पालकांकडून अर्भकाला होणारा एचआयव्ही संसर्ग रोखण्यात शासन-प्रशासनास यश -उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील

 


अलिबाग, दि.21 (जिमाका):- एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आलेल्या महिलांना समुपदेशन व योग्य एआरटी औषधोपचार व बालकांना नेव्हीरपीन सिरप देऊन बालकांना होणारा एचआयव्ही संसर्ग टाळता येऊन बालकांच्या व महिलांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण होऊन त्या सर्वांना जीवन जगण्याचे बळ मिळते. पालकांकडून अर्भकाला होणार एचआयव्ही संसर्ग रोखण्यात शासन-प्रशासनाचे काम समाधानकारक असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी नुकतेच येथे केले.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय या विभागाची जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण समितीची, जीपा व एएमटीसीटी याबाबतची सन 2022-23 मधील प्रथम व द्वितीय सत्राच्या त्रैमासिक आढावा सभा रायगड जिल्हाधिकारी बैठक सभागृहामध्ये जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री.संजय माने, एआरटी नोडल अधिकारी डॉ.शीतल जोशी, एआरटी वैद्यकीय अधिकारी डॉ.नालंदा पवनारकर, जिल्हा सहाय्यक सौ.रश्मी सुंकले, प्रकल्प संचालक श्री.मनोज गावंड यांची उपस्थिती होती.

या सभेच्या संगणकीय सादरीकरणामध्ये जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या वतीने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022  या कालावधीत जिल्ह्यातील जनरल क्लायंटमध्ये 46 हजार 206 इतके उद्दिष्ट असून 68 हजार 848 (149 टक्के) इतके एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 185 क्लायंट हे एचआयव्ही संसर्गित असल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे या कालावधीमध्ये 26 हजार 232 हे गरोदर मातांचे उद्दिष्ट असून 27 हजार 618 (105 टक्के) गरोदर महिलांची एचआयव्ही समुपदेशन व चाचणी करण्यात आली. यामध्ये 8 गरोदर माता  एचआयव्ही संसर्गित असल्याचे आढळून आल्या आहेत.

या कालावधीमध्ये 21 बालकांची 18 महिन्याची एचआयव्ही तपासणी करण्यात आली असून 21 पैकी 21 बालके एचआयव्ही संसर्गित नसल्याचे आढळून आले. या मूल्यमापनावरून प्राथमिक अवस्थेमध्ये  एचआयव्ही संसर्गित आईवडिलांकडून त्यांच्या मुलाला होणार एचआयव्ही संसर्ग 100 टक्के प्रतिबंध करता येतो, असे निदर्शनास येत आहे. म्हणजेच या राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमामध्ये शासनाला 100 टक्के यश येत आहे असे सिद्ध होते, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी केले.

रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये एकूण 15 स्टॅन्ड अलोन आयसीटीसी असून एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे 1 एचआयव्ही च्या तीन तपासण्या करणारी पीपीपी आहे. तसेच एक मोबाईल आयसीटीसीच्या माध्यमातून आदिवासी व अतिदूर्गम भागातील तसेच ट्रक ड्रायव्हर, स्थलांतरित कामगार, वेश्याव्यसाय करणाऱ्या स्त्रियांची देखील एचआयव्ही समुपदेशन व तपासणी केली जाते. तसेच 52 प्राथमिक आरोग्य केंद्र, 8 यूएचपी, 2 ग्रामीण रुग्णालय, 1 नगरपरिषद दवाखाना येथे  एफआयसीटीसी तसेच 68 खाजगी दवाखाने व लॅब या ठिकाणी सुविधा दिली जाते.

जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या 3 एआरटी केंद्रासह 11 लिंक एआरटी केंद्रामध्ये एकूण 8 हजार 100 प्रीएआरटी नोंदणी झालेली असून त्यापैकी 3 हजार 766 लोकांना एआरटी औषधोपचार सुरु करण्यात आलेला आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाते.

एचआयव्ही संसर्गित व एड्स यामधील फरक:- एचआयव्ही ही विषाणू असून यामुळे याची लागण झालेल्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. योग्य औषधोपचाराने यावर नियंत्रण ठेवता येते. या विषाणूचा प्रवेश शरीरात झाल्यानंतर जवळपास 15 ते 20 वर्षानंतर त्या व्यक्तीला एड्स आजार होतो. आवश्यक काळजी घेऊन उपचार घेतल्यास याची देखील तीव्रता कमी करता येणे शक्य आहे.

या आढावा सभेच्या वेळी लोकपरिषद पनवेल, युनिट 1, युनिट 2, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट पेण, यांच्या लिंक वर्कर व ट्रकर्स प्रोजेक्ट उरण, आधार संस्था पनवेल, परिवर्तन प्रोजेक्ट पनवेल व सक्षम प्रोजेक्ट रोहा या संस्थांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचा  आढावा घेण्यात आला. यावेळी एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्ती, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, टीएस, टीजी यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शासकीय सेवा सवलती या एक खिडकी योजनामधून देता याव्यात याबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट पेण, प्रकल्प संचालक श्री.विजय नायर, आधार संस्था पनवेल, प्रकल्प संचालक श्री.अशोक गायकवाड, लोकपरिषद पनवेल, क्षेत्रीय व्यवस्थापक श्री.निलेश सकपाळ, साथी संस्था. मुंबई, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी श्री.प्रताप शिंदे, वैधकीय अधिकारी डॉ.सुरेश ठोकळ, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम संपदा मळेकर, प्रकल्प समन्वयक श्री.सुनील पटेल, एचआयव्ही, टीबी समन्वयक श्री.मनोज बामणे, श्रीमती शिल्पा हळणकर, श्रीमती मनिषा अहिवळे, श्री.कुणाल खुटवळ, सांची, सुरेश अय्यर हे उपस्थित होते.

या बैठकीकरिता उपस्थित असणाऱ्या सर्व सदस्यांचे स्वागत तसेच आभार प्रदर्शन डापकूचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री.संजय माने यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक