मतदारांनी आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आवाहन

देशाचे भाग्यविधाते होऊ..

मतदारयादीत नाव नोंदवू

 

 

अलिबाग, दि.09 (जिमाका):- मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु झाला असून या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींसह दिव्यांग, तृतीयपंथी, बेघरांनी आपले नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांनी केले आहे.

दिव्यांग, तृतीयपंथीकरिता वय, पत्ता याबद्दल येत असलेल्या अडचणी लक्षात घेता आवश्यक दस्तऐवजाबाबत निवडणूक आयोगाद्वारे विशेष सवलत देण्यात आली आहे. नाव नोंदणीची सुविधा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहे.

रायगड जिल्ह्यात या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत शनिवार, दि.19 व रविवार, ‍दि.20 नोव्हेंबर 2022 आणि शनिवार, दि.3 व रविवार, दि.4 डिसेंबर 2022 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संक्षिप्त पुनरीक्षण काळात विद्यार्थी, दिव्यांग महिला, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती, तृतीयपंथी या घटकांसाठीची विशेष शिबिरे दि.12 व 13 नोव्हेंबर 2022 तसेच दि.26 व 27 नोव्हेंबर 2022 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष मोहिमेत वय वर्षे 18-19 वयोगटातील मतदार, तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि दिव्यांग मतदारांनी सहभागी होऊन आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करून घ्यावे. याकरिता मतदारांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे जाऊन मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 चे अर्ज भरुन द्यावे किंवा एनएसव्हीपी, व्हीएचए व व्हीपोर्टल या पोर्टलवर लॉग-इन करुन आपले नाव समाविष्ट करण्याबाबत ऑनलाईन अर्ज सादर करावा.

दिव्यांगांसाठी विशेष पीडब्ल्यूडी ॲप:- निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी विशेष पीडब्ल्यूडी या ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वापरण्यास सहज-सुलभ असलेल्या या ॲपच्या सहाय्याने दिव्यांग मतदारांना नाव नोंदणी करता येईल. ज्यांची नाव नोंदणी आधीच झाली आहे, पण दिव्यांग म्हणून नोंद नसेल त्यांना या ॲपवरूनच दिव्यांगत्व चिन्हांकित करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दिव्यांगत्व चिन्हांकित झाल्यानंतर या मतदारांना मतदानाच्या वेळी पोस्टल मतपत्रिका, चाकाची खुर्ची, वाहन, आदी सुविधा पुरविणे निवडणूक कार्यालयासाठी सोयीचे ठरते.

तृतीयपंथींना दस्तऐवजात सवलत:- मतदारयादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी वयाचा आणि निवासाचा दाखला आवश्यक असतो. मात्र, तृतीयपंथी, देह व्यवसायात असणाऱ्या महिलांना हे दस्तावेज सादर करणे कठीण जाते. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांना मतदारयादीत नाव नोंदणी करताना वय आणि निवासाचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही. तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया यासारख्या वंचित घटकांनी ते जिथे राहतात तो पत्ता अर्जात नमूद करून अर्ज दाखल करणे महत्त्वाचे आहे. नाव पत्त्यात बदल करण्यासाठी अर्ज क्रमांक 8 भरून त्यांचे आधीचे नाव, लिंग यामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा आहे.

सोशल मीडियाचा वापर:- रायगड जिल्ह्यातील पात्र प्रत्येक व्यक्तीला मताधिकार बजाविता यावा यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे मतदार नोंदणी जनजागृतीसाठी आवाहन करणारी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या समाजमाध्यमांद्वारे लघुचित्रफितींच्या माध्यमातून मतदार नोंदणीसाठी रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही आवाहन करण्यात येत आहे.

मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, नविन नोंदणी तसेच मतदार यादतील नोंदणीस आधार क्रमांक जोडणी इत्यादी प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचाव्यात, याकरिता गुरुवार, दि.10 नोव्हेंबर 2022 रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसेभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

बुधवार, दि.9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप मतदारयादीचे वाचन या विशेष ग्रामसभेत होणार आहे. त्यानुसार मतदारयादीत नाव समाविष्ट असलेल्या मतदारांच्या नावामध्ये दुरुस्ती, रहिवाशांचे स्थलांतरण विधानसभा अंतर्गत/बाहेरील, मतदार ओळखपत्र बदलून देणे, दिव्यांग म्हणून चिन्हांकीत करावयाचे असल्यास नमुना 8 तसेच आपले मतदार ओळखपत्राशी आधारकार्ड जोडणी करण्याकरिता नमुना 6-ब भरुन संबंधीत मतदार आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा एनएसव्हीपी, व्हीएचए व व्हीपोर्टल  या पोर्टलवर लॉग-इन करुन संबंधीत अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करुन विशेष मोहीम / विशेष ग्रामसभेचा लाभ घ्यावा. तसेच ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी https://nvsp.in किंवा https://voterportal.eci.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी किंवा Voter Helpline हे ॲप वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांनी केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड