पीक पेरणीची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा


अलिबाग,दि.12 (जिमाका):- पीक पेरणीची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी उपलब्ध करुन देण्याचा ई-पिक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. म्हसळा तालुक्यामध्ये ई-पिक पहाणी प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांमध्ये गावपातळीवरील कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत गावोगावी बैठक घेऊन जनजागृती करण्यात आलेली आहे. ई-पिक पाहणी मोबाईल अॅपद्वारे होणार असल्यामुळे म्हसळा तालुक्यामध्ये माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालय, आय.टी.आय. विद्यालय येथील विद्यार्थ्यांनाही पीक पाहणीची माहिती व मोबाईल अॅपचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यानुषंगाने शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन म्हसळा तहसिलदार समीर घारे यांनी केले आहे.

मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांच्या पिकाची पिक पाहणी प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना ई-पिक पाहणीबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये तसेच ई-पिक पाहणीचे काम प्रभावीपणे होण्यासाठी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय सनियंत्रण समिती गठीत करण्यात आलेली आहे.

शासनाच्या या महत्वपूर्ण, तसेच शेतकऱ्यांच्या लाभाकरिता ई-पिक पाहणी योजनेची 100% अंमलबजावणी करण्यासाठी म्हसळा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी स्थानिक पातळीवरील तलाठी कर्मचारी यांच्या सहकार्याने त्यांच्या पिकाची ई-पिक पाहणी मोबाईल अॅपद्वारे करुन घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

ई-पिक पाहणी करणे हे शेतकरी बांधवांसाठी आवश्यक असून त्यामुळे शेतकरी बांधवांना पिक विमा प्रक्रिया आणि पिक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. शेतकरी बांधवांना आवश्यकता भासल्यास त्यांना पिक कर्ज मिळू शकते. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्यासाठी मदत मिळेल. एखाद्या वेळेस शेतकऱ्याचे नुकसान झाले, जसे पूर, नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाले तर या ई-पिक पाहणीमुळे शेतकरी बांधवांना योग्य मदत मिळेल. जिल्ह्यात, तालुक्यामध्ये तसेच प्रत्येक गावामध्ये एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची आकडेवारी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ई-पिक पाहणी ॲपमुळे शेतकऱ्यांच्या पिक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे ना शासनाची फसवणूक. राज्यातील आर्थिक पाहणी करणे आणि कृषी या क्षेत्राचे योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे, असे विविध प्रकारचे लाभ मिळणार आहेत.

तरी म्हसळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे व म्हसळा तहसिलदार समीर घारे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक