फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे मनाई आदेश जारी

 

 

अलिबाग,दि.14 (जिमाका):- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2022, माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम मा.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि.07 सप्टेंबर 2022 रोजीपासून आचारसंहिता अंमलात आली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत, परिमंडळ-2 मधील पनवेल तहसिल विभागांतर्गत पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या  हद्दीत खेरणे ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून या निवडणुकीत एकूण 04 प्रभागांमध्ये सरपंच पदाकरीता 02 सदस्य तसेच 11 सदस्य पदांकरिता एकूण 22 उमेदवार निवडणूक लढवित असून एकूण 01 इमारतीमधील 04 बुथवर दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 07.30 ते 17.30 वा. च्या दरम्यान मतदान होणार आहे.

 

या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी दि.17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 08.00 वा. पासून सुरु होणार असून मतमोजणी तहसिलदार कार्यालय, पनवेल येथे होणार आहे. दरम्यान मतपेटया वाटप करण्यात येणार असून मतदान झाल्यानंतर मतपेटया निश्चित केलेल्या ठिकाणी स्ट्रॉंगरुम मध्ये ठेवण्यात येणार आहेत. मा.राज्य निवडणूक आयोग यांच्या दि.26 सप्टेंबर 2022 च्या आदेशान्वये मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतील परिसरात मोबाईल फोन, पेजर, कॉडलेस फोन इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू इ. नेण्यास प्रतिबंध जाहीर केला आहे.

मतदान, मतमोजणी शांततेच्या निर्भय व निःपक्षपाती वातावरणात पार पडावे, याकरिता संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतील परिसरात उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई श्रीमती रुपाली अंबुरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये परिमंडळ-2 मधील पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतील परिसरात तसेच मतमोजणी ठिकाणी तहसिलदार कार्यालय, पनवेल येथे जो कोणी व्यक्ती सरकारी नोकर आहे, आणि त्यांना निवडणूक कर्तव्याच्या निमित्ताने मनाई आदेशात नमूद केलेल्या वस्तू, साधने बाळगणे, नेणे भाग आहे किंवा निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांनी ज्यांना सूट दिलेली आहे, अशा व्यक्ती व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस, मोबाईल फोन, पेजर, कॉर्डलेस फोन अगर इतर कोणतेही संदेशवाहक यंत्र बाळगणे व प्रचारासाठी वापरणे.  हॉटेल, हातगाडया, टपऱ्या दुकाने, विविध पक्षीय कार्यालये चालू ठेवण्यास व त्या ठिकाणी बैठक घेणे, प्रचार करणे, एकत्र येणे, विविध पक्षांचे कार्यकत्यांची निवासस्थाने संबंधित परिसरात असल्यास त्या ठिकाणी राहणारे कुटुंब व इतरांनी प्रचार करणे, बैठका घेणे, मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी कोणतेही कृत्य करण्यासाठी एकत्र जमणे व तसे कृत्य करणे,  परवाना दिलेली शस्त्रास्त्रे मतदान केंद्रांपासून 100 मीटरच्या आत घेवून जाऊ नये, यासाठी दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी 00.01 वा. पासून ते दि. 18 ऑक्टोबर 2022 रोजी 24.00 वा. पर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुध्द भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे कारवाई केली जाईल, असे उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई श्रीमती रुपाली अंबुरे यांनी कळविले आहे.   

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक