विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदार नोंदणी जनजागृतीकरिता अलिबाग येथे “सायकल रॅली”व “वॉकेथॉन”संपन्न


नवमतदारांनी मतदार नोंदणी करण्याचे केले आवाहन

 

अलिबाग, दि.09 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक विभागांतर्गत दि.9 नोव्हेंबर ते दि.8 डिसेंबर 2022 या कालावधीत नवमतदार नोंदणी होण्याच्या दृष्टीने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-2023 अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांच्या पुढाकारातून अलिबाग रोजी सायकल रॅलीआणि वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, नायब तहसिलदार (निवडणूक) राजश्री साळवी, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते.

या रॅलीच्या माध्यमातून नवमतदारांना मतदार नोंदणी करण्याविषयीचे आवाहन करण्यात आले.

छायाचित्रासह मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे मतदार जनजागृती सायकल फेरीचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, देशाच्या प्रत्येक भागातील प्रत्येक पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे. लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदानही आवश्यक आहे. शहरी भागात मतदार नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने त्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुण्यातून होत आहे. देशातील दुर्गम भाग, वाळवंट, समुद्रकिनारा, दऱ्याखोऱ्यातील नागरिक मतदानात सहभाग घेतात हे आपले वैशिष्ट्य आहे.

यावेळी निवडणूक आयुक्त श्री.अनुपचंद्र पांडे म्हणाले,  या वेळेचा मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम युवा मतदार केंद्रीत ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत 17 वर्षाचा युवकही नोंदणी करू शकणार आहे. वयाची 18 वर्ष पूर्ण होताच त्याचा समावेश मतदारयादीत केला जाईल. लोकशाही सशक्त करण्यासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी आणि सायकलच्या चाकाच्या गतीप्रमाणे मतदार जनजागृतीचा संदेश प्रत्येक भागात पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, वयाची 17 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करुन मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणे तसेच मतदारयादीचे शुद्धीकरण करणे या दुहेरी उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक गावात दि.10 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करुन मतदारयादीचे वाचन, नवीन मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक