निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत कलम 144 प्रमाणे मनाई आदेश जारी

 

 

अलिबाग,दि.15(जिमाका) :- ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि.09 नोव्हेंबर 2022 रोजीपासून आचारसंहिता अंमलात आली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत, परिमंडळ 2 मधील पनवेल तहसिल विभागातील पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंध्रण, भाताण, कानपोली, केळवणे, नेरे, दिघाटी पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत शिरढोण, शिवकर, करंजाडे, तळोजा पोलीस ठाणे हद्दीत नितळस ग्रामपंचायत तसेच उरण तहसिल विभागातील उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राणसई, पुनाडे, सारडे, नवीन शेवा, धुतूम, कळंबुसरे, बोकडविरा, वशेणी, पागोटे, पिरकोन, चिलें, भेंडखळ, नवघर न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाणजे, डोंगरी, करळ, जसखार, मोरासागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घारापुरी या एकूण 28 ग्रामपंचायतीमधील निवडणूका होणार असून दि. 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान व दि.20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.

या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी दि.20 डिसेंबर 2022 रोजी तहसिल कार्यालय, पनवेल तसेच सिडको ट्रेनिंग सेंटर, बोकडविरा, सेक्टर नं.30, उरण येथे होणार आहे. वरील नमूद ठिकाणी मतपेटया वाटप करण्यात येणार असून मतदान झाल्यानंतर मतपेटया स्ट्रॉंगरुमध्ये ठेवण्यात येणार आहेत.

राज्य निवडणूक आयोग कार्यालयाकडील दि.09 नोव्हेंबर 2022 अन्वये मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतील परिसरात मोबाईल फोन, पेजर, कॉडलेस फोन इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू इ. नेण्यास प्रतिबंध जाहीर केला आहे. मतदान, मतमोजणी शांततेच्या, निर्भय व निःपक्षपाती वातावरणात पार पडावे, याकरिता पोलीस ठाण्याच्या हद्दीत मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतील परिसरात पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये परिमंडळ 2 मधील पनवेल शहर, पनवेल तालुका, तळोजा, उरण, न्हावाशेवा, मोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतील परिसरात तसेच मतमोजणी ठिकाणी तहसिलदार कार्यालय, पनवेल व तहसिल कार्यालय उरण येथे जो कोणी इसम सरकारी नोकर आहे आणि त्यांना निवडणूक कर्तव्याचे निमित्ताने पुढीलप्रमाणे मनाई आदेशात नमूद केलेल्या वस्तू, साधने बाळगणे, नेणे भाग आहे किंवा अगर निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांनी ज्यांना सूट दिलेली आहे, अशा इसमांव्यतिरिक्त कोणत्याही इसमास दि. 17 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजेपासून ते दि. 20 डिसेंबर 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मोबाईल फोन, पेजर, कॉर्डलेस फोन अगर इतर कोणतेही संदेशवाहक यंत्र बाळगणे व  प्रचारासाठी वापरणे, हॉटेल, हातगाडया, टपऱ्या दुकाने, विविध पक्षीय कार्यालये चालू ठेवण्यास व त्या ठिकाणी बैठक घेणे, प्रचार करणे, एकत्र येणे, विविध पक्षांचे कार्यकर्त्यांचे निवासस्थाने वरील परिसरात असल्यास त्या ठिकाणी राहणारे कुटुंब व इतरांनी प्रचार करणे, बैठका घेणे, मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी कोणतेही कृत्य करण्यासाठी एकत्र जमणे व तसे कृत्य करणे, परवाना दिलेली शस्त्रास्त्रे मतदान केंद्रापासून 100  मीटरच्या आत घेवून जाऊ नये, यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

 या आदेशाचा भंग करणाऱ्या इसमांविरुध्द भा.द.वि.क. 188 प्रमाणे कारवाई केली जाईल, असे पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा नवी मुंबई श्री.प्रशांत मोहिते यांनी कळविले आहे. तसेच आदेशाच्या प्रती परिमंडळ 2 मधील पनवेल शहर, पनवेल तालुका, तळोजा, उरण, न्हावाशेवा, मोरा पोलीस ठाण्याच्या परिसरात सहज दिसणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी चिटकवून ध्वनीक्षेपकाद्वारे प्रक्षेपित करुन त्याचा प्रचार करावा व तशा कागदोपत्री नोंदी ठेवाव्यात,असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक