सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2022 संकलन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात संपन्न

 


 

                अलिबाग,दि.08 (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत  सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2022 संकलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. 

               कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.  श्रीमती रेशमा पाटील यांच्या  ये मेरे वतन के लोगो… या गाण्याच्या सादरीकरणातून शहीद जवानांना व वीर जवान प्रतिमेस श्रद्धांजली वाहण्यात आली. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, ब्रिगेडिअर (निवृत्त) सुरेश सालोखे, मेजर (निवृत्त) डॉ.आश्लेषा तावडे-केळकर यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

              यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.गु.श. हरळय्या, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार (निवृत्त) गोविंदराव साळुंखे, जिल्हा पी.पी. समन्वयक सतीश दंतराव तसेच युद्ध विधवा, वीरमाता, वीरपिता, आजी-माजी सैनिक, पत्रकार आणि ध्वजदिन निधी संकलनाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेल्या विविध कार्यालयांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

             यावेळी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी आपल्या मनोगतात ध्वजदिनाचे महत्व विषद केले. ध्वजदिनाच्या निमित्ताने सैनिक कल्याण निधीसाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचा आवर्जून उल्लेख करुन डॉ. बैनाडे यांनी त्यांचे कौतुक केले.  सन-2021 यावर्षीचे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट  100 टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले.  त्यांच्या प्रोत्साहनामुळेच रु.60.98 लक्ष हे उद्दिष्ट असताना रायगड जिल्हा प्रशासनाने रु.82.12 लक्ष (136.26%) इतके निधी संकलन केले. ही बाब सर्वांसाठीच अभिनंदनीय आहे.  अशाच प्रकारे यावर्षीचे उद्दिष्ट देखील रायगड जिल्हा पूर्ण करेल यात शंकाच नाही, असा विश्वास व्यक्त करुन युद्ध विधवा, वीरमाता, वीरपिता, आजी-माजी सैनिक यांच्याप्रती विशेष आदरभाव यापूर्वीही होता, आजही आहे आणि उद्याही राहील, असेही त्या म्हणाल्या.

            याप्रसंगी ब्रिगेडिअर (नि.)सुरेश सालोखे यांनी आपल्या लष्करी सेवेतील अनुभव कथन करताना अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, लष्कराकडून नेहमीच मनुष्य धर्माची शिकवण दिली जाते. लष्करात माणुसकी सर्वात महत्वाची मानली जाते. कोणत्याही परिस्थितीत संयम बाळगून परिस्थितीचा सामना करावयास शिकविले जाते. भारतीय सैनिक आपला देश सर्वप्रथम आणि बाकी सर्व नंतर, या प्रेरणेने काम करतात. कधीही तक्रार करीत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत हसतमुखाने काम करण्यास, आपले कर्तव्य पार पाडण्यास लष्कर शिकवते. लष्करातील प्रत्येक जीव महत्वाचा असतो. आपापसातील नातेसंबंध अतूट असतात.

             ब्रिगेडिअर (नि.) साळोखे  पुढे म्हणाले की, देशभक्ती म्हणजे केवळ देशासाठी बलिदान करणे नसून देशाचा प्रत्येक पैसा योग्य कारणासाठीच खर्च होणे, जबाबदारीने खर्च करणे, हे देखील महत्वाचे आहे.  अधिकार म्हणजे जबाबदारी या भावनेने भारतीय सैन्य काम करते. याच भावनेचा स्वीकार सर्व क्षेत्रात होणे गरजेचे आहे. याबाबत त्यांनी फिल्ड मार्शल माणेक शॉ यांच्या आठवणी सांगितल्या. तसेच लष्कर आणि शासन-प्रशासन हे आपआपल्या परीने एकप्रकारे देशसेवाच करीत असतात, असेही ते शेवटी म्हणाले. 

            मेजर (निवृत्त) डॉ.आश्लेषा तावडे-केळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,  जेव्हा सैन्यातील एक जवान एका कुटूंबातून सैन्यात जातो, त्यावेळी तो सैन्याच्या मोठ्या कुटुंबाशी जोडला जातो आणि हे  सैन्यरुपी कुटुंबच त्याच्यासह सर्वांची काळजी घेते. भावी पिढीला मानसिकदृष्टया सशक्त करणे,देशप्रेमासाठी प्रोत्साहित करणे,  त्यांना देश व समाजहितासाठी  काम करण्याची प्रेरणा देणे,  हाच ध्वजदिनासारख्या उपक्रमांचा उद्देश असून स्फूर्ती, शक्ती, अभिमान हा अशा उपक्रमांचा गाभा आहे. आपल्या शिक्षणाचा,ज्ञानाचा उपयोग आपल्या भारतमातेसाठी करणे महत्वाचे आहे. आपल्या चांगल्या कर्माची फळे आपल्या पुढच्या पिढीला निश्चित मिळतात.  महिला सैन्याधिकारी म्हणून आलेले अनुभव सांगताना मेजर (निवृत्त) डॉ.आश्लेषा यांनी महिलांना देखील सैन्यात उत्तम भवितव्य असल्याचे सांगितले.

            या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या हस्ते ध्वजदिन निधीकरिता सढळ हाताने मदत केलेल्या धनाजी महादेव ठाकूर (रु.5 लक्ष), ॲड. प्रवीण ठाकूर (रु.1 लक्ष), श्याम जोगळेकर (रु.50 हजार), माधवी कोसमकर (रु.20 हजार), महादेव पाटील (रु.10 हजार), सुमेघा मनोहर (रु.5 हजार 500), श्रीमती प्रिया आचरकर (रु.2 हजार ) श्री. मदन हाटे (1 हजार 111), विलास पाटील (1 हजार) या दानशूर व्यक्तींचा, निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध शासकीय विभागांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन तसेच वीरपत्नी चंद्राबाई चव्हाण, शोभा गमरे, वैशाली कोरपे,  सुजाता पवार, आशा निकाडे,  गिताबाई कासारे,  वनिता कळमकर, पार्वतीबाई सकपाळ, जनाबाई पार्टे, सरस्वती कदम आणि  वीरमाता निर्मला तुनतुने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याप्रमाणे सिध्दी चांगदेव भोसले या विद्यार्थींनीने शालांत परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल रु.10 हजार चा धनादेश व प्रशस्तीपत्र देवून तिला गौरविण्यात आले. हवालदार (निवृत्त)जितेंद्र नलावडे यांना सदनिका खरेदीकरिता रु.50 हजारचा धनादेश प्रदान करण्यात आला.

                 संपूर्ण समाज,देश आपल्या वीर भारतीय जवानांचा ऋणी आहे, ही भावना व्यक्त करण्यासाठी, शहीद जवानांच्या कुटुंबियांचे कल्याण करण्यासाठी, युध्दात जखमी झालेल्या जवानांचे पुनर्वसन करण्यासाठी, सेवारत सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी, माजी सैनिक व दिवंगत सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी, सन 1919 च्या पहिल्या महायुद्धापासून आजपर्यंत झालेल्या विविध चकमकींमध्ये ज्या जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांनी त्यांचा आज आपल्या उद्यासाठी दिला आहे, याची जाणीव राहण्यासाठी, ही मूलभूत तत्वे जनमाणसांच्या मनात रुजविण्यासाठी ध्वजदिन साजरा करण्याची प्रथा आहे.

              या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सुभेदार (निवृत्त) गोविंदराव सांळुखे यांनी ध्वजदिन निधी 2021 चे उद्दिष्ट्य रु.60.98 लक्ष हे उद्दिष्ट असताना रायगड जिल्हा प्रशासनाने रु.82.12 लक्ष (136.26%) इतके निधी संकलन करण्यात यश मिळविले असून त्यापैकी रु.22 लक्ष 88 हजार 398 इतका निधी कल्याणकारी योजनांसाठी 182 लाभार्थ्यांसाठी खर्च करण्यात आला आहे. यावर्षी सन 2022 मध्ये रुपये 75 लक्ष उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. ध्वजनिधीस दिलेली देणगी आयकर कायदा 1961 मधील कलम 80-जी नुसार (5) (vi) अन्वये 100% आयकर मुक्त आहे. तरी सर्वांनी ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन केले.

            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.किरण करंदीकर यांनी केले, तर आभार सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सुभेदार (निवृत्त) गोविंदराव सांळुखे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक