सुंदरराव मोरे महाविद्यालयात “चला जाणूया नदीला” अभियानानिमित्त जलदिंडी आणि जलपूजन कार्यक्रम संपन्न

 

अलिबाग,दि.31 (जिमाका):-  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने  चला जाणूया नदीला हे अभियान जिल्हाधिकारी  डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व  महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, पोलादपूर तहसिलदार श्रीमती दिप्ती देसाई यांच्या सूचनेनुसार सुंदरराव मोरे महाविद्यालय पोलादपूर येथे जलदिंडी आणि जलपूजन कार्यक्रम संपन्न झाला.

चला जाणूया नदीला या अभियानानिमित्त महाड महसूल विभाग, शिक्षणाधिकारी, वनविभाग महाड तर्फे हिरवळ प्रतिष्ठान या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या सहकार्याने पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, लघुपट सादरीकरण, जलदिंडी व जलपूजन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर पोलादपूरचे परिवीक्षाधीन तहसिलदार श्री.विनायक घुमरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ भाग्यरेखा पाटील, उपप्राचार्य प्रा.सुनिल बलखंडे, हिरवळ संस्थचे श्री.जय अंबुर्ले, श्री.गणेश कुरडूनकर, श्री.कुणाल गुरव, वनविभागाच्या अधिकारी श्रीमती प्रियंका जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना परिविक्षाधीन तहसिलदार श्री.विनायक घुमरे यांनी जलसंवर्धन, भूजलाचे पुनर्भरण आणि त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या रेनवॉटर हार्वेस्टिंग तसेच समतलचर आणि शेततळी या उपक्रमांच्या माध्यमातून आपण पाणी कशाप्रकारे वाचवू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.दीपक रावेरकर यांनी नदी या जीवनप्रणाली मुळेच मानवी जीवनाला स्थिरत्व प्राप्त झाले आहे.  परंतु अमर्याद आणि विवेकहीन वृक्षतोड आणि नैसर्गिक साधनांच्या बेसुमार वापरामुळे आज मानवजातीसमोर विविध संकटे उभे आहेत.  भावी पिढ्यांसमोर देखील यापेक्षाही भीषण पर्यावरण विषयक संकटे निर्माण होऊ शकतात याची जाणीव करून देऊन यावर तरुण पिढीने वेळेत सावध होऊन शासन आणि पर्यावरणप्रेमी संस्थांच्या उपक्रमांना प्रतिसाद देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ समीर बुटाला यांनी चला जाणूया नदीला या उपक्रमाची उद्दिष्टे विशद करताना मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून नदीचे महत्व, नदी ही नैसर्गिक प्रणाली जपण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे, याबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी हिरवळ प्रतिष्ठानच्या वतीने मनोगत व्यक्त करताना श्री.गणेश कुरडूनकर यांनी कोकण विभागात सर्वात जास्त पर्जन्यमान असूनही उन्हाळ्यामध्ये विविध गावांमध्ये जाणवणारी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वनराई बंधारे आणि वेळोवेळी नदी मधील गाळ काढणे यांसारख्या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवणे गरजेचे असे सांगितले.

कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ भाग्यरेखा पाटील यांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुद्ध पाण्याचे महत्व विशद करताना कॉलरा, टायफाईड यांसारखे विविध आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात आणि जलसाठ्यांमधील पिण्याचे पाणी शुद्ध ठेवण्यासाठी आपण नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास अशा प्रकारच्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते, यासाठी तरुणांनी ग्रामस्थांमध्ये जागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना अपेक्षा साळुंखे हिने ग्रामीण भागातील जलसाठे प्रदूषण विरहित व स्वच्छ आणि प्रवाही ठेवण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच इतिहास विभागप्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर गावंड यांनी चला जाऊ या नदीला चला जाणू या नदीला हे जनजागृतीपर स्वरचित गीत सादर केले.

यावेळी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व विशद करणारा आणि जल संवर्धनाचे विविध उपाय स्पष्ट करणारा लघुपट दाखवण्यात आला. या कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या परिसरातच असलेल्या चोळई नदीच्या उगम स्थानापर्यंत जलदिंडीचे काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य फलक आणि स्वच्छ नदी, समृद्ध नदी ! प्रवाही नदी आणते समृद्धी ! हीच वेळ शहाणपणाची, नदीला जाणून घेण्याची ! इत्यादी घोषणांद्वारे जनजागृती केली. जलदिंडीचा समारोप चोळई नदीच्या उगम स्थानावर झाल्यानंतर प्राचार्य डॉ.दीपक रावेरकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील श्री.शंकर जगताप, श्री. विनायक जगताप तसेच ग्रामसेविका श्रीमती गंभीरे यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. संपूर्ण कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना व आजीवन विभागाचे विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाधिकारी डॉ.जयश्री जाधव, डॉ.नाथिराम राठोड यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.राम बरकुले यांनी आभार प्रदर्शन केले.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड