प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय मित्र बनविण्यासाठी औद्योगिक वसाहतींना भेटी

 

अलिबाग,दि.15(जिमाका) :- प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय मित्र बनविण्यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद रोकडे यांनी औद्योगिक वसाहतींना भेटी दिल्या. दि.14 डिसेंबर 2022 रोजी खालापूर येथील वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्र,व खोपोली अंतर्गत असलेल्या औद्योगिक वसाहतींना भेटी देऊन त्यांना निक्षय मित्र बनवून क्षय रुग्णांना त्यांचे उपचार सुरू असेपर्यंत दत्तक घेऊन, त्यांना पोषक आहार देण्यासाठी माहिती देण्यात आली.

गोदरेज कंपनी लि. चे श्री. तानाजी चव्हाण यांनी याबाबतचा सविस्तर प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर मंजूरीकरिता दिला आहे, तसेच जास्तीत जास्त क्षयरुग्णांना निक्षय मित्र साहाय्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानासह असलेली Trunaat मशीनही मंजूर होईल, असेही त्यांनी सांगितले. या मशीनचा उपयोग खालापूरवासियांना होईल. खालापूरमधील क्षयरुग्णांना तपासणीसाठी व अहवालासाठी इतरत्र कोठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही, आता ती सुविधा जवळच्याच आरोग्य केंद्रात उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

 याबाबत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद रोकडे यांनी त्यांचे आभार मानले. उत्तम फ्लोर मिल ही कंपनी देखील निक्षय मित्र बनून जवळपास 50 क्षयरुग्णांना पोषक आहाराचे किट पुरवठा करून देईल, असे आश्वासन कंपनीचे मानव संसाधन प्रमुख श्री.महादेव हजारे, महाव्यवस्थापक श्री.विकास आत्तरडे, श्री. सचिन जाधव यांनी दिले. इनोफोसिथ इंडिया टेक्नॉलॉजी लि.यांनी 100 क्षयरुग्णांना दत्तक घेऊन निक्षय मित्र म्हणून नोंदणी केली.   लवकरच एका कार्यक्रमात या सर्व क्षयरुग्णांना पोषक आहार किटचे वाटप करण्यात येणार आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री.सरोज बेहरम यांनी सांगितले. यावेळी डॉ.वंदनकुमार पाटील यांनी या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री.एस.के.पंडित, आरोग्य सेवक श्री.एस.एल.थवई, जिल्हा पी.पी.एम.समन्वयक श्री.सतिश दंतराव, श्री.कृष्णा पाटील, श्री.महेंद्र पिंगळे व श्री.योगेश म्हेशे आदि उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक