हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तारांकित, अतारांकित प्रश्नांबाबत सर्व शासकीय विभागांनी अभ्यासपूर्वक माहिती तयार ठेवावी -- पालकमंत्री उदय सामंत

 

अलिबाग,दि.15 (जिमाका):-  लवकरच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे.  या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याशी संबंधित असलेल्या तारांकित/अतारांकित प्रश्नांबाबत सर्व शासकीय विभागांनी अधिकृत माहिती अभ्यासपूर्वक तयार ठेवावी, असे राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले.

 हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त तारांकित/अतारांकित संदर्भांबाबतची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अलिबाग उपवनसंरक्षक अधिकारी आशिष ठाकरे, रोहा उपवनसंरक्षक अधिकारी आप्पासाहेब निकत, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील तसेच विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

 यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले की, अधिवेशन काळात कोणीही मुख्यालय सोडू नये. आपापल्या विभागाची इत्यंभूत अधिकृत माहिती तयार करावी. ज्या विभागाकडे एखाद्या विषय/संदर्भाबाबतची विचारणा होईल, त्यावेळी त्या विषय/संदर्भाबाबतची सविस्तर माहिती तात्काळ मिळेल यासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहावे.  कोणत्याही परिस्थितीत रायगड जिल्ह्याची प्रतिमा खराब होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेणे आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.  हिवाळी अधिवेशन काळात रायगड जिल्ह्याविषयी मांडल्या जाणाऱ्या प्रश्नांना योग्य उत्तरे सादर करून जिल्ह्याची प्रतिमा चांगली ठेवण्याचा एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्र्यांचे हस्ते गौरविण्यात आले

कबड्डी चषक स्पर्धेच्या प्रथम क्रमांक विजेत्या संघाना

रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासन आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कबड्डी चषक स्पर्धेच्या प्रथम क्रमांक विजेत्या संघाना (महिला गट- प्रथम - कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल, पुरुष गट- प्रथम - पांडवादेवी रायवाडी, तालुका अलिबाग, आकर्षक चषक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक (प्रथम क्रमांक - रुपये 31 हजार) पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

विभागीय क्रीडा स्पर्धेत विजेत्या

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा गौरव

नुकतीच पोलीस विभागाची कोकण विभागीय क्रीडा स्पर्धा-2022 पार पडली. या स्पर्धेत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने 224 गुण मिळवून सर्वसाधारण विजेते पद (जनरल स्पोटर्स चॅम्पियनशिप) पटकावले. याकरिता पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि पोलीस खेळाडूंचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले.

त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार बलवंत वालेकर तसेच झी-24 तास चे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री श्री.उदय सामंत यांनी पुष्पगुच्छ देऊन दोघांचे अभिष्टचिंतन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक