वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून रब्बी भाजीपाला व कडधान्य क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील

 


 

अलिबाग,दि.16(जिमाका):- या वर्षात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत ओढे नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. सध्या पावसाळा संपत आल्यामुळे ओढे नाले यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारे हाती घेण्यात यावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

             जुलै ते सप्टेंबर पावसाळा हंगाम संपल्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत नाले व ओढ्यांमधून पाण्याचा प्रवाह सुरू असतो हा पाण्याचा प्रवाह पारंपारिक पद्धतीने अडवून पाण्याचा साठा करून बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज काही अंशी भागवण्यासाठी उपलब्ध साधनांचा जसे की सिमेंट किंवा खताची मोकळी पोती, वाळू, माती, इत्यादीचा वापर करून बांधलेला बंधारा म्हणजे वनराई बंधारा होय. दहा मीटर लांबीचा व 1.20 मीटर उंचीचा वनराई बंधारा बांधण्यासाठी ३९ पोती आवश्यक असतात यातून 2 हेक्टर क्षेत्राकरिता संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध होऊ शकते. यामुळे रब्बी हंगामातील कडधान्य व भाजीपाला पिकांना याचा लाभ होणार आहे.

     जिल्ह्यामध्ये वनराई बंधारे बांधण्याची मोहीम माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असून याबाबत तांत्रिक मार्गदर्शन कृषी विभागाकडील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी हे क्षेत्रीय स्तरावर जागा पाहणी करून करणार आहेत. या मोहिमेत कृषी सेवा केंद्र चालक व निविष्ठा विक्रेते यांनी सक्रिय सहभाग घेऊन ग्रामस्तरावर हे वनराई बंधारे लोकसभागातून जास्तीत जास्त बांधण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक