“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” कार्यक्रमांतर्गत स्मार्ट ई-क्लासरुम चे उद्घाटन व शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 

अलिबाग,दि.29 (जिमाका):- माणगाव तालुक्यातील शासकीय निवासी शाळा जावळी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांकरिता स्मार्ट ई-क्लासरुम (Smart E-classroom) चे ऑनलाईन उद्घाटन मुंबई विभाग समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे व रायगड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.भरत बास्टेवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव व गृहपाल श्री.संदीप कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

शिक्षण पद्धतीत होणाऱ्या नवनवीन बदलानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, हे काळानुरूप अनिवार्य झाले आहे. त्यामुळे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्या प्रयत्नातून अनुसूचित जाती उपाययोजनेतून अत्याधुनिक पद्धतीचे ई-लर्निंग स्मार्ट क्लासरूम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये दृकश्राव्यद्वारे विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन करणे अत्यंत सोपे झाले आहे. खडू, फळा व डस्टर या साहित्याचा वापर न करता अत्यंत सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन घेणे व अभ्यासाचे उत्कृष्ट पद्धतीने दृढीकरण करणे आता अत्यंत सोपे झाले असल्याचे सहाय्यक आयुक्त श्री.जाधव यांनी नमूद केले. तसेच उपस्थित प्रत्येक शिक्षकांनी ई-लर्निंगचे प्रशिक्षण घेऊन मुलांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर व मुलांना अध्ययनात आवड निर्माण करण्यासाठी प्रत्येक विषयाचे पीडीएफ, इमेजेस, स्लाईड शो इ.चा वापर करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अभ्यासात आवड व रुची निर्माण करणे व परीक्षेचे तंत्रज्ञान अत्यंत सोप्या पद्धतीने कसे सोडवावे, याचे मार्गदर्शन केले.

तसेच सेवा पंधरवडा निमित्त शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा व स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी पारितोषिक प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. भविष्यात चांगले शासकीय अधिकारी व चांगले नागरिक होण्यासाठी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड