लोकसेवेसाठी प्रामाणिक भावना आणि जिद्द आवश्यक ---कोकण विभागीय माहिती आयुक्त सुनिल पोरवाल

 


 

 

अलिबाग,दि.23 (जिमाका) :- प्रशासनातील शेवटच्या घटकाकडून जनसामान्यातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय लाभ पोहोचणे अपेक्षित आहे. त्यानुषंगाने लोकसेवेसाठी प्रामाणिक भावना आणि जिद्द आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोकण खंडपीठाचे विभागीय माहिती आयुक्त श्री.सुनिल पोरवाल यांनी आज येथे केले.

 केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा तथा लोकतक्रार निवारण विभाग, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  दि.19 ते 25 डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह-प्रशासन गाव की ओर” साजरा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच अप्पर मुख्य सचिव (प्रशासकीय सुधारणा, रचना व कार्यपध्दती) श्रीमती सुजाता सौनिक, रायगड जिल्ह्याचे पालक सचिव मनोज सौनिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुशासन कार्यशाळा संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

  यावेळीअप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, तहसिलदार विशाल दौंडकर, डॉ.सतीश कदम, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, विविध शासकीय विभागांचे कार्यालयप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

श्री.पोरवाल पुढे म्हणाले की, जनतेला आवश्यक सेवा देण्यासाठी शासन-प्रशासनातील शेवटच्या घटकाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान दिवसेंदिवस अधिक अद्ययावत होत आहे.  जनतेला सेवा देणाऱ्या बाबींमधील मानवी हस्तक्षेप कालांतराने कमी होईल, काही क्षेत्रात संपूर्ण संपेलही. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही गोष्ट निश्चितच घडणार आहेच. तोपर्यंत प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जनतेला शासकीय लाभ देण्यासाठी, त्यांच्या सर्वांगीण हितासाठी जिद्दीने काम करणे महत्वाचे आहे. शेवटच्या घटकापासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांनी लोकसेवेचा वसा घेणे आवश्यक आहे. मनाशी ठरविले तर प्रशासनातील प्रत्येक घटकास सुप्रशासन उपक्रमात काही ना काही तरी आपली उपयुक्तता दाखविण्याची संधी मिळू शकेल.  ठरविल्याप्रमाणे लोकसेवेचे उद्दिष्ट साध्य केल्यानंतर त्यातून मिळणारे मानसिक समाधान अवर्णनीय असेल.  

या कार्यशाळेच्या निमित्ताने जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी कृषी विभागाच्या योजना व उपक्रम, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी आदिवासी बांधवांकरिता असणाऱ्या योजना व त्यांच्यासाठी राबविलेले उपक्रम तसेच तहसिलदार विशाल दौंडकर यांनी जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तसूत्री-कातकरी उत्थान अभियानाच्या माध्यमातून राबविलेले उपक्रम या विषयांवरील अतिशय माहितीपूर्ण असे सादरीकरण केले.

प्रास्ताविकात अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र, कातकरी उत्थान अभियानांतर्गत सप्तसूत्री कार्यक्रमसमग्र रायगड कॉफी टेबल बुक, परिवर्तन अंक व अशा इतर अनेक उपक्रमांविषयी आणि या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना झालेला लाभ याबाबत सविस्तर मनोगत व्यक्त केले.  प्रशासनात आपण लोकसेवक म्हणून लोकहितास्तव अत्यंत जबाबदारीने काम करणे, हे आपले कर्तव्यच असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले तर आभार उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी मानले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक