“महाआरोग्य योजना-सार्वजनिक आरोग्य योजना व कार्यक्रम” (भाग-4)

 

विशेष लेख क्रमांक :-41                                                                                             दिनांक :- 23 डिसेंबर 2022

 

 


आरोग्य सेवांचा मूळ उद्देश आरोग्य सुधारणे हा असून, लोकांचे जीवनमान सुधारावे व निरोगीपणे जगता यावे यासाठी, आरोग्य शिक्षण व सेवा यावर भर देण्यात आला आहे. आरोग्य सेवा ही सामाजिक आरोग्य क्षेत्र, यात प्राथमिक आरोग्य सेवा, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचाही समावेश होतो. या माध्यमातून लोकांना आरोग्य सेवांची उपलब्धता करून देण्यात येते. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून शासनाच्या वतीने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध योजना आखण्यात आलेल्या आहेत. या आरोग्य सेवा अधिकाधिक लोकाभिमुख झाल्यास लोकांना चांगले आरोग्य लाभून समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते.

सामाजिक क्षेत्राबरोबरच स्वयंसेवी संस्था व खाजगी क्षेत्र या माध्यमातून अंगीकृत रुग्णालयातून आपल्या सेवा या देत असतात, त्या सेवांशीही शासन सामाजिक आरोग्य क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न करीत आलेले आहे. निरोगी महाराष्ट्राच्या दृष्टीने विविध महाआरोग्य योजना सामान्य माणसासाठी शासनाच्या वतीने साकारलेल्या आहेत.  या लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन लोकांनी त्याचा अधिकाधिक उपयोग घेण्यासाठी व त्या लोकाभिमुख करण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे, यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांचेदेखील मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे, असे मनोगत आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई च्या संचालक, डॉ.साधना तायडे तसेच आरोग्य सेवा, पुणे चे संचालक, डॉ.नितीन अंबाडेकर यांनी नोव्हेंबर-2022 च्या महाराष्ट्र आरोग्य पत्रिकेच्या महाआरोग्य योजना-सार्वजनिक आरोग्य योजना व कार्यक्रम या विशेषांकातून व्यक्त केले आहे. या पुस्तिकेचे संपादन डॉ.कैलास बाविस्कर यांनी केले आहे.

चला तर जाणू घेवूया…काय आहेत या आरोग्य योजना, काय आहेत या योजनांचे लाभ ….

 

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचे आयोजन दर महिन्याच्या 9 तारखेला व 9 तारखेला रविवार किंवा सुट्टी असेल तर त्यापुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात येते. जिल्हास्तरावर हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा : मोफत प्रयोगशाळा चाचण्या, लाभार्थीचा वैद्यकीय पूर्व इतिहास घेऊन तपासणी करुन व धोक्याची लक्षणे, गुंतागुंत व कोणतीही जोखीम नसल्याची खात्री करण्यात येते, प्रसूतीपूर्व तपासणीसाठी आलेल्या सर्व लाभार्थीचा रक्तदाब, पोटावरुन तपासणी व गर्भपिंडाच्या हृदयाचे ठोके तपासतात,  शोधलेल्या सर्व अतिजोखमीच्या मातांना उच्च संस्थेमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले जाते आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत उच्च संस्थेमध्ये योग्य ते उपचार दिले जातात. सर्व लाभार्थ्याला एमसीपी कार्ड देण्यात येते,  सर्व गरोदर मातांची गरोदरपणातील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात एक सोनोग्राफी करण्यात येते.

अभियानाच्या दिवशी आलेल्या सर्व लाभार्थीचे गरोदरपणातील तपासणी, गरोदरपणातील धोक्याची लक्षणे बाळाच्या जन्माची तयारी, गरोदरपणातील गुंतागुंतीची तयारी, लोहयुक्त गोळ्या व कॅल्शियमच्या गोळ्यांचे सेवनाचे महत्त्व, संस्थात्मक प्रसूती, संदर्भ सेवा, जननी सुरक्षा योजनेंतर्गत व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारा लाभ, प्रसूतीपश्चात काळजी, स्तनपान व पूरक आहार,संस्थात्मक प्रसूती व प्रसूतीपश्चात कुटूंब नियोजनाबाबत समुपदेशन केले जाते.

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) सहभाग : शासकीय संस्था वगळता अजून एखादी खासगी संस्था स्वेच्छेने विनामूल्य सेवा या अभियानाच्या दिवशी देण्यास तयार असल्यास त्यांना या अभियानामध्ये समाविष्ट करुन घेतले जाते व त्यांच्यामार्फत सेवा त्यांच्या स्वतःच्या संस्थेमध्ये देण्यात येतात. अभियानादरम्यान खाजगी संस्थांनी शोधलेल्या अतिजोखमीच्या मातांना शासकीय आरोग्य संस्थांमध्ये संदर्भ चिठ्ठीसहीत संदर्भित केले जाते.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिकाधारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिकाधारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. या योजनेचा प्रारंभ 02 जुलै 2012 रोजी करण्यात आला.

उद्दिष्ट्य : राज्यातील नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे निःशुल्क व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे.

योजनांची अंमलबजावणी : एकत्रित योजनेची अंमलबजावणी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून शासकीय विमा कंपनी व तृतीय पक्ष प्रशासक कंपन्या (TPAS) यांच्यामार्फत केली जाते.

एकूण पॅकेजेस: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजननेमध्ये 996 पॅकेजेस व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1  हजार 209 पॅकेजेस आहेत.

योजनेतील लाभ : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना रु. 1 लाख 50 हजार प्रति वर्ष, प्रति कुटुंब (कुटूंबातील सर्व सदस्य मिळून एकत्रितपणे). मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी रु. 2 लाख 50 हजार प्रति वर्ष प्रति कुटुंब इतकी मर्यादा आहे.

 पॅकेजमध्ये समाविष्ट घटक : यामध्ये रुग्ण रुग्णालयात आल्यापासून ते डिस्चार्ज झाल्यानंतर पाठपुरावा सेवा यांचा समावेश होतो. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयीन उपचार, निदानासाठी लागणाऱ्या चाचण्या, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन आणि परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयातून सुटी केल्यावर पाठपुरावा सेवा आणि 10 दिवसापर्यंत गुंतागुंत झाल्यास त्याचे मोफत उपचार समाविष्ट आहेत.

लाभार्थी :

वर्ग अ : अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वितरीतकरण्यात आलेल्या पिवळ्या, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न) शिधापत्रिका धारक कुटुंबे,

वर्ग ब : औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.

वर्ग क : शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले, शासकीय वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील कागदपत्रांसोबत शासनमान्य वैध फोटो ओळखपत्र आवश्यक आहे.

या लेखांविषयी आपल्या प्रतिक्रिया व अभिप्राय arogyapatrikamh@gmail.com या ई-मेलवर तसेच पत्रव्यवहारासाठी मुख्य संपादक, महाराष्ट्र आरोग्य पत्रिका तथा उपसंचालक, आरोग्य सेवा, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, परिवर्तन, आरोग्य भवन परिसर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे-411006 येथे संपर्क साधावा.

 

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

रायगड-अलिबाग

                                                               000000                                                                      (क्रमश:)

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक