रायगड कृषी विभागामार्फत आत्मनिर्भर अभियानांतर्गत कृतीसंगम कार्यशाळा संपन्न

 

 

अलिबाग,दि.08 (जिमाका) :- कृषी पायाभूत सुविधा निधी(AIF) योजनेच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अलिबाग येथे (दि.07 डिसेंबर 2022) रोजी निवासी जिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा  संपन्न झाली.

या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचे राज्य समन्वयक श्री एम.एम कांबळे यांनी सांगितले की, ही योजना सन 2021- 22 ते 2032 - 33 या कालावधीसाठी आयोजित करण्यात आली आहे. तसेच या योजनेंतर्गत 8 हजार 460 कोटी रुपये अनुदान महाराष्ट्र स्तरावर उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यातील आतापर्यंत या योजनेंतर्गत 7 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.  या योजनेंतर्गत 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात असून यामध्ये लाभार्थ्यांना 3 टक्के व्याजदरामध्ये सवलत दिली जाते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या योजनेंतर्गत लाभार्थी अर्ज प्रक्रिया ते अनुदान मिळणे पर्यंतच्या पूर्ण प्रक्रिया संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थित प्रशिक्षणार्थींना कार्यशाळेमध्ये दाखविण्यात आली.

या कार्यशाळेमध्ये उपजिल्हाधिकारी डॉ.पद्श्री बैनाडे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यामध्ये कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजना प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणा व बँक प्रतिनिधी यांच्यामार्फत मेळावे आयोजित करून या योजनेचा व्यापक प्रसार केला जाईल.  तसेच रायगड जिल्ह्यातील शेतमाल हा मुंबई-पुणे शहरांमध्ये विक्रीसाठी जाण्यासाठी या योजनेंतर्गत प्रक्रिया युनिट, गोडाऊन व इतर सुविधा उभारल्या जातील, या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम.उज्वला बाणखेले यांनी रायगड जिल्ह्यामधील भात व आंबा या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी गोडाऊन व प्रक्रिया युनिटची आवश्यकता आहे,  तरी कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) या योजनेंतर्गत तालुक्यातील वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट , शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे सांगितले.

जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्री.कुलकर्णी यांनी कृषी पायाभूत सुविधा निधी योजना सक्षमपणे राबविण्यासाठी बँकांमार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल व जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर केले जातील, असे सांगितले,

या कार्यशाळेसाठी रायगड जिल्ह्यातील  शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अध्यक्ष व संचालक मंडळ, जिल्हा व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा प्रबंधक रायगड श्री.प्रदीप अपसंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळ्ळया, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे प्रमुख व्यवस्थापक श्री.नांदगावकर, प्रकल्प उपसंचालक आत्मा श्री.सतीश बोराडे, जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक  श्रीम.वर्षा पाटील तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी ,मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक