आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जिल्हा कार्यकारी समिती आढावा बैठक संपन्न

 


 

अलिबाग,दि.12(जिमाका):- पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्राने 2023 वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. याचाच एक भाग म्हणून विभागीय आयुक्त कोकण विभाग तथा जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष 2023 रायगड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार असून जिल्ह्यातील अतिदूर्गम गावापासून ते पनवेल, नवी मुंबई या मोठ्या शहरापर्यंत पौष्टिक तृणधान्याची लागवड, त्याची प्रक्रिया व आहारातील महत्व याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

पौष्टिक तृणधान्य वर्ष संकल्पनेत अंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, सावा, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकाचे आरोग्यविषयक लाभ व जनजागृती करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे हे प्रमुख हेतू आहेत. यानुषंगाने विभागीय आयुक्त, कोकण तथा जिल्हाधिकारी रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार (दि. 11 जानेवारी, 2023) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हा कार्यकारी समितीची आढावा सभा संपन्न झाली.

या जिल्हा कार्यकारी आढावा बैठकीस कृषी विभागाबरोबरच, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विद्यापीठ, ग्राम विकास विभाग, आदिवासी विभाग, महागनरपालिका, माहिती अधिकारी व जनसंपर्क विभाग, शालेय शिक्षण विभाग, आरोग्य विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा कार्यकारणी आढावा सभेमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे  यांच्या शुभहस्ते आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने जिल्हयाच्या Facebook Page चे तसेच पौष्टिक तृणधान्य माहिती पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले. या बैठकीमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम. उज्ज्वला बाणखेले यांनी "आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023" साजरे करण्याच्या अनुषंगाने वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे व इतर विभागांच्या सहभागाबाबतचे संगणकीय सादरीकरण केले.

या आढावा बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 20023 साजरे करण्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये वन विभाग, कामगार कल्याण विभाग, राज्य परिवहन महामंडळ, आयसीडीएस, महिला व बाल विकास या विभागांचा समावेश करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी सूचना दिल्या. तसेच प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा महिला व बालकल्याण, आदिवासी विभाग, क्रीडा विभाग, कामगार कल्याण विभाग यांनी या उपक्रमात सक्रियपणे सहभाग घेण्याबाबत निर्देश दिले.

दि. 6 जानेवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मकर संक्रांती – भोगी हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्याबाबत सूचित केले आहे. त्यानुसार रायगड जिल्हयामध्ये देखील हा दिवस साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम. उज्ज्वला बाणखेले यांनी केले.

या पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून प्रत्येक कृषी सहाय्यक आपल्याकडील गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती. त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देणे यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहार तज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. या विविध उपक्रमांचे जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसिध्दी तर केली जाईलच मात्र कृषी व संलग्न विभागांनीही आपल्या स्तरावरून या उपक्रमाची व्यापक प्रचार व प्रसिद्धी करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी नमूद केले.

या बैठकीमध्ये उपस्थितांना पौष्टिक तृणधान्यापासून बनविण्यात आलेल्या नाचणी व ज्वारी मुरमुरा आणि नाचणी केक यांचा अल्पोपहार देण्यात येवून सभेची सांगता करण्यात आली.

०००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक