सुंदरराव मोरे महाविद्यालयात एड्स जनजागृती प्रचारफेरी व विशेष व्याख्यान कार्यक्रम संपन्न

 



 

अलिबाग,दि.02 (जिमाका) : जागतिक एड्स दिन व सप्ताहानिमित्त येथील शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ग्रामीण रुग्णालय पोलादपूरच्या एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र (आयसीटीसी सेंटर) यांच्या सहकार्याने रेड रिबन क्लब अंतर्गत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक सौ.भाग्यरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली (दि.01 डिसेंबर 2022) रोजी विशेष व्याख्यान व जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. राम बरकुले व प्रा. डॉ.जयश्री जाधव-पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आयसीटीसी विभागाच्या सौ.सीता जाधव, सक्षम मायग्रंट टी आय या सामाजिक संस्थेचे श्री. कुणाल खुटवळ, श्री.रोशन पहेलकर  आदी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना सक्षम सामाजिक संस्थेचे कुणाल खुटवळ यांनी तरुण पिढीने एड्स या मानवजातीला आव्हान ठरू पाहणाऱ्या आजाराबद्दल योग्य ती शास्त्रीय माहिती प्राप्त करून त्याच्या आधारे समाजातील सर्व घटकांपर्यंत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. समाजामध्ये एचआयव्ही म्हणजेच एड्स हा गैरसमज मोठ्या प्रमाणात असून तो दूर करण्यासाठी युवापिढीने  पुढाकार घेण्याची आवश्यकता श्री खुटवळ यांनी आपल्या मनोगतातच्या अखेरीस व्यक्त केली.

  यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन करताना ग्रामीण रुग्णालय पोलादपूर आयसीटीसी केंद्राच्या वतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ.सीता जाधव यांनी एच.आय.व्ही. विषाणूंची लागण, त्याबाबतच्या विविध चाचण्या, सध्या एचआयव्ही बाधित रुग्णांची लक्षणे, रुग्णांसाठी उपलब्ध असलेले उपचार याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्यावतीने एचआयव्ही आणि एड्स संदर्भात विविध सरकारी रुग्णालयांच्या आयसीटीसी केंद्राद्वारे एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी त्यांची ओळख गुप्त ठेवून एआरटी उपचार पद्धती व समुपदेशन मोफत उपलब्ध करून दिले जाते. या आधुनिक उपचारपद्धतीमुळे आणि योग्य जीवनशैली यांचे पालन केल्यास एचआयव्ही बाधित रुग्ण उत्तमप्रकारचे आयुष्य जगू शकतात. त्याचप्रमाणे एचआयव्हीबाधित गरोदर महिलांना योग्य वेळी उपचार मिळाल्यास जन्माला येणाऱ्या बालकाला एचआयव्ही संक्रमणापासून वाचवता येते असे सांगून सौ.सीता जाधव यांनी प्रत्येक व्यक्तीने स्वयंप्रेरणेने स्वतःची एचआयव्ही चाचणी करून घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले तसेच एचआयव्ही/एड्स उपचारा बाबतची अधिक माहिती  1097 या टोल फ्री दूरध्वनीद्वारे कशा प्रकारे घेता येईल, याची माहिती सर्वांना दिली.

 एचआयव्ही बाधित रुग्णांबरोबर समानतेची वागणूक तसेच लग्नाअगोदर ब्रह्मचर्य आणि लग्नानंतर एक पत्नी व्रत आणि गुप्तरोग टाळण्यासाठी कंडोमचा वापर इत्यादी विषयांबाबतही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

 कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.राम बरकुले यांनी युवा पिढीने विवाह ठरवताना पत्रिका पाहण्यापेक्षा नियोजित वधू-वरांनी आपली आरोग्य चाचणी आणि विशेषत: एचआयव्ही चाचणी करून घेण्यासाठी आग्रही राहण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

   या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीपक रावेरकर यांनी एड्स आणि एचआयव्ही संक्रमण याबाबत समाजामध्ये असलेले गैरसमज दूर करून त्याबाबत आजमितीस उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचारांबाबत तरुण पिढीला माहिती व्हावी, यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम उपयुक्त असल्याचे सांगून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या आयसीटीसी सेंटरने याबाबत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले. एडस या आजाराकडे कलंक म्हणून न पाहता एचआयव्ही बाधित रुग्णांना समभावाची व सहकार्याची वागणूक देणे आवश्यक असल्याचे डॉ.रावेरकर यांनी आपल्या मनोगतातच्या अखेरीस सांगितले.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.डॉ.वसंत डोंगरे व प्रा.डॉ. शैलेश जाधव यांनी केले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक