उसर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कामगारांची जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या सहकार्याने सर्वरोग आरोग्य तपासणी संपन्न


अलिबाग, दि.24 (जिमाका):- जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्या सहकार्याने उसर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीतील कामगारांकरिता नुकतेच क्षयरोग तपासणी व एक्स-रे तपासणी शिबीर संपन्न झाले. उसर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या आवारातील प्रशिक्षण सभागृहात 101 कामगारांची सर्वरोग आरोग्य तपासणी करण्यात आली.

या आरोग्य तपासणीत कामगारांची मधुमेह, रक्तदाब, रक्त व क्षयरोग तपासणी करण्यात आली. यावेळी 60 जणांचे मोफत एक्स-रे करण्यात आले तर 90 जणांचे थुंकी नमुने घेवून ते अलिबाग येथील लॅबमध्ये तपासणीसाठी आणण्यात आले आहेत.

यावेळी कंपनीचे सुरक्षा अधिकारी उत्सवकुमार सिंग म्हणाले की, कामगारांचे आरोग्य चांगले असेल तरच ते कंपनीत चांगल्या प्रकारे काम करू शकतात. त्यासाठी त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आवश्यक असते. ही तपासणीची सुविधा आम्हाला जिल्हा क्षयरोग कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. या कार्यालयाने कामगारांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पुढाकार घेऊन आम्हाला सहकार्य केले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो, तसेच यापुढेही त्यांचे सहकार्य मिळावे, असा मनोदय व्यक्त केला.

यावेळी रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.पूजा हत्तेकर, डॉ.रामेश्वरी शिवतारे, डॉ.निखिलिसा म्हात्रे, आरोग्य सेवक मंगेश पाटील, आरोग्य सहाय्यक नरेंद्र तांडेल, जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य सहाय्यक जयवंत विशे तसेच आरोग्य सेवक दिवकर सुरेश, प्रणित कांबळे, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक किर्तीकांत पाटील, अक्षय नाईक उपस्थित होते.

जिल्हा पी.पी.एम.समन्वयक सतीश दंतराव यांनी उपस्थितांचे आभार मानताना सुरक्षा अधिकारी उत्सवकुमार सिंग यांचे विशेष आभार व्यक्त केले व त्यांना कंपनीचे निक्षय मित्र म्हणून नोंदणी करून घ्यावे तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना पोषण आहार वाटप करण्यासाठी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (Corporate Social Responsibility-CSR) अंतर्गत संबंधितांशी समन्वय साधून तसा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक