विशेष लेख: अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षणासाठी शासनाचे पाठबळ..!


अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थिनींना अर्थसहाय्य अल्पसंख्य समुदायातील विद्यार्थिनींसाठी केंद्र शासनातर्फे शिष्यवृत्ती योजना राबविली जाते.

केंद्र शासनाने अल्पसंख्याक संवर्गात शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी, जैन आणि मुस्लिम या समुदायांचा समावेश केला आहे. या समुदायातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण आणि व्यावसायिक उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे याकरिता मेरिट कम मीन्स बेस्ड म्हणजे गुणवत्ता आणि गरजेनुसार शिष्यवृत्ती ही योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ शासकीय आणि नामांकित खासगी शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना दिला जातो. खासगी शैक्षणिक संस्थांची निवड राज्य सरकारांनी करावयाची आहे.

देशभरात अशा 60 हजार शिष्यवृत्ती दिल्या जातात. प्रत्येक राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अल्पसंख्याक सवंर्गाची संख्या लक्षात घेवून शिष्यवृत्तींची संख्या निर्धारित केली जाते. महाराष्ट्रासाठी ही संख्या 5 हजार 709 असून प्रत्येक अल्पसंख्याक समुदायातील 30 टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव ठेवल्या जातात. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. दोन उमेदवारांमध्ये समान गुण असल्यास पालकांचे उत्पन्न लक्षात घेतले जाते. शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणासाठी गुणवत्ता यादी तयार केली जात नाही. तथापि संबंधित उमेदवारास मागील परीक्षेत किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक राहील. ही शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी दिली जाते.

दरवर्षी नैमित्तिक गरजा भागविण्यासाठी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या उमेदवारास 10 हजार आणि घरी राहणाऱ्या उमेदवारास 10 महिन्यांसाठी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. शिक्षण शुल्क (अभ्यासक्रमाची फी) किमान 20 हजार रुपयांपर्यंत दिली जाते. शासनाने 85 नामांकित शैक्षणिक संस्थांची यादी तयार केली असून, या संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना संपूर्ण शिक्षण शुल्काच्या रकमेची परतफेड केली जाते.

अटी व शर्ती:-

1) संबंधित उमेदवारास तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रमास सीईटी/जेईई अशासारख्या पात्रता परिक्षांद्वारे प्रवेश मिळायला हवा.

2) शिष्यवृत्ती/अर्थसहाय्याची रक्कम उमेदवाराच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.

3) ज्या उमेदवारांना कोणत्याही पात्रता परिक्षेशिवाय तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाला असेल, ते विद्यार्थीही या शिष्यवृत्तीकरिता पात्र ठरु शकतात. मात्र त्यांना उच्च माध्यमिक/पदवी स्तरावरील पात्रता परीक्षेत किमान 50 टक्के गुण मिळायला हवेत. अशा उमदेवारांची निवड मेरीटप्रमाणे केली जाते.

4) एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक उमदेवारांना शिष्यवृत्ती दिली जात नाही.

5) या शिष्यवृत्तीचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना इतर अर्थसहाय्य किंवा शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.

6) शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना उमेदवारांना आपला आधारकार्ड क्रमांक सादर करावा लागेल.

7) शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.

तरी या योजनेच्या अधिक माहितीकरिता http://www.minorityaffairs.gov.in किंवा http://www.scholarships.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

 

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

रायगड-अलिबाग

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक