“चला जाणूया नदीला” उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी कटिबद्ध होवू या..! -अपर जिल्हाधिकारी अमोल यादव


अलिबाग, दि.22 (जिमाका):- जल है तो कल है या उक्तीतच पाण्याचे महत्व स्पष्ट होते. सुप्रसिद्ध गीतकार ग.दि.माडगूळकर यांनीही त्यांच्या संथ वाहते कृष्णामाई.. या गीताद्वारे पाण्याचे महत्व विषद केले आहे. त्यामुळे आपल्या व आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आपण सर्वांनी चला जाणूया नदीला या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी कटिबद्ध होवू या, प्रत्येकाने आपापल्या परीने शक्य तितके योगदान द्यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत चला जाणूया नदीला हा उपक्रम जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर राबविला जात आहे. याबाबतची कार्यशाळा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री.यादव बोलत होते.

यावेळी अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले, जलसंपदा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता दिनेश्री राजभोज, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार विशाल दौंडकर, नदी संवाद यात्री किशोर धारिया, रवींद्र पाटील, अरविंद म्हात्रे, उदय मानकवळे, चंद्रकांत उत्तेकर, सर्व तहसिलदार व विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी अमोल यादव पुढे म्हणाले की, सजीवांसाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दोन टक्के पाणी पिण्यायोग्य असून त्याचे संवर्धन करणे सर्व सजीवांसाठी आवश्यक आहे. यामुळे या अभियानात आपल्या सर्वांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. नद्यांच्या सद्य:स्थितीबाबत श्री.यादव यांनी खंत व्यक्त करून या परिस्थितीकरिता आपणच कारणीभूत असल्याचे परखड मत मांडले. जलसाक्षरता, जलसंवर्धन क्षेत्रात नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांचे नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून व आमिर खान यांचे पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठे योगदान आहे. या क्षेत्रातील त्यांचे काम आपल्या सर्वांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या कामाचे आपणही अनुकरण करूया, नदीला जाणूया आणि या उपक्रमात रायगड जिल्हा अग्रस्थानी राहील, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करूया.

दि.14 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापित करण्यात आली असून तालुका स्तरावरही अशा समन्वय समित्या स्थापन होणे आवश्यक असल्याचे श्री.यादव यांनी यावेळी सांगितले.

या कार्यशाळेच्या निमित्ताने नदी संवाद यात्री किशोर धारिया यांनी जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांचा आदरपूर्वक नामोल्लेख करून चला जाणूया नदीला या उपक्रमाबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली तसेच शासन, प्रशासन आणि जनता यांनी मिळून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

तसेच यावेळी नदी संवाद यात्री उदय मानकवळे, अरविंद म्हात्रे, रवींद्र पाटील या सर्वांनी रायगड जिल्ह्यातील भोगावती, सावित्री, काळ व कासाडी या नद्यांची सद्य:स्थिती, त्यांच्या समस्या तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत आपले अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.

या कार्यशाळेच्या निमित्ताने जलसंपदा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता दिनेश्री राजभोज यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, नद्या, धरणे व जलस्रोतांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी म्हसळा तहसिलदार समीर घारे यांनी चला जाणूया नदीला या उपक्रमात प्रशासनाने दिलेल्या योगदानाबद्दल आपले मनोगत मांडले.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले तर आभार सहाय्यक उपवनसंरक्षक संजय कदम यांनी व्यक्त केले.

या कार्यशाळेचे जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://fb.watch/gYcqnyprzt/?mibextid=RUbZ1f व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://fb.watch/gYcWD9b8S1/ या फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यास नेटिझन्स व पर्यावरणप्रेमींकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक