जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध उपक्रम संपन्न

 

अलिबाग, दि.22 (जिमाका):- रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. अलिबाग तालुक्यातील सहाण ग्रामपंचायतीला रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी भेट दिली.

यावेळी उपसरपंच सौंदर्या पोईलकर, माजी पंचायत समिती सदस्य अनिल पाटील, ग्रामसेविका सोनाली नाईक व ग्रामपंचायत सदस्य नरेश वर्तक, ग्रामपंचायत सदस्या निवेदिता पाटील व विद्या मगर आदी उपस्थित होते.

ग्रामसेविका सोनाली नाईक यांनी गावातील स्वच्छताविषयक कामांची माहिती दिली. यावेळी काही ग्रामस्थांच्या घरातील वैयक्तिक शौचालयांना भेटी देऊन त्याची पाहणी करण्यात आली.

यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले म्हणाल्या की, स्वच्छ भारत अभियानामुळे गावांचा चेहरा मोहरा बदलला आहे. स्वच्छतेमुळे गावामध्ये लोकांचे जीवनमान बदलले आहे तसेच आर्थिक, पर्यावरणीय आरोग्यमान देखील उंचावले आहे. गावात नियमित स्वच्छता राहावी, म्हणून आता सर्व ग्राम ग्रामपंचायतींनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदीसाठी प्राधान्य द्यावे. शौचालयांचा नियमित वापर झाल्यामुळे गावात स्वच्छतेचे वातावरण टिकून आहे, त्यात सातत्य ठेवावे.

यावेळी सहाणगोटी येथील प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. मुख्याध्यापिका दिपाली डोलकर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी शौचालयांसमोर रांगोळी काढली होती. फुलांचे हार घालून शौचालयाचे पूजन करण्यात आले. तर शौचालयाची रंगरंगोटी करून शौचालयांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे संवाद तज्ञ श्री.सुरेश पाटील, समाजशास्त्रज्ञ श्री.रविकिरण गायकवाड, सनियंत्रण व मूल्यमापन तज्ञ श्री.दत्तात्रय नाईक आदी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक