जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनामार्फत कबड्डी चषक स्पर्धेचे उत्साहात आयोजन “आपली माती-आपला खेळ, ले पंगा-खेल कबड्डी” घोषणांनी दुमदुमले पीएनपी महाविद्यालयाचे मैदान

 


 

अलिबाग,दि.14(जिमाका):- , जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली  बुधवार, दि. 14 डिसेंबर 2022 रोजी पी.एन.पी. महाविद्यालय, वेश्वी, अलिबाग येथील क्रीडांगणावर रायगड जिल्हा प्रशासनाने आयोजित आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने कबड्डी चषक स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह ॲड. आस्वाद पाटील, श्रीमती चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डीपट्टू श्री.दिलीप धुमाळ, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी यांच्या हस्ते मैदानावर श्रीफळ वाढवून संपन्न झाले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम पोशट्टी, तहसिलदार विशाल दौंडकर, पीएनपी महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, सीईओ संजय मिरजी, प्राचार्य डॉ.ओंकार पोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन निकम, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रसाद भोईर, उपाध्यक्ष संजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार राहुल वाघमारे, तांत्रिक समिती प्रमुख जनार्दन पाटील, अलिबाग तालुका क्रीडा समन्वयक रमेश भगत यांची उपस्थिती होती.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ.महेंद्र कल्याणकर म्हणाले की, रायगड जिल्ह्यात अनेक उत्तमोत्तम खेळाडू आहेत, भविष्यात अनेक खेळाडू घडतील, यासाठी जिल्हा प्रशासन देखील प्रयत्नशील राहील. खेळाडू आणि शासकीय अधिकारी, नागरिक यांचे जिव्हाळयाचे नाते टिकविण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून एक सुरुवात केली आहे. हे नाते अधिक वृध्दींगत व्हावे, यासाठी यापुढेही अशा प्रकारच्या स्पर्धा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नेहमीच भरविण्यात येतील. त्याकरिता जिल्हा प्रशासन खेळाडूंना, पदाधिकाऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करील. शेवटी ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी पी.एन.पी. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी त्यांचे विशेष आभार मानले.  

ॲड.आस्वाद पाटील हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने अशा प्रकारची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा अनुभव सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभागी पदाधिकारी व खेळाडूंना उपलब्ध करुन दिलेल्या उत्कृष्ट सोयी-सुविधांचा आवर्जून उल्लेख केला. जगभरात कबड्डी हा खेळ अतिशय लोकप्रिय होत आहे.या खेळाडूंच्या पाठीवर जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी दिलेली कौतुकाची थाप अधिक मोलाची आहे, असे सांगून भविष्यात या खेळाला अधिक चांगले दिवस येणार असल्याचा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला तसेच अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजनात पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनास मन:पूर्वक  धन्यवाद दिले.    

   या कबड्डी चषक स्पर्धेत रायगड जिल्हा वरिष्ठ गट कबड्डी निवड चाचणी स्पर्धेतील प्रथम 16 पुरुष संघ आणि प्रथम 8 महिला संघ सहभागी झाले होते.  या स्पर्धेतील प्रावीण्य प्राप्त संघांना (प्रथम, द्वितीय आणि तृतीय) चषक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक(प्रथम-31 हजार,  द्वितीय-21 हजार, आणि तृतीय-11 हजार)  देण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या सहकार्याने डॉ.आशिष मिश्रा व डॉ.अजित बरगे यांच्यासह वैद्यकीय पथक मैदानावर तैनात करण्यात आले होते.

या कबड्डी स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक