जागतिक आरोग्य संघटना व आय.सी.एम.आर.संघटना पथकाकडून दि.5 ते दि.31 डिसेंबर पर्यंत करण्यात येणार प्रथम टप्प्यातील सर्वेक्षण


अलिबाग,दि.5(जिमाका):- रायगड जिल्ह्याचे सबनॅशनल प्रमाणपत्रासाठी नामांकन जागतिक आरोग्य संघटना व आय.सी.एम.आर.यांच्याकडून जिल्ह्यात क्षयरोगाचे प्रमाण किती किती टक्के आहे, जिल्ह्यातील क्षयरोगाचे रुग्ण संख्या सातत्याने कमी होते आहे, जिल्ह्याची क्षयरोग मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे का, याची पाहणी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना व आय.सी.एम.आर. संघटना यांच्या पथकाकडून प्रथम टप्प्यातील सर्वेक्षण दि.5 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत करण्यात येणार आहे.

यासाठी गेल्या सन-2015 पासूनच्या ड्रग सेल डाटा मागविण्यात आलेला असून, त्यानुसार त्याचा अभ्यास करून जिल्ह्याचे नामांकन सबनॅशनल प्रमाणपत्रासाठी करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील दहा तालुक्यातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे. या दहा गावांतून पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी एका गावातून दोन स्वयंसेवकाची निवड करण्यात आली असून वीस स्वयंसेवक निवडण्यात आले आहेत. निवड झालेले स्वयंसेवक  सर्वेक्षण कशा प्रकारे करतील, याची सविस्तर माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील  यांना दिली आहे.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार दि.30नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत हे प्रशिक्षण अलिबाग जिल्हा परिषद येथील टिपणीस सभागृहात पार पडले.  यासाठी जागतिक आरोग्य संघटनाचे रायगड जिल्ह्याचे सल्लागार म्हणून डॉ.अविनाश जाधव यांनी अतिशय सुंदर व सोप्या भाषेत आपले मनोगत व्यक्त करुन उपस्थितांना माहिती समजून सांगितली. तसेच इंडियन मेडिकल कौन्सिल रिसर्च या जागतिक स्तरावरील संस्थेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी मेडिकल कॉलेज,पनवेलचे डॉ.प्रा.प्रसाद वायंगणकर, प्रा.मेजर डॉ.आश्लेषा तावडे, प्रा.डॉ. सुनिला संजीव यांनी आपल्या मनोगतात अतिशय सखोल माहिती या प्रशिक्षण दरम्यान दिली.

सर्वप्रथम या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या हस्ते या प्रशिक्षणाची कार्यक्रम पुस्तिका व माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. यावेळी आपल्या जिल्ह्याला या उपक्रमाचे सर्वोत्तम कामगिरीचे प्रमाणपत्र व पारितोषिक मिळाले पाहिजे, या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करू या. यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, यासाठी त्या त्या गावातील लोकप्रतिनिधींना विनंती करण्यात आली आहे.  तसेच तेथील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.  हे सर्वेक्षण पूर्णपणे ऑनलाईन होणार असून त्याची सर्व अद्ययावत माहिती जागतिक आरोग्य संघटनांना समजू शकते. हे सर्वेक्षण  अत्यंत महत्वाचे असल्याचे सर्व शासकीय यंत्रणांनाही कळविण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील यांनी या कार्यक्रमात सर्वांनी सक्रीय योगदान देवून जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी आपण या सबनॅशनल सर्वेक्षणादरम्यान निवडलेल्या गावातील एकही घर सोडून देऊ नका, त्यांचे नाव या सर्वेक्षणात आलेच पाहिजे, असे उत्तम कार्य आपण करू, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच त्यांनी जागतिक आरोग्य संघटनाचे सल्लागार डॉ.अविनाश जाधव यांनी या प्रशिक्षणाची अतिशय महत्वपूर्ण माहिती उपस्थितांना दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

यावेळी डॉ.अशोक कटारे, डॉ.प्रताप शिंदे, आरोग्य सहाय्यक श्री.जयवंत विशे, श्री. नरेंद्र तांडेल तसेच जिल्हा पी.पी.एम.समन्वयक श्री. सतिश दंतराव, औषध निर्माण अधिकारी श्री.दत्तात्रेय शिंदे, डॉट प्लस सुपरवायझर श्री.मनोज बामणे, श्रीमती वृषाली पाटील, डेटा एन्ट्री ऑपरेटर तसेच निवड झालेले स्वयंसेवक आदि उपस्थित होते.

शेवटी डॉ.सुरेश ठोकळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच हे सर्वेक्षण सूचना दिल्याप्रमाणे काटेकोरपणे केल्यास आपण नक्कीच यासाठी पात्र ठरु व  जिल्ह्याला पारितोषिक मिळवून देवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक