जिल्ह्यात गोवर परिस्थिती नियंत्रणात मात्र नागरिकांनी लसीकरण मोहिमेस सहकार्य करावे --जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

 


 

अलिबाग, दि.09 (जिमाका) :- राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेताना गोवर उद्रेक प्रतिबंध व नियंत्रण संदर्भात टास्क फोर्स सभा घेण्याची सूचना व्ही.सी. व्दारे दिली होती. त्यानुसार दि.02 डिसेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र रोकडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती ज्योत्सना शिंदे तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए) चे अध्यक्ष डॉ. विनायक पाटील उपस्थित होते.

या बैठकीमध्ये गोवर उद्रेक व उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सार्वजनिक विभागाव्यतिरिक्त सर्व शासकीय विभागांकडून मदत घेण्यात यावी, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, वैदयकीय शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग सर्वेक्षणात मदत घ्यावी, आय.एम.ए, निमा, आय.ए.पी या सारख्या खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांच्याकडूनही मदत घ्यावी, लसीकरण जनजागृती आपल्या क्षेत्रामध्ये प्रभावीपणे करावी, लसीकरण व सर्वेक्षण कृती आराखडे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये तयार करण्यात यावे, ताप, पुरळ रुग्णांचे गतिमान सर्वेक्षण करण्यात यावे, जिल्हयातील गोवर हॉटस्पॉटचा शोध घेवून स्थानिक सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना दिल्या.  तसेच नागरिकांनी घाबरु नये, कोणत्याही परिस्थितीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सर्व प्रकारे सज्ज असून जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेस नागरिकांनी सर्व प्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन

सध्या रायगड जिल्ह्यामध्ये गोवर प्रभावित भागामध्ये एकूण 26 सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत, 10 हजार 962 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.  14 हजार 92 बालकांना गोवर रुबेलाचा पहिला डोस देण्यात आला आहे.  तसेच 12 हजार 757 बालकांना गोवर रुबेलाचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणार आजार आहे. हा आजार  मुख्यत्वे पाच वर्षाखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळयांची जळजळ सुरुवातीला चेहऱ्यावर व नंतर उर्वरीत शरीरावर लाल सपाट पुरळ ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. गोवरमुळे मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्युमोनिया, क्वचित फेफडे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होवू शकते. हा आजार लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे.

रायगड जिल्ह्यात माहे जानेवारी 2022 पासून खालापूर तालुक्यात 6 रुग्ण, पनवेल 2 रुग्ण, उरण 6 रुग्ण असे एकूण 14 रुग्ण आढळले आहेत. तसेच 01 एप्रिल 2022 पासून 123 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 14 बालके गोवर पॉझिटीव्ह आली आहेत. यावर्षी रायगड जिल्हयात एका रुग्णाची नोंद झाली असून ज्या भागात या रुग्णांची नोंद झाली आहे त्या भागात गोवर रुबेला लसीची अतिरिक्त मात्रा नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना देण्यात आली आहे. तसेच या बालकांसाठी विशेष व नियमित सत्रामध्ये लसीकरण करण्यात येत आहे.

जिल्हास्तरावर  2 हजार 80 डोस, तर प्राथमिक आरोग्य केंद्रावर 22 हजार 150  गोवर रुबेला लससाठा उपलब्ध आहे.

रायगड जिल्हयामध्ये सध्या सुरु असणाऱ्या गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबातील नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना यापूर्वी लस दिली नसल्यास तात्काळ या बालकांचे लसीकरण करुन घ्यावे. गोवर रुबेला लस सर्व शासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी मोफत उपलब्ध आहे.

नागरिकांनी घाबरु नये, कोणत्याही परिस्थितीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सर्व प्रकारे सज्ज असून जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेस नागरिकांनी सर्व प्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक