“महाआरोग्य योजना-सार्वजनिक आरोग्य योजना व कार्यक्रम” (भाग-3)

 

विशेष लेख क्रमांक :-40                                                                                             दिनांक :- 23 डिसेंबर 2022

 


 

आरोग्य सेवांचा मूळ उद्देश आरोग्य सुधारणे हा असून, लोकांचे जीवनमान सुधारावे व निरोगीपणे जगता यावे यासाठी, आरोग्य शिक्षण व सेवा यावर भर देण्यात आला आहे. आरोग्य सेवा ही सामाजिक आरोग्य क्षेत्र, यात प्राथमिक आरोग्य सेवा, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचाही समावेश होतो. या माध्यमातून लोकांना आरोग्य सेवांची उपलब्धता करून देण्यात येते. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून शासनाच्या वतीने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध योजना आखण्यात आलेल्या आहेत. या आरोग्य सेवा अधिकाधिक लोकाभिमुख झाल्यास लोकांना चांगले आरोग्य लाभून समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते.

सामाजिक क्षेत्राबरोबरच स्वयंसेवी संस्था व खाजगी क्षेत्र या माध्यमातून अंगीकृत रुग्णालयातून आपल्या सेवा या देत असतात, त्या सेवांशीही शासन सामाजिक आरोग्य क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न करीत आलेले आहे. निरोगी महाराष्ट्राच्या दृष्टीने विविध महाआरोग्य योजना सामान्य माणसासाठी शासनाच्या वतीने साकारलेल्या आहेत.  या लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन लोकांनी त्याचा अधिकाधिक उपयोग घेण्यासाठी व त्या लोकाभिमुख करण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे, यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांचेदेखील मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे, असे मनोगत आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई च्या संचालक, डॉ.साधना तायडे तसेच आरोग्य सेवा, पुणे चे संचालक, डॉ.नितीन अंबाडेकर यांनी नोव्हेंबर-2022 च्या महाराष्ट्र आरोग्य पत्रिकेच्या महाआरोग्य योजना-सार्वजनिक आरोग्य योजना व कार्यक्रम या विशेषांकातून व्यक्त केले आहे. या पुस्तिकेचे संपादन डॉ.कैलास बाविस्कर यांनी केले आहे.

चला तर जाणू घेवूया…काय आहेत या आरोग्य योजना, काय आहेत या योजनांचे लाभ ….

 

किशोरवयीन आरोग्य

राज्यातील किशोरवयीन मुला-मुलींची संख्या (वय वर्ष 10 ते 19 ) एकूण लोकसंख्येच्या 23 टक्के आढळून येते. किशोरवयामध्ये शारिरिक वाढीच्या वेळी भावनिक, मानसिक, लैंगिक बदल होत असतात. याबाबत समाजामध्ये, कुटुंबामध्ये, शाळा, कॉलेजमधून योग्य माहिती मिळणे दुरापास्त असते. चुकीच्या माहितीमुळे किशोरवयीन मुला-मुलींमध्ये गैरसमज निर्माण होतात. या गोष्टी टाळण्यासाठी किशोरवयीन मुला-मुलींसाठी 'अर्ज' हा कार्यक्रम आर.सी.एच.भाग 2 अंतर्गत कार्यान्वित करण्यात आला आहे.

उद्देश : किशोरवयीन मुला-मुलींच्या प्रजनन व लैंगिक आरोग्यामध्ये सुधारणा, बालमृत्यू, मातामृत्यू, एकूण प्रजनन दर कमी करणे,  प्रसूती काळात निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीबाबत काळजी घेणे.

उद्दिष्ट :  किशोरवयीन मुला-मुलींना त्यांच्या आरोग्याविषयी समुपदेशन व जनजागृती करणे,  सुरक्षित गर्भपात संबंधित सुविधा पुरविणे,  किशोरवयीन मुला-मुलींना प्रजनन व लैंगिक आरोग्याबाबत जागृत करून त्यांचा सहभाग या कार्यक्रमात वाढविणे,  किशोरवयीन मुला-मुलींना त्यांच्या आरोग्याविषयीच्या समस्यांबाबत माहिती देणे.

अंमलबजावणी पध्दती : या कार्यक्रमांतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. किशोरवयीन मुला-मुलींना '631 क्लिनिक' मार्फत आरोग्याविषयी सेवा पुरविणे, आयोजन करणे. WIFS अंतर्गत लोहयुक्त गोळ्यांचे वाटप करणे. बाह्यसंपर्क कार्यक्रमाचे मासिक पाळीमधील स्वच्छता संवर्धन योजनेंतर्गत रु. 6/- प्रति सॅनिटरी या दरात सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करणे.

सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था : राज्यात 631 अॅडोलेसेन्ट हेल्थ क्लिनिकची स्थापना केली आहे, त्यांना मैत्री क्लिनिक असे नाव देण्यात आले आहे. हे मैत्री क्लिनिक राज्यातील निवडक जिल्हा सामान्य रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, स्त्री रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, शहरी भागात व काही प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थापन करण्यात आली आहेत.

कार्यक्रमांतर्गत योजना व उपक्रम:

पौगंडावस्थेतील मुलांचे प्रजनन व लैंगिक आरोग्य :- मैत्री क्लिनिकमध्ये या कार्यक्रमांतर्गत या किशोरवयीन मुला-मुलींना त्यांच्या आरोग्याविषयी तपासणी, समुपदेशन व मार्गदर्शन केले जोते. या क्लिनिक्समार्फत मासिक पाळीमध्ये उद्भवणाऱ्या समस्या (आहार, एनसीडी, मानसिक आरोग्य, आर.टी.आय. एस.टी.आय., त्वचेच्या समस्या प्रतिबंधक उपायांबाबत (ओ.सी.पील्स, ई.सी.पील्स, आय.यु.डी) बाबत समुपदेशन व तपासणी केली जाते. समुपदेशक किशोरवयीन मुला-मुलींचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने बाह्यसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन करतात. या योजनेंतर्गत शाळेमध्ये निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, परिसंवाद इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच किशोरवयीन मुला-मुलींना त्यांच्या आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे मेळावे घेण्यात येतात.

मासिक पाळीमधील स्वच्छता संवर्धन योजना: किशोर अवस्थेतील मुलींमध्ये शारिरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक बदल होत असतात. यामध्ये मुख्यतः मासिक पाळी सुरु या महत्त्वाच्या टप्प्याचा समावेश आहे. मासिक पाळी सुरू होण्याचे वय 10 ते 16 वर्षांपर्यंत असू शकते. मासिक पाळीविषयी, मासिक पाळीमधील स्वच्छतेविषयक घ्यावयाच्या दक्षतेबाबत असलेल्या अज्ञानामुळे किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी केंद्र शासनाने सूचित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मासिक पाळीच्या वेळेस घ्यावयाच्या काळजीबाबत विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

उद्देश: ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीमध्ये स्वच्छतेविषयक घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करणे,  ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना अत्यल्प दरात सॅनिटरी नॅपकीन गावपातळीवर 'आशा' मार्फत उपलब्ध करुन देणे, सॅनिटरी नॅपकीनच्या वापरानंतर योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणे.

विकली आयर्न फॉलिक अॅसिड सप्लिमेंन्टेशन योजना : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मातामृत्यू बालमृत्यू व अर्भक मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने राज्यात विविध स्तरावर अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 23 टक्के लोकसंख्या किशोरवयीन मुला-मुलींची आहे. राज्यात किशोरवयीन वयोगटातील मुला-मुलींच्या शारीरिक व बौध्दिक वाढीसाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक आहे. यास्तव सन 2012-13 वर्षापासून राज्याने डब्लू.आय.एफ.एस योजना (Weekly fron Folic Acid Supplementation Scheme) कार्यान्वित केली आहे.

या योजनेंतर्गत महिन्याच्या दर सोमवारी इयत्ता 6 वी ते 12 मधील मुला-मुलींना तसेच शाळेत न जाणाऱ्या मुलींना महिन्याच्या दर सोमवारी लोह व फॉलिक अॅसिडची 1 गोळी असे 52 आठवडे एका वर्षात देण्यात येतात आहे. या कार्यक्रमांमध्ये शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभागांचा समावेश आहे. तसेच राज्यात किशोरवयीन वयोगटातील मुला- मुलींमधील Worm Infestation टाळण्यासाठी त्यांना जंतनाशक गोळ्या (Tab Albendazole) देण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत राज्यातील शाळेत जाणाऱ्या किशोरवयीन मुला-मुलीना व शाळेत न जाणाऱ्या मुलीना वर्षातून दोन वेळा (ऑगस्ट व फेब्रुवारी महिन्यामध्ये) जंतनाशक गोळ्या वाटप मोहीम राबविण्यात येत आहे.

राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम :- किशोरवयीन मुलांमुलींसाठी प्रभावी संवाद, क्षमता व देखरेख आणि मूल्यमापनासाठी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने किशोरवयीन आरोग्यासाठी राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम हा नवीन कार्यक्रम सुरु केला आहे.

या कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत- पौगंडावस्थेतील मुला-मुलींमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे होणाऱ्या रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे,  लैंगिक पुनरुत्पादन संबंधी ज्ञान, दृष्टीकोन व वर्तन सुधारणा करणे, किशोरवयीन वयात गर्भधारणा कमी करणे,  प्रसूतीपूर्व व पालकत्व सहाय्यबाबत समुपदेशनाद्वारे सुधारणा, किशोरवयीन मानसिक आरोग्याची समस्या संबोधित करणे,  किशोरवयात आपापसात जखम व हिंसा प्रतिबंधित करण्यासाठी अनुकूल दृष्टीकोन प्रवृत्त करणे,  मादक पदार्थांच्या अनिष्ट परिणामाबाबत जागरुकता किशोरवयात वाढविणे,  मानसिक ताण, रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार टाळण्यासाठी पौगंडावस्थेतील बदलाबद्दल प्रोत्साहन देणे.

 राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमांतर्गत पीअर एज्युकेटरची गावपातळीवरील कार्य, किशोरवयीन आरोग्य दिवस साजरा करणे, वर्तणूक बदल संवाद व माहिती शिक्षण संवाद बाबत कार्य हे उपक्रम राबविण्यात येतात.

या लेखांविषयी आपल्या प्रतिक्रिया व अभिप्राय arogyapatrikamh@gmail.com या ई-मेलवर तसेच पत्रव्यवहारासाठी मुख्य संपादक, महाराष्ट्र आरोग्य पत्रिका तथा उपसंचालक, आरोग्य सेवा, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, परिवर्तन, आरोग्य भवन परिसर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे-411006 येथे संपर्क साधावा.

 

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

रायगड-अलिबाग

                                                               000000                                                                      (क्रमश:)

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक