जंतापासून मुक्त.. होतील मुले सशक्त; 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम

 

अलिबाग,दि.07(जिमाका):- जिल्ह्यातील एक वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील मुलांना व मुलींना सोमवार, दि.10 ऑक्टोबर 2022 रोजी जंतनाशक गोळ्या नि:शुल्क देण्यात येणार आहेत. या गोळ्या सर्व मुलामुलींना अंगणवाडी व शाळा स्तरावर उपलब्ध असतील. या गोळ्या चावून किंवा लहान मुलांना पाण्यामध्ये विरघळवून देणे आवश्यक आहे, असे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.

जंतनाशक गोळी खाल्ल्याने रक्तक्षय कमी होतो, बालक आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे शाळेतील उपस्थिती वाढते, मुले क्रियाशील बनतात व मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, आरोग्य चांगले राहते, अल्बेडझोल च्या एका गोळीमुळे जंताचा नाश होण्यास मदत होते, असे लाभ होतात.

ग्रामीण भागामध्ये एकूण 4 लाख 60 हजार 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींना या गोळ्या सर्व शाळा व अंगणवाडीच्या ठिकाणी दि.10 ऑक्टोबर 2022 रोजी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याकरिता 4 लाख 70 हजार अल्बेडॅझोल गोळ्या ग्रामीण भागात वितरीत करण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागातील 3 हजार 468 अंगणवाडी केंद्र, 3 हजार 92 शाळा तसेच 758 इतर शैक्षणिक संस्थांमधून झील गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तत्पूर्वी जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पाटील यांनी महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग व आरोग्य विभाग यांना ही मोहीम यशस्वी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे व जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे तसेच जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री.राजेंद्र भने उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी तालुका स्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील या मोहिमेबाबतचे सर्व प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे सांगितले.

या मोहिमेत ग्रामीण भागातील एकूण 54 प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच 280 आरोग्य उपकेंद्रे या ठिकाणी कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी तसेच 3 हजार 400 अंगणवाडी सेविका आणि 1 हजार 775 आशा सेविका सहभाग नोंदविणार आहेत. तसेच शहरी भागामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय यांच्यामार्फतही मोहीम राबविण्यात येणार आहे.

ज्या मुलामुलींना कोणत्याही कारणाने दि.10 ऑक्टोबर 2022 रोजी जंतनाशक गोळी दिली नसेल तर त्यांना दि.17 ऑक्टोबर 2022 रोजी मॉप-अप राऊंडच्या वेळी गोळी देण्यात येणार आहे. 1 वर्ष आतील बालकांना गोळी देण्यात येऊ नये, 1 वर्ष ते 2 वर्ष वयोगटातील बालकांना अर्धी गोळी देण्यात यावी, अशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

तरी या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक