स्टार्टअप व नाविन्यता यात्रेत नवकल्पनांचे सादरीकरण करण्याकरिता नवउद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर


 “स्टार्टअपच्या नवकल्पना सुचवा आणि बक्षीस मिळवा

सहाय्यक आयुक्त श्रीमती अ.मु.पवार यांचे आवाहन

 

अलिबाग,दि.07(जिमाका):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा प्रारंभ दि.15 ऑगस्ट 2022 रोजी विभागस्तरावर करण्यात आला आहे.

नागरिकांनी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळावर आपली नाविन्यपूर्ण नवकल्पना नोंदवावी, स्टार्टअप व नाविन्यता यात्रेत नवकल्पनांचे सादरीकरण करण्याकरिता जिल्ह्यातील नवउद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. तसेच स्टार्ट अपच्या नवकल्पना सुचवा आणि बक्षीस मिळवा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती अ.मु.पवार यांनीही केले आहे.

नोंदणीकृत नवकल्पनांचे सादरीकरण करण्याकरिता दि.13 ऑक्टोबर 2022 रोजी माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. यात पहिल्या सत्रामध्ये सकाळी 9.30 वाजता विभागाच्या विविध योजनांची माहिती, स्टार्टअपच्या प्रवासातील टप्पे याबाबत मार्गदर्शन व स्थानिक उद्योजकांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. दुसऱ्या सत्रात दुपारी 11.30 वाजता सादरीकरणाची संधी देण्यात येईल. नोंदणी केलेल्या उमेदवार/ उद्योजकांनी सादरीकरणाचे वेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

या सादरीकरण सत्रामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास (कचरा व्यवस्थापन,स्वच्छ पाणी,उर्जा इ.), ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, यासारख्या महत्वाच्या तसेच इतर कुठल्याही लोकोपयोगी क्षेत्रातील समस्यांवरील आपल्याकडे असलेला नाविन्यपूर्ण उपाय मांडणे आवश्यक आहे. यातून प्रत्येक जिल्ह्यामधून अव्वल 3 विजेते घोषित केले जातील.

नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरण करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी व उद्योजकांनी आपल्या नवकल्पना महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या संकेतस्थळावर भेट देवून नोंदवावी. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग  फोन नं. 02141-222029 नंबरवर संपर्क साधावा आणि या स्टार्टअप यात्रेकरिता कोणतीही वयाची अट नसल्याने  रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक, विद्यार्थी  व नाविन्यता परिसंस्था यांनी सहभाग घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अ.मु.पवार  यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त स्टार्टअप व नवकल्पनांची नोंदणी होण्यासाठी तालुकास्तरावर स्टार्टअप यात्रेच्या माध्यमातून दि.26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2022 दरम्यान जनजागृती व प्रसिद्धी करण्यात आली असून या यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात फिरत्या एलईडी डीस्प्ले व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात आली.

उत्कृष्ट नवकल्पना पारितोषिके

सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हास्तरीय पहिल्या क्रमांकास 25 हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकास 15 हजार रुपये, तर तिसऱ्या क्रमांकास 10 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

 कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, ऊर्जा इत्यादी, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता अशा विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नवकल्पना सादर केलेल्या राज्यस्तरीय विजेत्यांना पहिल्या क्रमांकास 1 लाख रुपये, तर द्वितीय क्रमांकास 75 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वरील नमूद क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट महिला उद्योजकांसाठी 1 लाख रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय सादरीकरणातून सर्वोत्तम तीन कल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण होणार असून त्यातून निवडलेल्या राज्यस्तरीय  विजेत्यांना रोख अनुदान तसेच इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शक सत्रे तसेच सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स सारखे इतर लाभही पुरविण्यात येणार आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक