जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा परिषद येथे क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप



अलिबाग, दि.24 (जिमाका):- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांच्या हस्ते नुकतेच रायगड जिल्हा परिषद येथे निक्षय मित्रांकडून क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. निक्षय मित्र श्रीमती रेश्मा म्हात्रे (आरोग्य सेविका) व झिराड आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी संग्राम पाटोळे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना दोन महिन्यांच्या पोषण आहाराचे वाटप केले.

यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मोरे म्हणाले की, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील सर्व कॉर्पोरेट क्षेत्र, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, सरपंच, सर्व संघटना व विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष, सचिव यांना निक्षय मित्र बनून क्षयरुग्णांना पोषण आहार किंवा व्यवसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार देण्यासाठी आवाहन केले आहे. रायगड जिल्ह्यात 2 हजार 803 क्षयरुग्णांना निक्षय मित्रांची आवश्यकता आहे. क्षयरुग्ण झालेल्या रुग्णांना आजही क्षयरोगाविषयीच्या गैरसमजुतींमुळे समाजात योग्य वागणूक मिळत नाही, रोजगार मिळत नाही. परिणामी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. यामुळे क्षयरोगी व्यक्तीच्या मनावरही नकारात्मक परिणाम होतो. क्षयरुग्णावर औषधोपचार सुरू असताना त्या रुग्णाने पोटभर जेवण करणे आवश्यक असते. मात्र नैराश्यामुळे रुग्ण व्यवस्थित जेवण न करता उपाशीपोटी गोळ्या घेतो. पोटात पुरेसे अन्न नसल्याने त्याचे आरोग्य खालावते. परिणामी तो अधिक अशक्त होऊ लागतो. अशा परिस्थितीत त्यास इतर अनेक रोगांचीही लागण होऊ शकते. त्यामुळे अशी परिस्थिती संबंधित रुग्णाच्या कुटुंबावर येऊ नये, यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, कॉर्पोरेट क्षेत्र, विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनी या क्षयरुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचे सामाजिक स्थान व आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी पुढाकार घ्यावा.

त्याचबरोबर सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी देखील आपापल्या क्षेत्रातील रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ.मोरे यांनी यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना केले.

यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ.राजाराम भोसले, साथरोग अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, डॉ.अभिजित घासे, अलिबाग जिल्हा क्षयरोग केंद्राचे पी.पी.एम.समन्वयक श्री.सतीश दंतराव, अलिबाग तालुका क्षयरोग पर्यवेक्षक श्री.किर्तीकांत पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक