महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत आदर्श शाळा टप्पा-2 करिता शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी जिल्हा परिषद शाळांना दिली भेट



अलिबाग, दि.24 (जिमाका):- शिक्षण ही समाजात निरंतर चालणारी उद्दिष्टपूर्ण प्रक्रिया आहे. दर्जेदार शिक्षण या ध्येयाने भरीव कामगिरी केल्यास निश्चितपणे देशाच्या विकासावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या (VSTF) माध्यमातून आदर्श शाळा विकास कार्यक्रम टप्पा-2 व गुणवत्तापूर्ण शिक्षण निधीतून आदर्श शाळा निर्माण करण्याचे काम केले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून भौतिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, पर्यावरण स्नेही शाळा व आरोग्य आणि पोषण, आनंदाची शिक्षण इत्यादी उद्दिष्टांवर कार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अक्षय पाटील, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा कार्यकारी रत्नशेखर गजभिये तसेच अन्य सदस्यांनी अलिबाग तालुक्यातील खानाव तसेच मुरूड येथील नांदगाव व चोरढे येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली.

     यावेळी संबंधित तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या भेटीदरम्यान शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी शाळेतील भौतिक सुविधांची पाहणी केली. शाळेच्या गुणवत्तावाढीच्या उपाययोजनांसंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित शिक्षण समिती पदाधिकारी, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांच्याशी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या (VSTF) आराखड्यात घेण्यात येणाऱ्या कामांबाबत चर्चा करून पोषण आहाराची गुणवत्ता व शाळेसंबंधीत बाबींची तपासणी करण्यात आली.

शाळा भेटीदरम्यान गावातील काही जागरूक पालक वर्ग, गावकरी, शिक्षणप्रेमी देखील उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी महाराष्ट्र ग्राम सामाजिक विकास अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामांची स्तुती करून या कामांकरिता जिल्हा परिषदेमार्फत सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

जागतिक स्तरावर शास्वत विकासाचे प्रमुख 17 ध्येय निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यापैकी दर्जेदार शिक्षण हे शास्वत विकासाचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. 21 व्या शतकाची आव्हाने सक्षमपणे पेलू शकणारा विद्यार्थी निर्माण करणे, यासाठी शासनाच्या प्रमुख कार्यक्रमात शिक्षण हा विषय प्राधान्यक्रमावर असतो. कोणत्याही कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असतो. या अभियानात प्रामुख्याने शाळांमध्ये भौतिक सोयी सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, आनंददायी शिक्षण आणि पर्यावरण पूरक शाळा या पाच महत्त्वपूर्ण विषयांवर काम सुरू आहे. या कामास गती देण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक विकास अभियानातर्फे मागील वर्षी रायगड जिल्ह्यातील 4 शाळांकरिता कामे करण्यात आलेली होती. यावर्षी देखील जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सहकार्याने अलिबाग तालुक्यातील दोन शाळा, मुरुड तालुक्यातील दोन शाळा व सुधागड तालुक्यातील एक अशा एकूण 5 शाळांची निवड करण्यात आली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक