दि.25 जानेवारी 2023 रोजी साजरा करण्यात येणार 13 वा राष्ट्रीय मतदार दिन

 

      अलिबाग,दि.23 (जिमाका):- दि.25 जानेवारी 1950 रोजी मा.भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. मा.आयोगाचा हा स्थापना दिवस सन-2011 पासून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना विशेषतः नव मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरित्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे, हा आहे. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरुक करण्यासाठी केला जातो.

या पार्श्वभूमीवर सर्व मतदार नोंदणी कार्यालयांनी दि.25 जानेवारी 2023 रोजी कार्यक्रम आयोजित करण्याबाबत मा.मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार निवडणूक साक्षरता मंडळे करण्याच्या दृष्टीने यंदाच्या राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम निवडणूक साक्षरता मंडळासोबत साजरा करावयाचा आहे. तसेच दि.25 जानेवारी 2023 ते दि. 02 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मतदार जागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे. या 13 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी Nothing like Voting | Vote for Sure हा विषय देण्यात आला आहे. मा.भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार दि.25 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये "में भारत हूँ" या गीताचे दुपारी 01.00 वाजता प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या निवडणूक साक्षरता मंडळांना सक्षम करण्याच्या दृष्टीने तसेच जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी मतदानाविषयी जनजागृती निर्माण होऊन राष्ट्रीय निवडणूक प्रक्रिया जिल्हास्तरावर, उपविभागीय स्तरावर, तालुकास्तरावर व मतदान केंद्रस्तरावर साजरा करण्यात येणार आहे. यंदाचा राष्ट्रीय मतदार दिन हा जिल्हास्तरावर जे.एस.एम.महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळासोबत संयुक्तपणे साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाची वातावरण निर्मिती करण्यासाठी घोषवाक्ये, भित्तीपत्रके, वक्तृत्व स्पर्धा, इ. स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये विविध शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

 जिल्हास्तरावरील व मतदार नोंदणी अधिकारी, अलिबाग यांच्या स्तरावरचा कार्यक्रम जे.एस.एम.कॉलेज अलिबाग या महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळासोबत संयुक्तपणे साजरा करण्यात येणार आहे. तसेच जिल्हयात एकूण 378 शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (इ.नववी ते बारावी) आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये परिपत्रकानुसार निवडणूक साक्षरता मंडळे व 317 चुनाव पाठशाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

 निवडणूक व मतदान विषयावर आधारित "माझं मत माझं भविष्य  या थीमवर निबंध, वक्तृत्व चित्रकला, रांगोळी, पोस्टर्स, रिल, मीम, गाणे, विडंबन काव्य, घोषवाक्य इ. स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण, लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम, मतदार जागृतीचे दालन (स्टॉल) लावून त्यामध्ये मा.भारत निवडणूक आयोग व मतदार नोंदणी याबाबत जनजागृती, दालनाच्या बाजूला सेल्फी पॉईंट, मतदार जनजागृतीचे व्हिडीओ दाखविणे, नव मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीतील कसे शोधावे, याविषयी प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करणे, राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी स्त्री, पुरुष, अपंग, तृतीयपंथी या नव मतदारांना ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे.  

जिल्हयातील सर्व शाळा व कॉलेज यामध्ये निवडणूक साक्षरता क्लब (Election Literacy Club) व दूर्गम क्षेत्रामध्ये जेथे शाळा व कॉलेज नाही, अशा ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत चुनाव पाठशाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालय, खाजगी कार्यालये यामध्ये मतदार जनजागृती मंच (VAF) स्थापन करण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने VAF मार्फत विविध कार्यक्रम तसेच लोकशाही निष्ठेबाबत शपथ घेण्यात येणार आहे.  राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमास उत्कृष्ट बीएलओ यांना मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी, निवडणूक नायब तहसिलदार, महसूल सहाय्यक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पत्रकार, सामाजिक संस्था यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक