काळजी घ्या..किटकनाशके फवारणी करताना..!

 

बऱ्याचदा शेतात काम करताना शेतपिकाच्या संरक्षणासाठी किटकनाशक फवारणी आवश्यक ठरते. शेतीच्या कामातील तो एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे किटकनाशके फवारणीचे काम करताना स्वत:ची व आपल्या बरोबर काम करणाऱ्या व्यक्तीचीही काळजी घेणे क्रमप्राप्त असते. ही काळजी कशी घ्यावी, याविषयी पुढील लेखातून समजून घेवू या…!

  • किटकनाशक वापरापूर्वी बाटलीवरील लेबल व माहिती पत्रक वाचून खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे.
  • डब्यावरील लाल रंगाचे पतंगाच्या आकाराचे चिन्ह असलेली किटकनाशके सर्वात विषारी त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो ही चिन्हे सोपी व सर्वसाधारण, निरक्षर व्यक्तींसाठी समजण्यासाठी असतात.
  • तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही किटनाशके फवारणीसाठी वापरू नये.
  • मुदतबाह्य किटकनाशकाची फवारणी करू नये.

किटकनाशकाचे मिश्रण तयार करताना कोणती काळजी घ्यावी?:-

  • कृषी विभागाने शिफारस केलेल्या प्रमाणातच रसायने घ्यावी,  
  • रसायनांच्या भुकटीला सुरूवातीला पाण्यात मिसळावे
  • त्यानंतर गरजेनुसार त्यात पाणी टाकावे,  
  • किटकनाशक हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे.

किटकनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी? :-

  • मिश्रण तयार करताना हातमोजे घालणे आणि तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे,  
  • सोबतच फवारणी करतांना अंग झाकलेले असणे गरजेचे असते, यामध्ये हात आणि पायात मोजे, तोंडाला मास्क, डोक्यावर, कापड आणि अंगभर कपडे घालणे गरजेचे आहे.
  • फवारणी करताना पंपाचे नोझल शरिरापासून दूर धरावे, जेणेकरून किटकनाशक अंगावर पडणार नाही, कारण विषबाधा झालेल्या बहुतांशी शेतकऱ्यांमध्ये हीच तक्रार दिसून आली आहे,  
  • वाऱ्याच्या विरूध्द दिशेने फवारणी करू नये,
  • पाऊस येण्याआधी किंवा पाऊस झाल्यानंतर फवारणी करू नये,  
  • फवारणी झाल्यानंतर काही काळ शेतात जाणं टाळावे,
  • फवारणी करताना वापरलेले कपडे किंवा वस्तू इतर कामांसाठी वापरू नये,
  • फवारणी वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे,
  • किटकनाशक फवारणीचे काम 8 तासापेक्षा जास्त करू नये,  
  • फवारणी उपाशीपोटी न करता सकाळी न्याहारी करावी.

किटकनाशक फवारणी यंत्राबाबत कोणती काळजी घ्यावी? :-

  • झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून टाकावे,
  • किटकनाशक फवारताना योग्य नोझलची निवड करणेही गरजेचे असते,
  • तणनाशकासाठी वापरलेला पंप किटकनाशकासाठी वापर करू नये,
  • नोझल अथवा पंप गळका असल्यास त्याचा वापर टाळावा,
  • किटकनाशके फवारणी यंत्रास भरतांना नरसाळ्याचा उपयोग करावा.

फवारणीनंतर कोणती काळजी घ्यावी?:-

  • फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य स्वच्छ धुवून ठेवावे,
  • फवारणीचे काम झाल्यावर हात-पाय, अंग स्वच्छ धुवून खान-पान करावे,
  • फवारणीसाठी वापरलेले साहित्य नदी नाल्यात किंवा विहिरीजवळ धुवू नये.  
  • फवारणीचे साहित्य धुतल्यानंतर वापरलेले पाणी पडीक जमिनीत टाकावे,
  • किटकनाशकाच्या रिकाम्या बाटल्या जमिनीत गाडून टाकाव्यात.

विषबाधेची लक्षणे कोणती व उपाययोजना कोणत्या ?

विषबाधेची लक्षणे :-

  • अशक्तपणा व चक्कर येणे,
  • त्वचेची जळजळ होणे,
  • डाग पडणे,
  • घाम येणे,  
  • डोळ्याची जळजळ होणे,डोळयातून पाणी येणे, अंधुक दिसणे,
  • तोंडातून लाळ गळणे, तोंडाची आग होणे,
  • उलटी येणे, मळमळणे,
  • हगवण होणे,
  • पोटात दुखणे, स्नायू दुखी, डोकेदुखी,
  • जीभ लुळी पडणे,
  • बेशुध्द होणे,
  • अस्वस्थ होणे,

विषबाधेनंतर कोणती माहिती डॉक्टरांना द्यावी? :-

  • रोग्याचा किटकनाशकांशी संपर्क आला होता काय ?,
  • नेमके कोणते किटकनाशक वापरले ?,
  • शरिरात किती गेले? व ते केव्हा गेले ?,
  • विषबाधेचे निदान करण्यासाठी डॉक्टरांसाठी वरील माहिती महत्वाची असते.

विषबाधेनंतर तातडीने कोणते प्रथमोपचार करावेत ?:-

  • किटकनाशके/ तणनाशके डोळ्यात गेल्यास, तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने 5 मिनिटांपर्यंत धुवावेत,
  • शरीरावर किटकनाशक उडाले असल्यास  शरीराचा तो भाग 10 मिनिटे साबणाने स्वच्छ धुवावे व दवाखान्यात न्यावे.
  • विषबाधेनंतर रोगी जर संपूर्ण शुध्दीवर असेल तरच त्याला उलटी करण्यास प्रवृत्त करावे अन्यथा नाही,
  • एक चमचा बारीक लाकडी कोळसा भुकटी करून अर्धा ग्लास पाण्यातून पाजा व लगेच दवाखान्यात न्यावे,
  • विषारी औषध कपड्यांवर उडाले असल्यास ते कपडे लगेच बदला व रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहोचवा.

                                                                                                     (मनोज शिवाजी सानप)

                                                                                                            जिल्हा माहिती अधिकारी

                                                                                                                रायगड-अलिबाग

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक