कर्जत वनपरिक्षेत्रातील साळोखवाडी येथे रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्यांवर वनविभागाने केली यशस्वी कारवाई

 


अलिबाग,दि.06(जिमाका):- कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दि.4 ऑक्टोबर 2022 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनपरिक्षेत्र कर्जत पूर्व परिमंडळ हुमगाव, मौजे साळोखवाडी येथील रहिवासी श्री.मारुती पवार यांच्या घरासमोर असलेल्या बकऱ्यांच्या बेड्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी आरोपी दशरथ बाळू वाघमारे, शरद रघुनाथ वाघमारे, सोमनाथ पप्पू पवार, साळोखवाडी, दिपक लहानू पवार (सर्व आरोपी राहणार मौजे साळोखवाडी) यांनी रानडुकराची शिकार करून त्याच्या अवयवाचे व मांसाच्या विक्रीसाठी कोयत्याने तुकडे करीत असताना आढळून आले. त्यांनी वनकर्मचाऱ्यांना पाहून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र वनकर्मचाऱ्यांनी या गुन्ह्यातील आरोपी क्र.1 दशरथ बाळू वाघमारे यांना ताब्यात घेतले. या आरोपीने सांगितलेल्या जबानीवरुन आरोपी क्रमांक 5 रविंद्र मुका वाघमारे, वय वर्ष 52, रा.डोनेवाडी ता.कर्जत यास अटक करण्यात आले. तसेच वनकर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणावरुन रानडुकराचे 39.120 किलोग्राम मांस व अवयव हस्तगत केले तसेच 4 कोयते, तराजू काटा हे साहित्य जप्त केले.

अटक करण्यात आलेले आरोपी क्र.1 दशरथ बाळू वाघमारे व आरोपी क्र.5 रविंद्र मुका वाघमारे यांची दि.5 ऑक्टोबर 2022 रोजी चौकशी केली असता त्यांनी आरोपी क्र.2 शरद रघुनाथ वाघमारे, रा.साळोखवाडी व आरोपी क्र.4 दिपक लहानू पवार, रा.साळोखवाडी यांची माहिती दिल्याने या दोन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या संपूर्ण कटात सहभागी असलेला आरोपी क्र.6 गजानन मारुती पवार, रा.डोणेवाडी ता.कर्जत यास दि.5 ऑक्टोबर 2022 रोजी चौकशीकरिता ताब्यात घेवून आरोपी क्र.2, 4 व 6 यांना त्याच दिवशी सायंकाळी अटक केली.

दि.5 ऑक्टोबर 2022 रोजी रोजी या गुन्ह्यातील आरोपींना प्रथम वर्ग न्यायालय, कर्जत येथे हजर करण्यात आले असून न्यायालयाने या प्रकरणी एकूण पाच आरोपींना 6 दिवसाची वनकोठडी देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा कर्जत (पूर्व) वनक्षेत्रपाल श्री.प्रदीप चव्हाण हे अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे व पनवेल सहाय्यक वनसंरक्षक एस.एन.वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

वनक्षेत्रात अवैधपणे कोणताही वनगुन्हा होत असल्याचे आढळून आल्यास 1926 या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून संबंधित माहिती देण्यात यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक