सुंदरराव मोरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले एड्स जनजागृतीपर पथनाट्य

 


 

 

अलिबाग,दि.18(जिमाका):- युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशात साजरा करण्यात येणाऱ्या युवक सप्ताहाचे औचित्य साधून सामाजिक कार्यात योगदान देण्यासाठी येथील शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित सुंदरराव मोरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ग्रामीण रुग्णालय, पोलादपूरच्या एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र (आयसीटीसी सेंटर) यांच्या सहकार्याने रेड रिबन क्लब अंतर्गत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक सौ.भाग्यरेखा पाटील व तंत्रज्ञ सौ.सीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एड्स  जनजागृतीपर पथनाट्याचे नुकतेच सादरीकरण केले.

या पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एड्स आणि एचआयव्ही बद्दल समाजामध्ये असणारे विविध गैरसमज तसेच एचआयव्ही बाधित रुग्णांना दिली जाणारी भेदभावयुक्त वागणूक, एड्स आणि एचआयव्ही यांच्या उपचारासाठी उपलब्ध असणाऱ्या आधुनिक उपचार पद्धती आणि याबाबत सरकारी रुग्णालयाकडून प्राप्त होणारे सहकार्य याबद्दल पथनाट्याद्वारे प्रबोधन केले. तसेच पथनाट्यातून एचआयव्ही, एड्स पासून स्वतःची सुरक्षा करण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, याबाबत देखील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. एचआयव्ही रुग्णांना उपचाराबरोबरच कौटुंबिक आणि मित्र परिवाराच्या आधाराची असलेली आवश्यकता याबाबत देखील पथनाट्याद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर यांनी सदर पथनाट्य महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून हे पथनाट्य संबंधित शासकीय यंत्रणेला देखील सादर करण्यात येणार असल्याचे नमूद करून डॉ.रावेरकर यांनी याबाबत विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.

  या पथनाट्याच्या सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.राम बरकुले, डॉ.जयश्री जाधव, डॉ.वसंत डोंगरे, डॉ. शैलेश जाधव यांनी विशेष मार्गदर्शन केले.

00000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक