दिवाळीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार सवलतीच्या दराने शिधाजिन्नस संच

 

 

अलिबाग,दि.14 (जिमाका):- महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुटूंब योजनेच्या  (PHH) पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त शासनाने नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येक शिधापत्रिकाधारकास 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेला शिधाजिन्नस संच उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे.

शासनाने रायगड जिल्हयातील 15 तालुक्यातील सर्व शासनमान्य रास्तभाव दुकानांमार्फत पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधा जिन्नस संच रु.100/- या दराने वितरीत करण्याचे ठरविले आहे.

            जिल्हयातील अंत्योदय अन्न योजनेचे 83 हजार 251 शिधापत्रिकाधारक व प्राधान्य कुटूंब योजनेतील 3 लाख 64 हजार 824 शिधापत्रिकाधारक अशा एकूण 4 लाख 48 हजार 075 शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच कुटूंबांना दिवाळी सणानिमित्त फक्त रु.100/- मध्ये शिधाजिन्नस संच मिळणार आहे.

            सध्या खुल्या बाजारात 1 किलो रवा रु.40 ते 50, 1 किलो चणाडाळ रु. 70 ते 80, 1 किलो साखर रु.40 ते 44 व 1 लिटर पामतेल रु.100 असे उपलब्ध आहे. शासनाने सवलतीच्या दराने दिवाळीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नस संच उपलब्ध करुन दिल्यामुळे जिल्हयातील व संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

            तरी ज्या शिधापत्रिकाधारकांना सध्या रु.2/- प्रति किलो प्रमाणे गहू व रु.3/- प्रति किलो प्रमाणे तांदूळ मिळतो, अशा सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानातून शिधाजिन्नस संच उपलब्ध करुन घेण्यात यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व जिल्हा पुरवठा मधुकर बोडके यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक