आदिवासींच्या विविध प्रश्नांवर राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र विकास आढावा समितीची बैठक संपन्न

 

अलिबाग, दि.11 (जिमाका):- राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडीत व आदिवासी उपयोजनेतील कार्यान्वयीन यंत्रणांची आदिवासींच्या विविध प्रश्नांवर गुरुवार, दि.10 नोव्हेंबर 2022 रोजी आगरी समाज हॉल, पेण येथे बैठक संपन्न झाली.

राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र विकास आढावा समितीचे अध्यक्ष श्री.पंडीत यांच्या अध्यतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीकरिता निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, रोहा तहसिलदार कविता जाधव, सुधागड तहसिलदार उत्तम कुंभार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरुण पवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण नियोजन अधिकारी आनंदकुमार हेमाडे व इतर कार्यान्वयीन यंत्रणा उपस्थित होत्या.

बैठकीच्या सुरुवातीला सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.पवार यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये प्रकल्प कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी तसेच प्रकल्प कार्यालयांतर्गत शैक्षणिक गुणवत्ता वाढीकरिता 14 शासकीय आश्रमशाळा कार्यान्वित असून त्यापैकी 9 आश्रमशाळा आयएसओ (ISO) नामांकन प्राप्त आहेत. तसेच 12 अनुदानित आश्रमशाळा व 12 शासकीय वसतिगृहे चालविण्यात येत आहे. त्याचबरोबर आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीकरिता आदिवासी विकास विभाग कटीबद्ध असल्याचे सांगितले.

या बैठकीमध्ये आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी बांधवांना जातीचे दाखले, रेशनकार्ड, आधारकार्ड इत्यादी आवश्यक प्रमाणपत्र प्राधान्याने देण्याबाबात अध्यक्ष श्री.विवेक पंडीत यांनी विचारणा केली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी बांधवांसाठी प्रामुख्याने कातकरी समाजास जातीचे दाखले, रेशनकार्ड, आधारकार्ड, बालविवाह रोखणे, वनहक्क पट्टे वाटप, आरोग्य शिबिरे, स्थलांतर रोखणे, जॅाब कार्ड वितरित करणे इ. प्रमाणपत्र वाटप करण्याकरिता स्वयंसेवी संस्था व शासकीय यंत्रणा यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे कातकरी उत्थान अभियानांतर्गत सप्तसूत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमधून रायगड जिल्ह्यामध्ये साधारणत: 1 लक्ष पेक्षाही अधिक प्रमाणपत्रे/दाखले वितरित करण्यात आल्याचे अवगत केले असता अध्यक्ष श्री.पंडीत यांनी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांचे विशेष अभिनंदन केले.

यावेळी आदिवासी विकास विभागामार्फत राबविलेल्या व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला. आदिवासी उपयोजनेमार्फत कार्यान्वयीन यंत्रणांना देण्यात येणाऱ्या निधीचा वापर आदिवासींच्या विकासासाठीच होतो किंवा कसे? याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणच्या प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी आढावा घ्यावा असे अध्यक्षांनी सुचित केले.

तसेच वनहक्क अधिनियम 2006 च्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरावर एकही वनदावा प्रलंबित नसल्यामुळे अध्यक्ष श्री.पंडीत यांनी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. जिल्ह्यामध्ये ज्या आदिवासींना वनपट्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यांच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्याबाबत संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना निर्देश देण्यात आले.

या बैठकीदरम्यान उपस्थित आदिवासी संघटना प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे संबंधित कार्यान्वयीन यंत्रणा अधिकाऱ्यांनी निरसन व मार्गदर्शन केले. तसेच वन नेशन-वन रेशन अंतर्गत आदिवासी समाज बाहेरील राज्यांमध्ये स्थलांतरित असेल तरीही त्यांना त्या ठिकाणी रेशन उपलब्ध होईल याबाबत कुठल्याही अडचणी असल्यास त्याकरिता व्हॉट्सॲपद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे सुद्धा अडचणींचे निरसन करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी सांगितले. त्यानंतर कार्यान्वयीन यंत्रणांनी केलेल्या कामाबाबत व दिलेल्या माहितीबाबत अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.

या बैठकीचे सूत्रसंचलन कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्योती वाघ यांनी केले व शेवटी अध्यक्ष श्री.विवेक पंडीत यांच्या परवानगीने प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सतिश शेरमकर यांनी उपस्थितांचे आभार मानून बैठकीचा समारोप केला.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक