तपासणी केली जाणार असून त्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. या उपक्रमामुळे महिलांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे.नवरात्र उत्सव काळात या अभियानात आरोग्य विभागाबरोबरच महानगरपालिका, नगरपालिका/पंचायत, आदिवासी विकास प्रकल्प, महिला व व बालकल्याण विभाग, शालेय शिक्षण, ग्रामविकास विभाग यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत दररोज माता आणि महिलांची तपासणी होईल. आजारी महिलांना उपचार व आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर संदर्भित करण्यात येईल. उपकेंद्र किंवा आरोग्य वर्धिनी केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी यांनी तपासणी करावयाची असून यासाठी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीमध्ये तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. ग्रामीण रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व स्त्रीरोग तज्ज्ञांनी तपासणी करावयाची असून या कालावधीत मानव विकास कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक तज्ज्ञांची शिबिरे घेण्यात येणार आहेत. भरारी पथकाच्या माध्यमातून 18 वर्षांवरील युवती व महिलांची आरोग्य तपासणी केली जाईल. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकानेही शाळांमध्ये आरोग्य तपासणी करावयाची आहे. सोनोग्राफी शिबिरे आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांबाबतही या दरम्यान माहिती देण्यात येणार आहे, असे डॉ.किरण पाटील यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी सांगितले की, या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 54 प्राथमिक आरोग्य केंद्रात, 280 आरोग्य केंद्रात 2 भरारी पथके यांच्यासह इतर आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत 21 वर्षावरील सर्व महिला माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा, या व इतर आरोग्य सेवासुविधा प्रत्येक गावात एक दिवस आरोग्य व पोषण दिनाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत आयोजित तपासणी शिबिरात महिलांची वजन, उंची मोजण्यात येणार असून त्यांची रक्त तपासणीदेखील केली जाणार आहे. माता व बालकांचे लसीकरणही यामध्ये केले जाईल.

शेवटी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद गवई यांनी आभार प्रदर्शन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक