जिल्ह्यातील 29 हजार 159 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ

 

अलिबाग, दि.18 (जिमाका):- राज्य सरकारने सन 2019 मध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्‍यातील पुढील टप्प्यात शासनाने दि.29 जुलै 2022 रोजी नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची योजना जाहीर केली आहे. त्यानुसार सन 2017-18, सन 2018-19, सन 2019-20 या तीन वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षात नियमित परतफेड करणाऱ्यांसाठी ही योजना आहे. तीन वर्षात किमान दोन वर्ष नियमित हप्ते फेडणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजारापर्यंतचा लाभ शेतकऱ्याचे बँक खातेत थेट जमा होणार आहे.

या योजनेतील पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारने दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिध्द केली आहे. शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणानंतर ही रक्कम बचत खात्यावर वर्ग होईल. रायगड जिल्ह्यातील एकूण 29 हजार 159 कर्जदारांची माहिती राज्य सरकारच्या पोर्टलवर देण्यात आली आहे. यामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 28 हजार 652 आणि राष्ट्रीयकृत बँकांतील 507 कर्जदारांचा समावेश आहे.  त्यातील पहिल्या टप्प्यात 13 हजार 300 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यात लाभ मिळणाऱ्यांच्या याद्या विविध कार्यकारी सहकारी संस्था, सबंधीत बँकाच्या शाखा, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात प्रसिध्द करण्यात आल्या असून लाभार्थ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र/सीएससी/बँक शाखेस भेट देवून विशिष्ट क्रमांकाच्या अनुषंगाने आपल्या कर्ज खात्याचे आधार कार्डच्या सहाय्याने आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. आधार प्रमाणिकरणासठी जाताना कर्जदाराने आपले आधारकार्ड, विशिष्ट क्रमांक, बँक पासबूक आदी कागदपत्रे सोबत ठेवावयाची आहेत. आधार प्रमाणीकरणासाठी आपले सरकार सेवा केंद्राकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आधार प्रमाणीकरण करताना अडचणी येत असल्यास त्याबाबत ऑनलाईन तक्रार प्रणालीद्वारे दाखल करता येणार आहे.

आधार क्रमांक अमान्य असल्यास किंवा लाभाची रक्कम अमान्य असल्यास ऑनलाईन तक्रार प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार दाखल करता येणार आहे. तसेच लाभार्थ्याच्या अंगठ्याचे ठसे येत नसल्याने आाधार प्रमाणीकरण करणे शक्य नसल्याने त्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे तहसिलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समितीकडे तक्रार दाखल करता येईल. तक्रारदाराने आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर तक्रार निकाली काढण्यात येईल.

दि.17 ऑक्टोबर 2022 अखेर पहिल्या यादीतील एकूण 13 हजार 300 पैकी 11 हजार 026 म्हणजे 82.83 टक्के शेतकऱ्यांनी ‍यशस्वीरीत्या आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर दि.20 ऑक्टोबर 2022 पासून प्रोत्साहन रक्कम वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे. त्याकरिता आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया दि.19 ऑक्टोबर 2022 पर्यत पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे व जिल्हा अग्रणी बँक श्री.विजयकुमार कुलकर्णी यांनी केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक