“महिला आयोग आपल्या दारी” जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात- रुपाली चाकणकर यांचे आवाहन

 


 

अलिबाग, दि.14 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हयात दि.16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता, जिल्हा नियोजन भवन येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली असून आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर आणि सदस्या या स्वतः तक्रारीची सुनावणी घेणार आहेत.

               आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर या दि.16 सप्टेंबर 2022 रोजी रायगड जिल्हयाचा दौरा करणार आहेत. केंद्र शासनाकडून सप्टेंबर महिना पोषण महा म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधत आयोगाकडून पोषण पंचायत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दु.12 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात आहारतज्ज्ञ, स्त्री रोग तज्ञ, अंगणवाडी सेविका, महिला, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पारंपारिक खाद्यातून पोषक आहार यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानंतर दु. 3 वाजता महिला आयोग अध्यक्षा रायगड जिल्हयाची आढावा बैठक घेणार असून यावेळी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच आरोग्य, परिवहन, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. हे सर्व कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन, रायगड येथे होणार आहेत.

               महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते आहे. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग याद्वारे करीत आहे.

                अधिक माहितीसाठी श्रीमती सुनिता गणगे - 9702542071, शरद कोळेकर 7038630058 यांच्याशी  संपर्क साधावा. तसेच रायगड जिल्ह्यात होणाऱ्या जनसुनावणी अधिकाधिक महिलांना पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्या, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक